आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • I Am Not Responsibal For Mantralaya Fire Chagan Bhujbal

आगीला मी जबाबदार नाही : छगन भुजबळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आगीबाबत प्रसारमाध्यमांसह काही लोक मला लक्ष्य करीत आहेत. माझ्या विभागाच्या अखत्यारीतील अग्निशमन विभागाचे अपयश असल्याचे बोलले जात आहे, मात्र, यात मी अथवा माझा विभाग दोषी नाही, असा स्पष्ट निर्वाळा सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिला. आग लागल्यानंतरच्या चार दिवसांत मंत्रालयाच्या बाह्यरूप रंगरंगोटी करून आणि आतील भागाची साफसफाई करून आपल्या विभागाने कार्यक्षमता सिद्ध केल्याचे भुजबळ म्हणाले.
मंत्रालयाच्या आवारात 2 लाख 25 हजार लिटर पाण्याची टाकी आहे तर गच्चीवर 35 हजार लिटरच्या चार टाक्या असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. हेच पाणी अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझविण्यासाठी वापरल्याचे सांगून या तुटपुंज्या कर्मचा-यांकडून एवढ्या मोठ्या आगीला सामोरे जाण्याची अपेक्षा कशी काय करणार, असा सवालही त्यांनी केला.
या कर्मचा-यांनी त्यांना शक्य असलेल्या गोष्टी म्हणजे वीज आणि एसीचे कनेक्शन बंद करण्याचे काम केले होते, त्यामुळे या आगीला माझा विभाग अथवा मी जबाबदार असल्याचा जावईशोध कुणी लावू नये, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
तर एका मजल्यावर लागलेली आग विझवण्याऐवजी ती आग वाढू द्यायला कोण जबाबदार आहे याचा शोध घ्यावा, शक्य असतानाही स्नॉर्केल का आल्या नाहीत,असे सांगून त्यांनी आपल्या कोर्टातील संशयाचा चेंडू अग्निशमन दलाच्या कोर्टात टोलवला.
विभागात सातच कर्मचारी - माझ्या विभागाअंतर्गत येणा-या अग्निशमन विभागाचे हे अपयश असल्याचे सातत्याने सांगण्यात येत असल्याने आपण या विभागातील कर्मचा-यांना भेटून माहिती घेतली. मात्र सत्य परिस्थिती ऐकून आपल्याला धक्काच बसला, कारण या विभागात केवळ सात कर्मचारी असल्याचे त्यांनी सांगितले. यापैकी एकमेव अधिकारी प्रशिक्षित आहेत, तर बाकीचे सहा जण नागरी संरक्षण दलाचे जवान आहेत. त्यापैकी प्रत्येकी दोघेजण एका पाळीत काम करीत असतात. त्यांना केवळ पाणी कुठे आहे याचीच माहिती नसल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
पालिकेचे अग्निशमन दल घेणार झाडाझडती - आगीच्या जबाबदारीबाबत टोलवाटोलवी सुरू असतानाच पालिकेच्या अग्निशमन विभागाच्या ढिसाळ कामगिरीवर बोट ठेवण्यात येत आहे. त्यामुळे मुंबई पालिकेच्या अग्निशमन दलाकडून मंत्रालय आगीविषयी एक अहवाल तयार करण्यात येणार आहे, अशी घोषणा आयुक्त सीताराम कुंटे यांनी केली. मनोरा निवासाजवळील पालिकेचे फायर स्टेशन हाकेच्या अंतरावर आहे. असे असतानाही अग्निशमन दलाच्या गाड्या उशिराने का पोहोचल्या, असा प्रश्न मंत्र्यांकडून उपस्थित केला जात आहे. त्यावर गाड्या तात्काळ आल्या पण बंब इमारतीजवळ नेण्यासाठीचा रस्ता मंत्र्यांच्या गाड्यांनी अडलेला होता, असे अग्नीशमन दलाचे म्हणणे आहे.
मंत्रालयात आता अग्निरोधक फर्निचर