आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असा होता बाभळगावच्या सरपंचाच्या दिल्लीपर्यंतचा प्रवास

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विलासराव देशमुख यांचा जन्म २६ मे १९४५ साली लातूर जिल्ह्यातील बाभळगावला झाला. मराठा समाजात जन्माला आलेल्या विलासरावांचे दहावी पर्यंतचे शिक्षण मराठवाड्याच्या ग्रामीण भागात झाले असले तरी महाविद्यालयीन शिक्षण विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात झाले. त्यांनी बी.एस्सी आणि बी.ए. आबासाहेब गरवारे महाविद्यालयात पूर्ण केले. त्यानंतर पुणे येथेच त्यांनी कायद्याची पदवी घेतली. याच काळात त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली ती दुष्काळग्रस्तांच्या मदतीपासून.
विलासरावांच्या सुविद्य पत्नी वैशाली देशमुख. विलासराव राजकारणात एक एक पायरी वर चढत असताना त्यांनी कुटूंबाची बाजू समर्थपणे सांभाळली. विलासरावांची तीन मुले आहेत. अमित देशमुख सध्या लातूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. द्वितीय चिरंजीव रितेश आणि तिसरा पुत्र धीरज. रितेश देशमुख बॉलिवूडमध्ये स्थिर झाला आहे. विलासरावांचे बंधू दिलीपराव देशमुख विधानपरिषदेचे सदस्य आहेत.
राजकीय कारकीर्द
विलासरावांचे शिक्षण पुणे शहरात झाले असले तरी त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात त्यांच्या गावापासून झाली. १९७४ साली ते बाभळगाव ग्रामपंचायतीचे सदस्य झाले. १९७४ ते १९७९ ते गावाचे सरपंच होते. १९७४ पासून राजकारणात पाऊल ठेवलेल्या विलासरावांनी नंतर मागे वळून कधी पाहिले नाही. ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचपदापासून कारकिर्दीला सुरुवात केलेल्या विलासराव नंतर उस्मानाबाद जिल्हा परिषद सदस्य आणि लातूर तालुका पंचायत समिती सभापतीही झाले. उस्मानाबाद युवक काँग्रेस अध्यक्षपदही त्यांनी १९७५ते१९७८ या काळात भूषविले. याकाळात त्यांनी युवक कल्याणचा पाच कलमी कार्यक्रम राबवला. त्यांनी युवक काँग्रेसमध्ये केलेल्या कामगिरीचे फळ त्यांना उस्मानाबाद जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षरुपाने मिळाले.
सन १९८०मध्ये ते पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. १९८५ ते १९९० या काळात ते पहिल्यांदा राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री झाले. त्यांनी राज्य मंत्रिमंडळातील बहुतेक खाती सांभाळली होती. विधानसभेच्या १९९५च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. ३५,००० मतांच्या फरकाने ते हारले होते. हा त्यांचा विधानसभेतील एकमेव पराभव होता. त्यानंतर १९९९ साली ते विक्रमी मताधिक्याने विजयी झाले. राज्यातही सत्तापरिवर्तन झाले. शिवसेना - भारतीय जनता पक्षाच्या हातून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता आली. आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी १८ ऑक्टोबर १९९९ला त्यांनी शपथ घेतली. या दरम्यानच्या काळात त्यांना काँग्रेस- राष्ट्रवादी यांच्या आमदारांबरोबरच दोन्ही पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांसोबत समन्वय ठेवून काम करावे लागले. १७ जानेवारी २००३ पर्यंत ते राज्याचे मुख्यमंत्री होते. जानेवारी २००३ मध्ये त्यांचे घनिष्ट मित्र सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची सुत्रे त्यांनी सोपवली. ऑक्टोबर २००४साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते लातूर मतदारसंघातून निवडून आले आणि पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री झाले. ही त्यांच्या मुख्यमंत्रिपदाची दुसरी टर्म होती. त्यांच्याच कारकीर्दीत नोव्हेंबर २००८मध्ये मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. यावेळी त्यांनी हल्ला झालेल्या ताज हॉटेलला अभिनेता पुत्र रितेश आणि चित्रपट निर्माता राम गोपाल वर्मा यांच्यासोबत भेट दिली. यावरून विरोधी पक्षासह माध्यमांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांच्या ताज भेटीला 'टेररटुरीझम' संबोधण्यात आले. या टीकेनंतर त्यांनी हल्ल्याची नैतिक जबाबदारी स्विकारत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. विलासरावांचे राजकीय गुरु शंकरराव चव्हाण यांचे पुत्र अशोक चव्हाण यांना राज्याचे मुख्यमंत्री करण्यात आले. तर विलासराव राज्यसभेचे सदस्य झाले. यामुळे काँग्रेसमध्ये विलासरावांचे वजन आणखी वाढले. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात २८ मे २००९ साली ते अवजड उद्योग खात्याचे केंद्रीय मंत्री झाले. जानेवारी २०११मध्ये त्यांच्या खात्यात बदल करण्यात आला आणि त्यांच्याकडे ग्रामीण विकास खाते आले. जुलै २०११मध्ये त्यांच्याकडील खाते बदलण्यात आले आणि तेव्हापासून ते विज्ञान तंत्रज्ञान आणि भू-विज्ञान खात्याचे केंद्रीय मंत्री होते.
महाराष्‍ट्राचे माजी मुख्‍यमंत्री विलासराव देशमुख यांचे निधन