आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्त्री भ्रूणहत्या : सुदाम मुंडे प्रकरण तडीस नेऊ- आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- स्त्री भ्रूणहत्येप्रकरणी बीड येथील डॉ. सुदाम मुंडे आणि सरस्वती मुंडे यांचे नोंदणीकरण रद्द करण्यात आले असून त्यांच्यावर शेवटपर्यंत कारवाई केली जाईल, असे आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी विधान परिषदेत ठामपणे सांगितले. तसेच सुदाम मुंडे यांच्यावर कारवाई करताना कोणाच्याही दबावाखाली झुकणार नाही, असेही त्यांनी नियम 260 अन्वये उपस्थित केलेल्या स्त्री भ्रृण हत्येच्या चर्चेला उत्तर देताना स्पष्ट केले.
विनोद तावडे, दिवाकर रावते, पांडुरंग फुंडकर, रामदास कदम आदि सदस्यांनी हा प्रस्ताव सभागृहात मांडला होता. त्याला उत्तर देताना शेट्टी यांनी सांगितले की, एमटीपी कायद्यानुसार 12 ते 20 आठवड्यापर्यंत महिलेला गर्भपात करता येतो. परंतु या कायद्याचे उल्लंघन होत आहे. सोनोग्राफीच्या एफ फॉर्मबद्दल भ्रम निर्माण केलेला आहे. फॉर्म एफ फक्त गर्भवती महिलेची सोनोग्राफी केली तर भरावा लागतो. अन्य विकारांच्या सोनोग्राफीसाठीतो फॉर्म भरण्याची गरज नाही.
सोनोग्राफी मशीन्स सील
बीडमधील प्रकरणापूर्वीच आम्ही सोनोग्राफी केंद्राविरोधात मोहीम सुरु केली होती. 1 जून ते 30 जून 2011 दरम्यान 352 मशीन सील केल्या तर बीड घटनेनंतर 111 मशीन सील केल्या. यात दोषी आढळलेल्या सुदाम मुंडे, सरस्वती मुंडे यांच्यासह अनेक डॉक्टरांची नोंदणीही रद्द करण्यात आली आहे. मुंडे यांच्या इस्पितळात प्रिंटेड प्रिस्क्रिप्शन सापडल्याची माहितीही त्यांनी दिली.
सोनोग्राफी मशीन तयार करणा-या कंपन्यांच्या अधिका-यांशी आरोग्य विभागाच्या मुख्य सचिवांनी बैठक घेऊन रोजच्या रोज मशीन विक्रीची माहिती देण्यास सांगितले आहे. कायद्याने हे बंधनकारक आहेच. फक्त नवीन मशीनच नव्हे तर जुन्या मशीनची पुनर्विक्री आणि अ‍ॅसेम्बल केलेल्या मशीनच्या विक्रीची माहितीही आरोग्य विभागाला द्यावी असे सांगण्यात आल्याचेही आरोग्य मंत्र्यांनी सांगितले.
महिला आमदार आग्रही- स्त्री भृण हत्यांबाबत सभागृहात चर्चा करण्यात सर्वपक्षीय महिला आमदार आग्रही होत्या. शिवसेना सदस्या नीलम गो-हे यांनी हेल्थ गार्ड नेमावेत, एमटीपी कायद्यात बदल करावा असे सांगितले. दीप्ती चवधरी यांनी सासु-सासरे, आई-वडिल, नव-याच्या दबावामुळे महिला स्त्री भ्रृण हत्येला तयार होतात. अशा स्त्रियांचं त्यांच्या कुटुंबियांचं समुपदेशन होणं गरजेचं आहे असे सांगितले. विद्या चव्हाण डॉ. दीपक सावंत, ऊषाताई दराडे, अलका देसाई, शोभा फडणवीस, डॉ, रणजीत पाटील, धनंजय मुंडे, राजन तेली या सदस्यांनीही चर्चेत भाग घेतला.