आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मला संपवण्यासाठी तीनदा जन्म घ्यावा लागेल- गोपीनाथ मुंडे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - परळीत येऊन अजित पवारांनी कुटुंबातील एक-दोघे माणसे फोडली आणि मला संपवणार असल्याचे सांगितले. मात्र, मी संघर्षातूनच मोठा झालो आहे. माझ्या मागे जनतेची ताकद आहे. त्यामुळे मला संपवण्यासाठी अजित पवारांना तीनदा जन्म घ्यावा लागेल. त्यांनी दुस-याच्या घराचे वासे मोजण्यापेक्षा आपल्या घरात काय जळते आहे ते पाहावे, असे प्रत्युत्तर भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी पत्रकार परिषदेत
दिले. गुरुवारी परळीत झालेल्या सभेत अजित पवार, पंडितअण्णा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर केलेल्या टीकेचा गोपीनाथरावांनी तिखट शब्दांत समाचार घेतला.
ते म्हणाले, परळीतल्या सभेत आपल्याला संपवण्याची भाषा वापरण्यात आली. 40 वर्षे आपण सार्वजनिक जीवनात आहोत. पूर्ण जीवनच संघर्षमय राहिले आहे. त्यामुळे संघर्ष नवा नाही. अजित पवारांनी आपण कुटुंबीयांवर अन्याय केल्याचा आरोप केला आहे. परळीतल्या कार्यक्रमात पंडितअण्णांचा परिचय देणा-याला त्यांनी भूषवलेल्या पदांची नामावली सांगण्यासाठी 15 मिनिटे लागली. यानिमित्ताने आपण त्यांना काय-काय दिलेय हे सर्वांना कळाले. 15 वर्षे जिल्हा परिषद सदस्य, 10 वर्षे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद, धनंजयला दोनदा उपाध्यक्षपद आणि आमदारकीही दिली. त्याचे सगळे लाड पुरवले. मात्र, त्याला मंत्रिपद हवे होते. आपण विरोधी पक्षात असल्यामुळे मंत्रिपद देऊ शकत नव्हतो. त्यामुळे तो पवारांच्या वळचणीला गेला. त्याच्या जाण्याबद्दल काही म्हणायचे नाही. मात्र, त्याने भाजपचा आमदार असूनही राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर जाऊन बंड केले नसल्याचे सांगत अद्याप इमानदार असल्याचा दावा केला.
एका पक्षाचा आमदार असताना दुस-या पक्षाच्या व्यासपीठावर जाणे यात कसली आली इमानदारी? जायचे तिथे जा; पण इमानदारीची व्याख्या तरी बदलू नका, असा टोला गोपीनाथ मुंडेंनी लगावला. त्यांनी अगोदर भाजपने दिलेल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि खुशाल राष्ट्रवादीत जावे. आजचे पक्षांतर हे स्वार्थासाठी आणि सत्तेतील पदे मिळवण्यासाठी आहे हे न समजण्याएवढी जनता दूधखुळी नाही.
राजकारणात चढ-उतार, जय-परायज होत असतात. त्यातून आपण नेहमीच तावून-सुलाखून बाहेर पडत आलो आहोत. परळीतल्या कार्यक्रमात कुटुंबातल्या एक-दोघांसोबत भाजपचे फक्त पाच टक्के लोक गेले आहेत. 95 टक्के कार्यकर्ते आणि जनता आपल्यासोबत आहे. त्यामुळे आपल्याला कशाचीच चिंता नाही, असे
मुंडे म्हणाले.

वासे आणि कुसळ...
अजित पवारांनी परळीत येऊन आमच्यावर आगपाखड केली. त्यांनी दुस-यांच्या घराचे वासे मोजण्यापेक्षा आपल्या घरात काय जळते आहे ते पाहावे. दुस-याच्या डोळ्यातले कुसळ दिसते, मात्र आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही, अशी पवारांची अवस्था झाली आहे. द्यायचं न घ्यायचं अन् मणभर बोलायचं, असा अजितदादांचा स्वभाव असल्याचा टोला मुंडे यांनी लगावला.

पवारांचा पैसा गरिबांपर्यंत
परळीतल्या कार्यक्रमासाठी लोकांना पैसे देऊन आणले होते, असे वृत्त एका वाहिनीने दाखवल्याबद्दल गोपीनाथरावांना विचारले असता कार्यक्रमासाठी पवारांचा आणलेला पैसा सामान्य आणि गरीब माणसांपर्यंत पोहोचला ही चांगली
बाब आहे, अशी कोटी केली. घरफोड्या नाही, असेही अजितदादांनी सांगितल्याच्या मुद्द्यावरही मुंडेंनी टोला लगावला. घरफोड्या हे आपण लाक्षणिक अर्थाने म्हणालो होतो. पवारांना साहित्याचा अभ्यास नसल्यामुळे त्यांना कोटी कळली नाही. त्यांनी बहुतेक त्याचा खराखुरा दरोडा असा अर्थ काढला.