आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमर पंडित, नरेंद्र पाटलांकडे आठ कोटींची संपत्ती !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 25 जुलै रोजी होणार्‍या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नरेंद्र पाटील, जयदेव गायकवाड आणि अमरसिंह पंडित तसेच भाजपच्या आशिष शेलार आणि भाई गिरकर यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारांनी दिलेल्या शपथपत्रानुसार या पाच जणांपैकी सर्वात र्शीमंत उमेदवार हे अमरसिंह पंडित असून त्यांच्याकडे एकूण सुमारे साडेआठ कोटींची स्थावर व जंगल मालमत्ता आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड, उपमुख्यमंत्री अजित पवार, बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले, तर भाजपच्या उमेदवारांचे अर्ज भरताना प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे आणि विनोद तावडे उपस्थित होते.
राष्ट्रवादीचे नरेंद्र पाटील यांनी 16 लाख उत्पन्न दाखवले असून त्यांच्याकडे रोकड 4.10 लाख रुपयांची आहे. त्यांच्या पत्नी प्राची यांच्याकडे 101 तोळे सोने असल्याचा उल्लेख प्रतिज्ञापत्रामध्ये केला आहे. त्यांची एकूण स्थावर व जंगम मालमत्ता 8.14 कोटींची आहे. राष्ट्रवादीचे दुसरे उमेदवार अमरसिंह पंडित यांनी आपल्याकडे 1.16 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता, तर पत्नीकडे 40 लाख रुपयांची मालमत्ता दाखवली आहे. त्यांच्याकडे टाटा सफारी, सुझुकी अँसेस अशा दोन गाड्या असून 1.2 लाख रुपयांचे चार तोळे सोने आहे. पत्नीच्या नावावरही तीन लाख रुपयांचे 10 तोळे सोने आहे. तसेच गेवराई, नागझरी, तलवाडा येथे 66 एकर जमीन त्यांच्या मालकीची आहे. त्यांची एकूण स्थावर व जंगम मालमत्ता 8.35 कोटी रुपये एवढी आहे. न्यायालयामध्ये त्यांच्याविरोधात सात प्रकरणे प्रलंबित असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. राष्ट्रवादीचेच जयदेव गायकवाड यांची एकूण मालमत्ता 88 लाख रुपये असून रोख 2 लाख रुपयांची रक्कम असून 30 ग्रॅम सोने आहे. त्यांच्याकडे 7.10 लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तसेच त्यांचे शिक्षण बीएएलएलबीपर्यंत झाल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये म्हटले आहे.
भाजपचे उमेदवार आशिष शेलार यांच्याकडे एकूण मालमत्ता 3.34 कोटी रुपये असून त्यांनी वार्षिक उत्पन्न 1.04 कोटी रुपये एवढे दाखवले आहे. त्यांच्याकडे 1.77 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता तसेच रोख रक्कम 53 हजार असून एक इनोव्हा आहे. त्यांच्याकडे कृषी जमीन नसून पत्नीच्या नावे रत्नागिरीमध्ये जमीन आहे. तसेच वांद्रय़ामध्ये एक कोटी रुपयांचा फ्लॅट आहे. पत्नीच्या नावे वांद्रे आणि पवई येथे दोन फ्लॅट्स आहेत. त्यांच्यावर न्यायालयामध्ये सहा खटले प्रलंबित आहेत.
भाजपचे दुसरे उमेदवार भाई गिरकर यांची एकूण मालमत्ता 93 लाख रुपये असून यांनी वार्षिक उत्पन्न 3.94 लाख रुपये दाखवले असून जंगम मालमत्ता 8.18 लाख रुपयांची असल्याचे म्हटले आहे. त्यांच्याकडे इनोव्हा गाडी व 88 हजार रुपयांचे दागिने आहेत. गिरकर व त्यांच्या पत्नीच्या नावावर जमीन नाही. गिरकर यांचे वडिलोपाजिर्त घर सिंधुदुर्गमध्ये असून कांदिवली येथे पत्नीच्या नावावर घर आहे.
या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शनिवारी शेवटची तारीख असून काँग्रेस आणि शिवसेनेला उद्याच उमेदवार जाहीर करावे लागतील.
विधान परिषद : आशिष शेलार, अमरसिंह पंडित, जयदेव गायकवाड, भाई गिरकर यांना संधी