आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिपाइं ही लुटारूंची संघटना - गरुड

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही आता लुटारूंची संघटना झाली असून दलित जनतेच्या हक्कांकडे लक्ष देण्याऐवजी स्वत:च्याच फायद्याकडे या पक्षाचे नेते लक्ष देत आहेत. रिपाइंकडे स्वत:चे चिन्ह नाही. रामदास आठवले शिवसेना आणि भाजपच्या चिन्हासाठी काम करीत आहेत, असा आरोप बहुजन समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विलास गरुड यांनी बुधवारी केला.
मुंबई महापालिकेसाठी बसपाच्या पार्टीच्या 50 उमेदवारांची यादी बुधवारी बसपाने जाहीर केली. या वेळी गरुड म्हणाले की, मुंबई महापालिकांच्या सर्व जागांवर तसेच राज्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकाही आम्ही स्वबळावर लढवणार आहोत. मुंबईत पैसा आहे म्हणून सर्व मोठे पक्ष फक्त मुंबईवर लक्ष केंद्रित करीत आहेत. या शहराचा विकास करण्याऐवजी मुंबईला लुटण्याचे काम हे पक्ष करीत आहेत आणि आम्ही आमच्या प्रचारात याच मुद्द्यावर भर देणार आहोत. रिपाइंला स्वत:चा चेहरा नाही. रामदास आठवले पूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या चिन्हासाठी काम करायचे आणि आता शिवसेना-भाजपच्या चिन्हासाठी काम करीत आहेत. त्यांना खासदारकी पाहिजे म्हणूनच ही सर्व धडपड सुुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.