आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विलासराव, माझे राजकीय प्रमोटर- अशोक चव्हाण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विलासराव मला आठवतात, ते शंकरराव चव्हाण यांनी 1986 मध्ये त्यांच्याकडे सहा महत्त्वाची खाती दिली त्यावेळचे. त्यांच्या त्या उमद्या व्यक्तिमत्त्वाने मलाही तेव्हा भारावून टाकले होते. त्याचवेळी मला वडिलांनी एकदा बोलता बोलता मला सांगितले होते की, मला विलासरावांमध्ये महाराष्ट्राचा उद्याचा मुख्यमंत्री दिसतोय. काय योगायोग आहे पहा, शंकररावांनी विलासरावांना सहा खाती देऊन नेतृत्वाची मुहूर्तमेढ रोवली. त्याच विलासरावांनी 1999 मध्ये माझे राजकीय प्रमोशन करून पहिल्यांदा कॅबिनेटमध्ये जागा दिली.
पहिल्यांदा त्यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले होते तो क्षणही मला आठवतो. त्यांनी मला ‘वर्षा’वर बोलावून घेतले. बंगल्याच्या मागील बाजूच्या लॉनवर ते बसले होते. फारसे गंभीर कारण नसताना मुख्यमंत्रीपद जाण्याचे दु:ख चेह-यावर असले तरी नेहमीच्याच खुलेपणाने त्यांनी माझे स्वागत केले व माझ्या पाठीवर हात टाकून म्हणाले की, तुमचे नाव मी दिल्लीला सांगणार आहे. अर्थात तेव्हा मी खूपच ज्युनियर होतो. मात्र मी एक गोष्ट कायम नमूद करेन मुख्यमंत्रीपदापर्यंत माझ्या झालेल्या प्रवासात देशमुखांचा सिंहाचा वाटा आहे. माझे आणि त्यांचे राजकीय निर्णयांबाबत काही मतभेदही झाले. मात्र शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्याशी व्यक्तिगत संबंध मात्र घरगुतीच राहिले. माझ्या प्रत्येक अडचणीच्या वेळी ते धावून आलेले आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळात काम करत असताना मला सर्वात मोठी गोष्ट शिकता आली ती म्हणजे कितीही कठीण प्रसंग समोर आला तरीही न डगमगता न घाबरता त्याला सामोरे जायचे. मुंबईतील रेल्वेमधील बॉम्बस्फोट झाले तेव्हा खरे तर प्रशासनातील अनेक अधिकारीही घाबरले होते. मात्र विलासरावांनी स्वत: त्यांना धिर दिला. मी त्यांच्यासोबत स्फोटाच्या ठिकाणी गेलो तेव्हा पोलीस, प्रशासकीय अधिकारी आणि सामान्य नागरिक यांच्याशी त्यांनी ज्या पद्धतीने संवाद साधला व या तिघांचेही मनोधैर्य वाढविले ते मी शब्दांमध्ये सांगू शकत नाही.
विलासरावांच्या अशा अकाली जाण्याने माझे व्यक्तिगत, आमच्या मराठवाड्याचे, राज्याचे आणि देशाचे अपरिमित नुकसान झाले असून ते कधीही न भरून येणारे आहे.