आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जबी प्रकरण : ‘एटीएस’ची चार शहरांवर नजर!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - मुंबई येथील 26/11 च्या हल्ल्याप्रकरणी दहशतवादी अबू हमजा उर्फ जबिउद्दीन अन्सारी यास दिल्ली पोलिसांनी पकडल्यानंतर त्याचे मूळ गाव गेवराई तसेच बीड, परळी व माजलगाव येथील वास्तव्याच्या ठिकाणांवर दहशतवादविरोधी पथक (एटीएस) करडी नजर ठेवून आहे. जबिउद्दीन अन्सारीच्या गेवराई व बीड येथील घर व परिसरात एटीएसच्या पथकांनी तपास सुरू केला आहे. नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय उडवण्याचा कट, दौलताबाद येथील शस्त्रसाठा प्रकरण, बनावट सिम कार्डचे बीड शहरातील दोन गुन्हे आणि मुंबई येथील 26/11 चा हल्ला आदी प्रकरणांत जबी पोलिसांना हवा होता.
अखेर त्यास पकडण्यात दिल्ली पोलिसांना यश आले. जबिउद्दीन अन्सारी हा बीड जिल्ह्यातील गेवराईच्या धनगर गल्लीतील रहिवासी आहे. काही वर्षे तो बीड शहरातील हत्तीखाना येथेही वास्तव्यास होता. दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर तपास यंत्रणांचे लक्ष बीड आणि गेवराईकडे वळले. त्या दृष्टीने बीड आणि गेवराई येथील तो वास्तव्यास असणा-या परिसरात एटीएसच्या पथकाने कानोसा घेणे सुरू केले आहे.
मुंबई, पुण्याचे पथक येणार - जबिउद्दीन अन्सारीच्या तपासासाठी मुंबई, पुणे व औरंगाबाद येथील पथके गेवराई आणि बीड शहरात दाखल होत आहेत. शिवाय या पथकांच्या रडारवर माजलगाव, परळी या शहरांचादेखील समावेश आहे. जोपर्यंत ठोस माहिती मिळत नाही तोपर्यंत ती जाहीर केली जाणार नाही तसेच आवश्यकतेनुसार स्थानिक पोलिसांची या कामी मदत घेतली जाणार आहे. औरंगाबाद येथील शस्त्रसाठा प्रकरणात एकूण चार आरोपी असून एकास अटक करण्यात आलेली आहे, तर 3 आरोपी फरार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पथकांना सूचना - जबिउद्दीन अन्सारीची आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून देशभर चर्चा आहे. त्यामुळे त्याचे मूळ गाव व वास्तव्याच्या ठिकाणांची पथकांकडून पाहणी केली जात आहे. विशेषत: जिल्ह्यातील गेवराई आणि बीड या शहरांवर नजर असून त्या संदर्भात पथकांना सूचना दिल्या आहेत. - नवीनकुमार रेड्डी, पोलिस अधीक्षक, दहशतवादविरोधी पथक