आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांची छेडछाड: निर्लज्ज मोर्चामुळे समाजाची मानसिकता बदलू शकेल काय?

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिलांची छेडछाड वा त्यांच्यावर होणाऱया अत्याचाराच्या घटनांनंतरही गुन्हेगारांविरुद्ध बोलण्याऐवजी उलट महिलांची वेशभूषा आणि त्यांची वागणूकच त्यास कारणीभूत असल्याची भारतातील लोकांची मानसिकता बनली आहे. या मानसिकतेविरुद्ध आता भारतातही महिलांनी आवाज उठवला आहे.

दिल्लीतील महिलांनी त्याची सुरुवात केली आहे ती एका स्लट वॉकने. बहुतेक लोकांना वाटले की, पाश्चात्त्य देशांत ज्या प्रकारे महिलांनी अर्धनग्न होऊन स्लट वॉक केला आणि विरोध जाहीर केला, तसाच स्लट वॉकही दिल्लीतही होईल. तथापि, महिलांना असे सांगण्यात आले होते की त्या दररोज जसे कपडे घालतात, तेच घालून या वॉकमध्ये सामील व्हावे. संयोजन समितीत असलेल्या मिशिका सिंहने सांगितले की, आमचा वॉक पाश्चात्त्य देशांसारखा नव्हता. आमचा लढा केवळ कपड्यांपुरताच मर्यादित नाही. येथे कपड्यांशिवायही अनेक मूलभूत मुद्द्यांवर चर्चा करण्याची गरज आहे. वॉकसाठी कोणताही ड्रेसकोड निर्धारित करण्यात आला नव्हता. अनेक लोकांचा स्लट वॉक या नावावर आक्षेप आहे, पण या नावाचे समर्थक आणि संयोजन समिती म्हणते की, पाश्चात्त्य देशांत जेव्हा हा लढा सुरू झाला होता तेव्हा त्यास स्लट वॉक असेच नाव देण्यात आले होते. म्हणून आम्हीही हेच नाव स्वीकारले. नंतर आम्ही त्याचे निर्लज्ज मोर्चा असे नामकरण केले. संयोजन समितीचे सदस्य निपुण सक्सेना म्हणाले की, आपल्या समाजात जर मुलगी पुढे होऊन काही करत असेल, आपल्या मर्जीने जगत असेल, मुलांच्या पुढे जात असेल किंवा मोकळेपणाने हसत असेल तर तिला निर्लज्ज म्हटले जाते. त्यामुळेच या वॉकला निर्लज्ज मोर्चा असे नाव देण्यात आले. ज्यांना या नावावर आक्षेप आहे ते यास ‘स्टॉप क्राइम अगेन्स्ट वुमन वॉक’ही म्हणू शकतात.

टोरँटोपासून सुरुवात
निर्लज्ज मोर्चा समाजाची मानसिकता बदलण्यात कितपत यशस्वी होतो हे सांगणे अवघड आहे. मात्र सर्वात आधी या मोर्चाची सुरुवात कॅनडातील टोरँटो शहरातून झाली होती. टोरँटोनंतर कॅनडातील इतर शहरांतूनही महिलांनी असेच उत्स्फूर्त वॉक केले. नंतर युरोपात आणि आता आशियात हे निर्लज्ज मोर्चे काढले जात आहेत. टोरँटो पोलिसांतील एक कॉन्स्टेबल मायकेल सेंग्विनेटीने महिलांना असा सल्ला दिला की, त्यांच्यावरील अत्याचार रोखायचे असतील तर त्यांनी असे कपडे घालू नयेत जे गुन्हेगारांना आकर्षिक करतील. महिलांनी पोलिसांच्या या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आणि निदर्शने सुरू झाली. सेंग्विनेटीची मानसिकता म्हणजे तमाम पुरुषांची मानसिकता आहे, असे म्हणत सोनिया बार्नेट व हिथर जार्विस या दोन महिलांनी स्लट वॉक म्हणजेच निर्लज्ज मोर्चाची पायाभरणी केली. खरे तर या शब्दाचा वापर करून वर्षानुवर्षे महिलांचा अपमान केला जात आहे आणि त्यांच्या वेशभूषेला टार्गेट करून त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराला योग्य ठरवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे त्या दोघी म्हणतात. त्यानंतर निर्लज्ज मोर्चाचा जाहीरनामा तयार करण्यात आला. त्यात महिलांनी घोषणा केली की, या शब्दाचा चुकीच्या अर्थाने वापर करण्यात आला आहे आणि महिला त्याच्या बळी बनल्या आहेत.

महिलांची माफी मागितली
कॉन्स्टेबल सेंग्विनेटीने त्यानंतर महिलांची माफी मागितली, पण महिलांनी आपल्या स्वातंत्र्याची घोषणा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथमच ३ एप्रिल २०११ रोजी जवळपास ३ हजार महिला टोरँटोमधील क्वीन्स पार्कमध्ये एकत्र आल्या आणि त्यांनी या शब्दाच्या वापराविरोधात पुरुषवादी मानसिकतेला आव्हान दिले. त्यानंतर त्या महिला टोरँटो पोलिस मुख्यालयात गेल्या. निर्लज्ज मोर्चात महिलांनी रोजच्यासारखेच कपडे घालून येण्यास सांगितले गेले. मात्र ज्याला पुरुष चांगले मानत नाहीत असेच कपडे महिला या मोर्चात घालून आल्या होत्या. तीन महिन्यांतच जगभरात स्लट वॉक म्हणजेच निर्लज्ज मोर्चा काढण्याची लाट आली. टोरँटोनंतर लंडन, मेलबर्न, ब्रिस्बेन, मॉन्ट्रियल, सासकाटून, एडमंटन, हॅमिल्टन, सॅन दिएगो, व्हॅन्कुव्हर या पाश्चात्त्य शहरांतही हे मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर दिल्ली हे आशियातील पहिले शहर आहे, जेथे ३१ जुलै रोजी महिलांनी निर्लज्ज मोर्चा काढला.

