आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जबीउद्दीनचा झाला अबू जिंदाल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - 9 मे 2006 रोजी वेरूळच्या घाटात पकडलेल्या शस्त्रसाठ्यामागचा सूत्रधार जबीऊद्दीन अन्सारी अखेर सहा वर्षांनंतर पोलिसांच्या जाळ्यात सापडला. त्यावेळी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पाकिस्तानात निसटलेल्या जबीऊद्दीन अन्सारीचा काळाच्या ओघात अबू जिंदाल उर्फ अबू हमजा झाला. घातपाती कारवायांमागील ब्रेन बनलेल्या याच जबीऊद्दीनने 26/11 च्या मुंबई हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
2002च्या गुजरात दंगलीनंतर सिमी संघटनेत सक्रीय झालेला बीडचा 23 वर्षीय जबीऊद्दीन अन्सारी देशाला माहिती झाला तो 9 मे 2006च्या वेरूळ घाटातील शस्त्रसाठा प्रकरणामुळे. एटीएसच्या धडाकेबाज कारवाईत महंमद आमीर आणि इतरांना पकडण्यात आले, पण या प्रकरणाचा सूत्रधार असणारा जबीऊद्दीन अन्सारी मात्र पोलिसांच्या हाती लागला नाही. जवळपास 25 मेपर्यंत एटीएस आणि स्थानिक पोलिस जबीऊद्दीनचा शोध घेत होते. त्याचे बीड, गेवराईचे घर, नातेवाईक, मित्र सगळीकडे त्याचा कसून शोध घेण्यात सुरु होता. याच काळात एटीएस आणि राज्य पोलिस दलाचे वरिष्ठ पोलिस अधिकारी औरंगाबादेत तळ ठोकून होते. शस्त्रसाठाप्रकरणातील आरोपींकडूनही जबीऊद्दीनचा पत्ता मिळू शकला नाही.
जसजसे दिवस जात होते तसतशी त्याच्या अटकेची शक्यता मावळत चालली होती. अशातच औरंगाबादमध्ये झडतीसत्र सुरु असताना जबीऊद्दीनचा एक कॉल ट्रेस झाला. तो कोलकत्यापर्यंत पोहचला होता. एटीएसच्या एका वरिष्ठ अधिका-याला पत्रकारांनी जबीऊद्दीन अन्सारीचे काय झाले असा प्रश्न केला तेव्हा त्याने ‘बंदा तो व्हाया कोलकता भाग गया’ असे सांगितले.
एटीएसने त्याचा माग काढला असता औरंगाबादेतून निसटलेल्या जबीऊद्दीनने भुसावळमार्गे कोलकाता गाठले. सिमीच्या नेटवर्कमधील कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तो बांगलादेशात निसटला. वेरूळच्या शस्त्रसाठा प्रकरणात जबीऊद्दीनला बीडच्या फैय्याज कागजीने मदत केली होती. तोही जबीऊद्दीनचा मित्र, सिमीतील सहकारी. जबीऊद्दीन कोलकत्याहून बांगलादेशात पोहचण्याआधी हा फैय्याज कागजी तेथे पोहचला होता. तेथे बनावट पासपोर्ट, व्हिसाची सोय करण्यात आली. त्यानंतर ही जोडी इराणला गेली आणि तेथून पाकिस्तानात.
बीड ते पाकिस्तान असा घातपाती प्रवास करणा-या जबीऊद्दीनकडून पोलिस आणि गुप्तचरांना लष्कर ए तोयबा आणि त्यांच्या घातपाती कारवायांबाबत सखोल माहिती हाती लागण्याची शक्यता आहे.
हल्ल्यांच्या आखणीत हातखंडा - जबीऊद्दीनचे एकएक कारनामे उघड झाल्यानंतर गुप्तचरांनी त्याच्यावर नजर ठेवली. बंगळुरूमधील भारतीय विज्ञान संस्थेवरील हल्ल्यामागे आणि 2006च्या मुंबईतील लोकलमधील बॉम्बस्फोटामागे त्याचा हात असल्याचे समोर आले. भारतातील घातपाती कारवायांसाठी लष्कर ए तोयबाने इंडियन मुजाहिदीनची स्थापना केली. त्यात हल्ल्यांची आखणी करणे, ठिकाणे निवडणे यात जबीऊद्दीन मदत करू लागला. याच काळात तो अबू हमजा या नावाने ओळखला जाऊ लागला. इंडियन मुजाहिदीनने घातपाती कारवायांचा धडाका लावल्यानंतर त्याचा लष्कर ए तोयबामधील भाव चांगलाच वधारला. लष्करच्या वरिष्ठ कमांडरच्या दर्जाचे स्थान त्याने पटकावले. त्यातूनच 26 नोव्हेंबर 2008 च्या मुंबई हल्ल्यातील कसाब आणि त्याच्या सहका-यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली.
मुंबई न्यायालयाचे वॉरंट - मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार मानल्या जाणा-या जबीउद्दीन ऊर्फ अबू जिंदाल यास ताब्यात घेण्यासाठी या प्रकरणाचा तपास करणारे पोलिस निरीक्षक रमेश महाले व विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी त्याचा ताबा मिळवण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्यानुसार मुंबईचे अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी पी. एस. राठोड यांनी वॉरंट बजावले आहे. मुंबईवरील हल्लेखोरांना जिंदाल यानेच सूचना दिल्या होत्या. कसाबनेही जबाबात तसा उल्लेख केला आहे. त्याच्याविरुद्ध सबळ पुरावे असून, खटला चालवण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी निकम यांनी केली आहे.
अन्सारीचा साथीदार बेग... - पुण्यातील जर्मन बेकरी स्फोटातील सूत्रधार हिमायत बेग मूळचा बीडचाच. जबीचा तो साथीदार. पाकिस्तानात राहून जबीने बेगशी संपर्क साधला होता. त्याला श्रीलंकेला बोलावून घेतले होते. यानंतर फैय्याज कागजीने त्याच्याशी संपर्क साधला. जर्मन बेकरीत स्फोटासाठी बेगला दोन लाख रुपये देण्यात आले होते.
आवाज सांगेल हा कोण ? - अबु हामजा हाच जबीउद्दीन अन्सारी असल्याचे गुप्तचर यंत्रणेचे म्हणणे आहे. 26/11 च्या हल्ल्यादरम्यान लाहोर कॅम्पमधून सॅटेलाईट फोनवरून अतिरेक्यांना सूचना देणा-या त्या व्यक्तीचा आवाज टेप करण्यात आलेला आहे. त्याची ओळख पटविण्यासाठी आवाजाची चाचणी करण्यात येईल. त्यानंतर अबु हामजा आणि अन्सारी हा एकच आहे की दोन हे स्पष्ट होईल.