आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री असताना विलासरावांनी दिले 'या' संकटांना तोंड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्याची भौगोलिक पार्श्वभूमी कुठेही सारखी नाही. एकीकडे राज्याला ७२० किलोमीटर सागरी किनारा लाभला आहे तर, दुसरीकडे हजारो किलोमीटर डोंगर पसरलेला आहे. मराठावाडा-विदर्भात कायम पाण्याचे दुर्भिक्ष्य तर पश्चिम महाराष्ट्राचे प्रश्न वेगळे. त्यामुळे नैसर्गिक संकटांबरोबरच राज्याला मानवनिर्मीत संकटांचाही सामना अनेकदा करावा लागला आहे. विलासराव देशमुखांनी आठ वर्ष खंबीररित्या राज्याचे नेतृत्व केले. सर्वाधिककाळ राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले ते दुसरे नेते ठरले. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत आघाडीचे सरकार चालवत असताना त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. या संकटातूनही त्यांनी राज्याला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन दिले.
२६ जुलैचे आस्मानी संकट
२६ जुलै २००५ साली मुंबई महानगरापासून पन्नास-साठ किलोमीटर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे दोन-तीन दिवस मुंबई पाण्याखाली होती. मुंबईत अलिकडच्या काळात एवढा पाऊस कधीही झाला नव्हता. हे आस्मानी संकट केवळ मुंबईपूरते मर्यादित नव्हते तर, कोकण, कोल्हापूर, सांगली यांनाही या जलप्रलयाचा फटका बसला होता. जिवीतहानी मोठ्या प्रमाणात होती. त्यासोबतच वित्तहानी, अनेकांच्या घरांची राखरांगोळी झाली होती. सार्वजनिक सेवा बंद पडल्यातच जमा होत्या. संपर्काची साधने बंद होती. या जलसंकटामुळे बाधित झालेल्यांना तत्काळ मदतीची गरज होती. पुनर्वसनाचा मोठा प्रश्न राज्यसरकार समोर पर्यायाने मुख्यमंत्र्यांसमोर उभा राहिला होता. यावेळी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वेगाने निर्णय घेतले. मदतकार्यावर जातीने लक्ष ठेवले. प्रत्यक्ष पाहाणीकरुन कोणते कार्य आवश्यक आहे, कशाला प्राथमिकत देणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन कारवाईचे तत्परतेने आदेश दिले. मदत व पुनर्वसन कार्य करत असताना त्यांनी मंत्रालयात कंट्रोलरुम सुरु केले. त्याची जबाबदारी सचिव दर्जाच्या अधिका-यावर दिली. सचिवांनी २४ तास मंत्रालयात थांबून काम करण्याची ती बहूतेक पहिलीच वेळ होती.

पाणी ओसरल्यानंतर जनजीवन सुरळीत करण्याचे कार्य युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. सर्वप्रथम दळणवळणाची साधने सुरु होणे गरजेचे होते त्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आली. सांगलीत पुरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचीही मदत घेण्यात आली. रस्ते, रेल्वेमार्ग, हवाई धावपट्या खुल्या करण्यात आल्या.
मदतकार्यात शासकीय यंत्रणेसोबत सेवाभावी संस्थांनाही सहभागी करुन घेण्यात आले.
या जलसंकटानंतर संपूर्ण राज्यात जिल्ह्याजिल्ह्यात आपत्तीव्यवस्थापनचा कक्ष सुरु करण्यात आला.
यासर्व काळात विलासरावांनी प्रशासन, मदतकार्यात सहभागी शासकीय, निमशासकीय, लष्कर यांच्यात समन्वय ठेवून काम केले.

२६ नोव्हेंबर २००८ चा दहशतवादी हल्ला
मुंबईही देशाची आर्थिक राजधानी त्यामुळे दहशतवाद्यांच्या हिट लिस्टवरील शहर. २६ नोव्हेंबर २००८ रोजी पाकिस्तानात प्रशिक्षण घेऊन मुंबईला लक्ष्य करण्यासाठी जवळपास दहा दहशतवादी समूद्रीमार्गे मुंबईत दाखल झाले आणि त्यांनी अंदाधूद गोळीबार करण्यास सुरुवात केली. या दहशतवाद्यांनी मुंबईचे सर्वात वर्दळीचे ठिकाण छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि मुंबईची शान ताज हॉटेल, विदेशी पर्यटक जास्त सापडतील अशा दक्षिण मुंबईला लक्ष्य केले. यावेळी विलासराव परराज्याच्या दौ-यावर होते. मात्र, मुंबई पोलिस आणि लष्कराने अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घालत परिस्थिती नियंत्रणात आणली. मुंबई पोलिसांनी अजमल कसाब या दहशतवाद्याला जिवंत पकडले. यामुळे मुंबई आणि महाराष्ट्राचे मनोधौर्य टिकून राहिले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री म्हणून प्रशासनाला सतर्क ठेवले. मात्र, या मुंबई हल्ल्यानंतरच त्यांना मुख्यमंत्रीपद गमवावे लागले.
त्यांच्या कारकिर्दीत आलेल्या अनेक संकटांपैकी विदर्भातील कास्तकारांच्या आत्महत्या, वीज टंचाई व्यवसायिक अभ्यासक्रम प्रवेशाच्या समस्या यांच्यावरही त्यांनी सामोपचाराने मात केली.
असा होता बाभळगावच्या सरपंचाचा दिल्लीपर्यंतचा प्रवास!