मानसिकतेत बदलाचा उद्देश
पुरुषप्रधान मानसिकता असलेल्या समाजातील लोक गुन्हेगारांना शिक्षा करण्याऐवजी तरुणींचे कपडे आणि वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह लावतात. तरुणींना दोषी मानून गुन्हेगारी प्रवृत्तीस खतपाणी घालण्याऐवजी खऱया दोषींना शिक्षा व्हावी, असे मोर्चातील महिलांना वाटते. दिल्लीत स्लट वॉकची सुरुवात केली ती दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी उमंग सबरवाल हिने. उमंग म्हणते की, जगातील इतर देशांतील स्लट वॉकप्रमाणे आम्ही अर्धनग्न होणार नाही. ती म्हणते, तोकडे कपडे घालणे हे धाडसी पाऊल आहे, मात्र ही काही परीक्षा नाही. महिलांचे कपडे पुरुषांना गुन्हे करण्यास प्रवृत्त करत नाहीत तर त्यांची मानसिकताच त्यास जबाबदार आहे. मी आपला आवाज अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर उठवला, मात्र मी कपडे कसे घातले आहेत याच्याशीच लोकांना देणे-घेणे असावे. मी सलवार-कमीजमध्येही तेवढीच असुरक्षित आहे, जेवढी तोकड्या कपड्यांमध्ये, असे उमंग म्हणाली.

महिला आयोगाचा विरोध
दिल्लीत स्लट वॉक वा निर्लज्ज मोर्चा काढण्याची घोषणा झाली तेव्हा दिल्ली प्रशासन आणि महिला कल्याणाशी निगडित अनेक सरकारी संस्था जाग्या झाल्या. तथापि, दिल्ली पोलिसांनी काही अटींवर या मोर्चास परवानगी दिली. मात्र त्यासोबत मर्यादा न ओलांडण्याचा सल्लाही दिला. मोर्चादरम्यान अश्लीलतेच्या कक्षेत येणारे कपडे घातल्यास वा हावभाव केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद आहे. भारतात स्लट वॉक हा प्रकार बिलकुल नवा आहे. मात्र त्याची सुरुवात दिल्लीतूनच झाली यावर वेगवेगळे मतप्रवाह आहेत. कारण भोपाळ येथे १८ जुलै रोजी स्लट वॉक करण्यात आला. मात्र त्यास जास्त प्रसिद्धी न मिळाल्याने तो कोणाच्याही लक्षात राहिला नाही. स्लट वॉक करणाऱया महिलांचा उद्देश तर चांगला आहे, मात्र अशा प्रकारच्या मोर्चांमुळे महिलांवरील अत्याचारांवर किती अंकुश लागेल, हा मोठा सवाल आहे.

अत्याचारांचा अखेर कपड्यांशी काय संबंध?
भोपाळचे मानसशास्त्रज्ञ डॉ. विनय मिश्रा म्हणतात की, महिलांवरील अत्याचारांचे मूळ त्यांच्या कपड्यांत नसून पुरुषांच्या मानसिकतेत आहे. महिलांवर त्यांच्या तोकड्या कपड्यांमुळे अत्याचार होतात, असे म्हणणे अतिशय चुकीचे आहे. पुरुषप्रधान समाजाचीच ही मानसिकता आहे, जो पीडित महिलेलाच दोषी मानतो. एकविसाव्या शतकातील पहिले दशक उलटूनही आपण ही मानसिकता बदलू शकलो नाही. विनय मिश्रा म्हणाले की, महिलांची छेडछाड करणाऱयांना किंवा त्यांच्याकडे पाहून अश्लील हावभाव करणाऱयांना त्याच ठिकाणी लोकांनी धडा शिकवायला हवा. कारण जे लोक आज इतरांच्या आयाबहिणींची छेड काढत आहेत, तेच उद्या आपल्या घरातील मुलींसोबतही तसेच वागतील. महिलांची छेडछाड रोखायची असेल तर अशा घटनांकडे कानाडोळा करण्याची सवय लोकांना सोडून द्यावी लागणार आहे. स्लट वॉकसारख्या आंदोलनांमध्ये सामान्य लोकही सहभागी होतात. म्हणून महिलांच्या हितासाठी आवाज उठवणारी अशी आंदोलने व्हायला हवीत.

महिलांवरील अन्याय
> राष्ट्रीय महिला आयोगाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात महिलांवर होणाºया अत्याचारांत घट झालेली नाही.
> २०१०-११ मध्ये महिलांवरील अत्याचारांची १४ हजार १५१ प्रकरणे उघडकीस आली. त्यात ५४४ बलात्कार, २ हजार ९४४ कौटुंबिक छळ, ४६५ हुंडाबळी आणि ५०५ प्रकरणे शोषणाची आहेत.
> जगभरात केवळ एक टक्का संपत्ती महिलांच्या नावावर आहे. पाच टक्क्यांपेक्षाही कमी महिला विविध राष्ट्रांच्या प्रमुख आहेत.
> जगभरात दररोज जितके तास काम होते, त्यातील ६७ टक्के तास केवळ महिला करतात. याउलट त्यांना जगभरातील उत्पन्नाच्या केवळ १० टक्के वाटा मिळतो.
> दारिद्र्यरेषेखाली जीवन जगणाऱयांमध्ये जवळपास ७० टक्के महिला आहेत.
> गेल्या एका शतकात जगभरात ५ कोटी महिला बेपत्ता झाल्या आहेत.