आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Demand Restart Sukanya Scheme Made To Ajit Pawar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुकन्येच्या जन्मासाठी अजित पवारांना साकडे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यातील मुलींचा जन्मदर वाढावा आणि मुलगी आई-वडिलांना भार वाटू नये, यासाठी राज्य सरकारच्या महिला बालकल्याण विभागाने मांडलेल्या सुकन्या नावाच्या योजनेला निधी नसल्याचे कारण देत अर्थमंत्र्यांनी खो घातला आहे. त्यामुळे ही महत्त्वाकांक्षी योजना बासनात गुंडाळण्याची वेळ महिला बालविकास विभागावर आली आहे. राज्यात सध्या निदर्शनास आलेल्या भ्रूणहत्यांच्या पार्श्वभूमीवर मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी या योजनेचा पुनर्विचार करावा, अशी मागणी महिला बालविकास मंत्र्यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
राज्यातील भ्रूणहत्येचे मुख्य कारण लोकांना वंशाला दिवा हवा असण्याचे असले तरी त्यापाठोपाठ जन्माला येणारी मुलगी अनेकांना भार वाटत असते. या कारणापायी मुलींच्या भ्रूणहत्या होऊ नयेत, यासाठी मुलगी जन्माला येताच तिच्या नावे काही रकमेची ठेव ठेवण्याची आणि त्या मुलीला अठरा वर्षांनंतर देण्याची योजना महिला बालविकास विभागाने सुकन्या या नावाने आणली. अशाप्रकारची योजना ही देशातील काही राज्यांमध्ये सध्या राबवली जाते आहे. त्याच धर्तीवर असलेल्या योजनेंतर्गत दरवर्षी जन्माला येणा-या 2 लाख 26 हजार मुलींना प्रत्येकी पाच हजार रुपये जन्मताच त्यांच्या नावे ठेवले जावेत. हे पैसे सदर मुलीला तिच्या अठराव्या वर्षी 40 हजार रुपये इतके दिले जातील, असे या योजनेचे स्वरूप होते. तसेच ही योजना दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे आणि अनुसूचित जाती आणि जमातींसाठी राबवली जावी, अशी सूचना या विभागाने वित्त विभागाकडे ठेवली होती. या योजनेसाठी दरवर्षी 140 कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता होती. मात्र, वित्त विभागाने या योजनेचाही जन्मण्यापूर्वीच गळा घोटण्याचे प्रयत्न केला. राज्यात विशेषत: बीड आणि मराठवाड्यात होत असलेल्या भ्रूणहत्या पहाता भविष्यात तरी ही योजना मार्गी लागावी आणि यासाठी ही योजना सुरू करण्याबाबत विचार करावा, अशी विनंती महिला बालविकास मंत्री वर्षा गायकवाड यांनी लेखी पत्राद्वारे वित्तमंत्र्यांकडे केली आहे.
गर्भपात करताना महिलेचा मृत्यू, डॉ. मुंडे दांपत्यास अटक