आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्यापेक्षा अशोक चव्हाण बरे होते - एकनाथ खडसे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्य सरकारवर टीका करण्यासाठी काही घडतच नाही. कारण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण निर्णय घेत नाहीत. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांची व्यथा आपण बोलून दाखवत आहोत, अशी जोरदार टीका विधानसभा विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी सोमवारी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान केली. तुमच्यापेक्षा अशोक चव्हाण बरे, असे म्हणण्याची वेळ आता तुमच्याच आमदारांवर आली असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले.
मुख्यमंत्री स्वच्छ माणूस आहे. पैसे, भूखंड, बदल्या अशा कोणत्याही वादात ते नाहीत, असे विरोधी पक्ष म्हणून मी त्यांना प्रमाणपत्र देतो. पण स्वत: काहीही न करता इतर मंत्र्यांना मात्र त्यांनी भ्रष्टाचार करण्याची सूट त्यांनी दिल्याचे दिसते. एका पत्रकाराने आपल्याला विचारले की, तुम्ही पहिल्यासारखे सरकारविरोधी, आक्रमक भूमिका घेत नाहीत. सरकारमध्ये काही टीका करण्यासारखे घडतच नाही. कारण मुख्यमंत्री निर्णय घेत नाहीत, असे खडसे म्हणाले. या चर्चेच्या वेळी मुख्यमंत्री उपस्थित होते. त्यांना उद्देशून खडसे म्हणाले की, आता तरी निर्णय घ्या हो. तुमचे आमदारच नाराज आहेत.
राज्य सरकारवर विविध प्रकरणांत न्यायालयांनी ताशेरे ओढल्याची यादीच खडसे यांनी आपल्या भाषणामध्ये यावेळी वाचून दाखवली. आदर्श सोसायटी, सुभाष घई यांना दिलेली जमीन, पवई येथे हिरानंदानी बिल्डर प्रकरण, रेशनकार्डांच्या संगणकीकरणात झालेला घोटाळा, अफझल खानाचे थडगे तोडण्याबाबत, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या वेळी जात पडताळणीबाबत घेतलेला निर्णय आदींचा त्यांनी यावेळी उल्लेख केला. मंत्रिमंडळातही समन्वय नसल्याचे सांगत खडसे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री नारायण राणे व गृहमंत्री आर. आर. पाटील आणि वनमंत्री पतंगराव कदम यांनी एकमेकांवर केलेल्या आरोपांची या वेळी आठवण करून दिली. सिंचनाच्या प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत त्यांनी मुख्यमंत्र्यांना निविदा तपासून पाहायला सांगितल्या. मुंबईसाठी 10 धरणे बांधायचा निर्णय झाला होता. त्यातील एका धरणासाठी निविदा न काढताच त्याची उंची वाढवायचा निर्णय झाल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच राज्याचे क्रीडा धोरण, युवा धोरण, आदिवासी विकास, नक्षलवाद याबाबत राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये काहीच मुद्दे नसल्याचे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी राज्यामध्ये झालेल्या 50 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यांची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. शेकापच्या आमदार मीनाक्षी पाटील यांनी मुरुडच्या समुद्रामध्ये शाहीद बलवाचा बंगला होऊ शकतो तर शिवाजी महाराजांच्या स्मारकाला परवानगी का नाही, असा सवाल उपस्थित केला. अबू आझमी यांनी गेली तीन वर्षे हाज कमिटीची स्थापना झाली नसून अल्पसंख्याकमंत्री काय करतात, असे विचारले.
मंत्र्यांच्या संस्थांना कोट्यवधींच्या निधीची खैरात - एकनाथ खडसे