आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Diplomacy In Congress And Nationalist Congress Party In Beed

बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीला शह देण्यासाठी काँग्रेसची नवी खेळी !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- जनसामान्यांमध्ये वेगळा ठसा, अस्तित्वाची वेगळी ओळख असली तरी जनमताचा कौल अजमावून बघण्याऐवजी पक्षनेतृत्वाशी असलेल्या घनिष्ठ संबंधातून बीडच्या माजी खासदार रजनी पाटील यांनी राज्यसभेची उमेदवारी मिळवली. काँग्रेसनेदेखील बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचाच बोलबाला पाहून पक्षाची पोकळी भरून काढताना ताकद दाखवत शह देण्यासाठी वेगळीच खेळी खेळली आहे.


माजी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या निधनाने रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागी वर्णी लागण्यासाठी काँग्रेसमधील अनेक मातब्बरांनी अस्तित्व पणाला लावले होते. यात एकेकाळी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेले रोहिदास पाटील व इतरही इच्छुक होते, परंतु माजी खासदार रजनी पाटील व त्यांचे पती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक पाटील यांची थेट सोनिया गांधी यांच्यापर्यंत पोहोच असल्याचे या उमेदवारीवरून स्पष्ट झाले. ही जागा मराठवाड्यासाठी देण्याचा आणि रजनी पाटील यांच्या रूपाने मराठवाड्याला सक्षम नेतृत्व देण्याचा निर्णयही काँग्रेसने घेतल्याचे यातून दिसून येते.


बीड जिल्ह्याच्या राजकारणाचा विचार करता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांना शह देण्याची खेळी करत आमदार सुरेश धस, प्रकाश सोळंके, एवढेच नव्हे तर मुंडेंचे पुतणे धनंजय मुंडे, पंडित मुंडे, अमरसिंह पंडित या आष्टी, परळी, माजलगाव, गेवराई तालुक्यांच्या राजकारणावर पकड असलेल्या आणि खासदार मुंडेंचे हात बळकट करणा-या नेत्यांना भाजपपासून फोडून राष्ट्रवादीत घेतले. राज्याचं राजकारण करणा-या मुंडेंना जिल्ह्याच्या राजकारणातच गुंतवून ठेवण्याच्या खेळीत अजित पवार यशस्वीही झाले. त्याच बरोबर मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसलाही राष्ट्रवादीकडून प्रत्येक ठिकाणी शह देण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे समित्यांपासून स्थानिक राजकारणात डावलले जात असल्याचा आरोप काँग्रेसकडून होत आहे. वाळवा (जि. सांगली) तालुक्यातील बहिरवडगाव माहेर असलेल्या रजनी पाटील यांचे वडील स्वातंत्र्यसैनिक होते. पुणे विद्यापीठात 1979 मध्ये सिनेटची निवडणूक जिंकून विद्यार्थिदशेतच चळवळीत सक्रिय झाल्या. लग्नापूर्वी युवक काँग्रेसचे काम केले. लग्नानंतर 1991 मध्ये जवळबन (ता.केज) गटातून जिल्हा परिषद निवडणुकीत बिनविरोध निवडून आल्या. 1996 मध्ये काँग्रेसकडून तिकीट मिळत नसल्याने खासदार गोपीनाथ मुंडे यांनी रजनी पाटील यांना भाजपकडून बीड लोकसभेची उमेदवारी दिली. त्या निवडूनही आल्या, परंतु त्या भाजपमध्ये रमल्या नाहीत. दोनच वर्षांनी त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

सोळा वर्षांच्या वनवासानंतर संधी
सन 1996 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपकडून बीड लोकसभा निवडणूक जिंकणा-या रजनी पाटील 1998 च्या निवडणुकीत अटलबिहारी वाजपेयी यांच्या सभेच्या वेळी काँग्रेसमध्ये दाखल झाल्या होत्या. तेंव्हापासून सोळा वर्षे काँग्रेसमध्ये वनवास भोगणा-या रजनी पाटील यांना मागील चार वर्षांपूर्वी केंद्रीय महिला समाजकल्याण बोर्डाचे अध्यक्षपद मिळाले होते.