आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pandit Munde Parali Ajit Pawar Dhananjay Munde Rally

आम्हाला काकापासून वाचवा!, अजितदादांचे ‘काकां’वर शरसंधान

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी वैजनाथ - ‘ओबीसींचं राजकारण संपवायला अजित पवार निघाले आहेत,’ असा प्रचार करणा-या आणि भाजपचे राष्ट्रीय नेते म्हणवून घेणा-या नेत्यांनी आमदार, खासदार करूनही स्वत:च्या जवळची माणसं का सोडून चालली आहेत याचं आत्मचिंतन करावं. कुठल्या समाजाचं राजकारण संपवणारी आमची जात नसून शेतकरी हीच आमची जात आहे, असे स्पष्ट करतानाच ‘आम्हाला काकापासून वाचवा,’ असं सांगण्याची आताच्या पुतण्यांवर वेळ आली आहे, या शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रीय राजकारणातील ‘काकां’वर शरसंधान साधले.
भाजपचे लोकसभेतील उपनेते खासदार गोपीनाथ मुंडे यांचे बंधू पंडितअण्णा मुंडे यांनी गुरुवारी परळी वैजनाथ येथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड, पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर, राज्यमंत्री प्रकाश सोळंके, आमदार सुरेश धस, विनायक मेटे, मधुसूदन केंद्रे यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.
हुकूमशाहीला वैतागलेल्या अणि सर्व सूत्रे आपल्याच ताब्यात ठेवण्याच्या वृत्तीला कंटाळून स्वाभिमान जागा ठेवणा-या पंडितअण्णा व त्यांच्या सहका-यांचे राष्ट्रवादीत स्वागत करतो. महिला, कार्यकर्त्यांना शब्द देतो. प्रांताध्यक्षाच्या साक्षीने शब्द देतो. शरद पवारांंनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना स्वत:च्या स्वाभिमानासाठी केली. देशाच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावत असताना काही राजकीय स्थित्यंतरे घडली, परंतु पवारांनी कधी जातीपातीचे, नात्यागोत्याचे राजकारण केले नाही.
यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक यांच्या विचारांचा महाराष्ट्र पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पवारांवर अनेक प्रकारचे आरोप झाले. मात्र, ते कधी खालच्या पातळीवर गेले नाहीत. गेल्या पन्नास वर्षांत अनेक स्थित्यंतरे आली, परंतु पवार कधी डगमगले नाहीत, खालच्या पातळीवर गेले नाहीत. कित्येक आमदार सोडून गेले, परंतु जनतेने साथ सोडली नाही.
त्यामुळे पवारांनी कधी मागे वळून पाहिले नाही. सातत्याने माझा शेतकरी, तरुण वर्ग, शहरी, ग्रामीण शेतमजुरांचे प्रश्न मनात घेऊन पवारांंनी वाटचाल केली. बीड जिल्ह्यातील जनता पवारांना दैवत मानणारी, भरभरून प्रेम देणारी आहे. त्यामुळे ज्या ज्या वेळी आम्ही बीड-परळीला येतो त्या त्या वेळी जनतेला भरभरून द्यायला पाहिजे, असे वाटते.

आम्ही काय दरोडेखोर आहोत का ?
माझ्यावर घर फोडल्याचा आरोप ते करतात. त्यांना आम्ही काय दरोडेखोर वाटतो काय? ज्यांना स्वत:च्या घरातील कर्त्या माणसांना स्वाभिमानाने जवळ ठेवता आले नाही त्यांनी आरोप करू नयेत. जिल्हा मागास ठेवण्यास तेच जबाबदार आहेत. आम्ही ओबीसींचे राजकारण संपवत नसून जपण्याचे काम करत आहोत. सतत भावनेचे राजकारण करून जनतेला फसवण्याचे काम करू नये. पवारांनी आम्हाला सूत्रे दिली. मुंडेंनीदेखील आमदार धनंजयला नेतृत्व द्यायला हवे होते, असेही अजित पवार म्हणाले.
बहिणीने भावाशी नाते तोडले...
भावाने मुंबईत असलेल्या बहिणीला (पंकजा पालवे) परळीतून निवडून आणले तीच बहीण भगवानगडावर भावाला नातं तुटल्याचे सांगते. चाळीस वर्षे राजकारणात भावासाठी राबणा-याला (पंडितअण्णांना) दूर सारले जाते. खोटं बोलायचं, तेही रेटून ! मात्र, खोटं फार काळ चालत नाही, असे अजित पवार म्हणाले.
यांनी केला प्रवेश
जि. प. चे 5 आजी-माजी सदस्य, पंचायत समितीचे सभापती, पालिकेच्या 11 नगरसेवकांसह 100 सरपंच, 40 सेवा सहकारी संस्थांच्या अध्यक्षांसह कार्यकर्त्यांनी राष्टवादीत प्रवेश केला.
‘झेडपी’तही वेगळा गट!
धनंजय मुंडे यांची भूमिका
आमदार पंकजातार्इंसाठी माघार घेतली. तुमच्यासाठी तर (खासदार मुंडे) जीव कापायला कधीही तयार होतो. मात्र, विकास कमी आणि राजकारणच जास्त झाल्याने वेगळं पाऊल उचललंय. मी कर्मठ कार्यकर्ता असून भाजपमध्येच आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतही भाजपचा वेगळा गट केल्यास नवल वाटू देऊ नका, अशी भूमिका आमदार धनंजय मुंडे यांनी घेतली.
वडील पंडितअण्णा मुंडे यांना कार्यकर्त्यांसमवेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पाठवताच गुरुवारी आमदार मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपीठावर येऊन भाषण केले. ख-या अर्थाने मी आज उभा आहे. या डोळ्यांनी कार्यकर्त्यांचं कौतुक पाहायला काय हरकत? माझं बंड नेतृत्वाविरोधात नाही. चांडाळचौकडीने आणलेली ही वेळ आहे. त्याविरोधात इमानदारीची ही लढाई आहे. नगरपालिकेच्या वेळी विनंती केली. 12 डिसेंबरला काकांचा वाढदिवस असतो. 17 नगरसेवक निवडून दिले. थेट वाढदिवसाची भेट दिली. ती त्यांना घेता आली नाही. यात बंड कसलं ? जुगलकिशोर लोहिया यांनी कान भरून घर फोडण्याचं मोठं पाप केलं. त्यांना नगराध्यक्षपद बहाल करण्याचं ठरवलं. त्यामुळे माझ्या 12 नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन केला. अर्ज भरण्याआधी साडेतीन तास चर्चा केली. लोहिया सोडून दुसरा कुठलाही उमेदवार द्या म्हणालो, पण ऐकलं नाही.
आज एका डोळ्यात आनंद, तर दुस-या डोळ्यात अश्रू आहेत. मनातलं दु:ख कोण पाहणार? खासदार मुंडेंच्या विरोधात आम्हाला काहीही करायचं नाही. लातूरच्या दोस्तीत परळीला भरपूर सहन करावं लागलं. घर फोडण्याचं पाप आमच्याकडून झालेलं नाही. आम्हाला घर फोडायचंच असतं तर विधानसभेच्या वेळीच फोडलं असतं. जनतेच्या हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घेऊ. खासदार मुंडेंनी आतापर्यंत खोटी आश्वासनं दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्या आठ दिवसांतच 29 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. जिल्ह्यातील गडावर समाजकारण कमी आणि राजकारणच जास्त झालं आहे, असे त्यांनी सांगितले.