आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अण्णांना भाजपचे आमंत्रण अन् घूमजाव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे जर राजकीय पक्ष काढत असतील तर त्यांनी भारतीय जनता पक्षात सामील व्हावे, असे आमंत्रण भाजपाचे मुंबई अध्यक्ष राज पुरोहित यांनी शुक्रवारी दिले. मात्र, आपले बोलणे अंगलट येण्याची चिन्हे दिसताच याबाबत पक्षाचे वरीष्ठ नेतेच निर्णय घेतील, असे सांगत त्यांनी लगोलग घूमजावही केले.
अण्णा हजारे हे भ्रष्टाचाराविरोधात लढतात. भाजपही भ्रष्टाचाराविरोधात लढतो. त्यामुळे अण्णांनी भाजपात सामील व्हावे, त्यांच्यासोबत आंदोलनासाठी आझाद मैदानात बसायची आपली तयारी आहे, असे वक्तव्य मुंबईचे भाजपाचे अध्यक्ष राज पुरोहित यांनी शुक्रवारी माध्यमांसमोर केले. त्यानंतर अण्णांशी कधी बोलणार आहात आणि पक्षप्रवेशाचे आमंत्रण कधी देणार आहात, असे विचारताच पुरोहित यांना आपले बोलणे अंगलट येण्याची चिन्हे दिसली. त्यामुळे सावध पवित्रा घेत ते म्हणाले की, अण्णा हजारे ही मोठी व्यक्ती आहे आणि त्यांच्याबाबतचा निर्णय आपले वरिष्ठ नेतेच घेतील, असे सांगून त्यांनी आपल्याच विधानावर लागलीच घुमजावही केले.
हजारेंनी रिपाइंत यावे : आठवले
मुंबई - अण्णा हजारे यांच्याविषयी आपल्याला आदर असून त्यांनी नवा पक्ष स्थापन करण्यापेक्षा रिपब्लिकन पक्षात यावे, असे आवाहन रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड म्हणाले की, अण्णा व त्यांच्या सहकार्यांनी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतल्यानंतर आणखी एका पक्षाची भर राजकारणात पडेल. लोकशाहीच्या मार्गाने प्रश्न सुटतात. राजकारणात उतरूनच प्रश्न सोडवले जाऊ शकतात. अण्णा व त्यांचे सहकारी राजकारणात उतरत असल्याचे प्रसार माध्यमातूनच समजल्याचे पिचड म्हणाले.