आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवे पुस्तक : नेमाडेंच्या ‘हिंदू’चा दुसरा भाग येतोय..

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘कित्येक शतकांपूर्वी सिंधू नदीच्या तीरावर आर्यांच्या आगमनाबरोबर एका संस्कृतीची पाळेमुळे रुजली व नंतरच्या काळात संपूर्ण भारतीय कालखंडात हिंदू संस्कृती म्हणून बहरली.’ या संस्कृतीची व्यापकता व मिर्शता आपल्या ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ या कादंबरीतून मांडणारे ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे आता ‘हिंदू’चा दुसरा भाग लिहीत असून हा भाग पहिल्या कादंबरीपेक्षा अधिक दीर्घ तर असणारच आहे, शिवाय नेमाडे पुढील तीन ते चार भागदेखील लिहिणार आहेत.

2010 मध्ये आलेल्या ‘हिंदू’ कादंबरीच्या साहित्यमूल्यापासून त्यातील आशयापर्यंत नेमाडेंच्या चाहत्यांनी व समीक्षकांनी वारेमाप चर्चा व समीक्षा केली होती. या कादंबरीला संमिर्श यश लाभले. तसेच टीकेलाही या कादंबरीला सामोरे जावे लागले होते. त्या वेळी एकूण 603 पानांच्या या कादंबरीनंतर नेमाडे दुसरा भाग लिहिणार? यावरही त्यांच्या चाहत्यात चर्चा होती. पॉप्युलर प्रकाशनाने ही कादंबरी प्रकाशित केली होती. सुभाष अवचट यांनी या कादंबरीचे मुखपृष्ठ रेखाटले होते. मोहेंजोदडो संस्कृतीपासून अत्यंत गुंतागुंतीच्या लेखनशैलीमध्ये नेमाडेंनी ही कादंबरी मांडली होती.

अलीकडेच ‘कोसला’ची 50 वर्षे पूर्ण झाल्यानंतर निघालेली आवृत्ती प्रकाशित झाल्यानंतर आता नेमाडेंनी हिंदूचा दुसरा भाग लिहायला घेतला असून या कादंबरीचे लेखन पहिल्या भागापेक्षा अधिक प्रदीर्घ असणार आहे. तसेच दुसरा भाग झाल्यावर तेवढय़ावरच न थांबता ते तिसरा व चौथा भागदेखील लिहिणार आहेत. याशिवाय त्यांचे भाषा संशोधनाविषयक लेखनही सध्या सुरू असले, तरी हिंदूच्या दुसर्‍या भागावरच त्यांचे लक्ष अधिक केंद्रित आहे. त्यामुळे नेमाडेंच्या या नव्या लेखनाबाबत त्यांच्या वाचकांमध्ये निश्चितच उत्सुकता आहे.

सहाशेच्या वर पानांची कादंबरी
वाचकवर्ग प्रदीर्घ कादंबर्‍या वाचण्यास उत्सुक नसल्याने अलीकडे कादंबर्‍यांची पृष्ठसंख्या कमी कमी होत चालली आहे. मात्र, नेमाडे यांच्या कादंबर्‍यांना स्वतंत्र वाचकवर्ग आहे. त्यामुळे हिंदूचा पहिला भाग हा 603 पानांचा असूनही दुसरा भाग यापेक्षा अधिक पानांचा असू शकतो.