आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जैतापूर प्रकल्पाचा विरोध मावळला; पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भारत महासत्तेच्या उंबरठ्यावर असला तरी आपला दरडोई वीजवापर केवळ 700 युनिट आहे. चीनसारखा प्रतिस्पर्धी 10 लाख मेगावॅट वीज निर्मिती क्षमता बाळगून असताना आपण सव्वादोन लाखांपर्यंत अडखळतो. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला कोकणवासीयांचा विरोध मावळल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

‘जैतापूरचे अणुमंथन’ या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी सहृ्याद्री अतिथिगृहात चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी ‘दिव्य मराठी’चे मुख्य संपादक कुमार केतकर, जैतापूर प्रकल्पाचे मुख्य अधिकारी संदीप सिंगारॉय, ग्रंथाचे लेखक राजा पटवर्धन, ग्रंथाली प्रकाशनाचे सुरेश हिंगलासपूरकर आदी उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले, देशात कोळशापासून 68 टक्के वीज निर्माण होते. औष्णिक प्रकल्पातून बाहेर पडणार्‍या राखेमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. नैसर्गिक वायूही आपल्याकडे नाही. देशात केवळ 20 अणुभट्ट्या असून त्यात 2 टक्के वीज निर्मिती होते. अशा काळात देशासमोरील इंधन समस्या गडद झाल्याची माहिती त्यांनी दिली. इंधनासाठी आपण 85 टक्के क्रूड तेल आयात करतो. आखातातील परिस्थिती चिघळल्यास देशासमोर मोठे संकट निर्माण होईल. देशाचा विकास गतिमान करण्यासाठी अणुऊर्जेला कोणताही पर्याय नाही. जैतापूर प्रकल्पाला राजकीय पक्षांचा विरोध परकीयांच्या इशार्‍यावर होता, असा आरोप उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केला. राणे यांनी कोणाच्याही नावाचा उल्लेख न करता शिवसेनेला चिमटे काढले. प्रकल्पासाठी संपादित केलेली जमीन संपूर्ण कातळाची आहे. मात्र, प्रसिद्धिमाध्यमांनी हापूस बागांचा सत्यानाश होईल, असे चित्र रंगवले.

विरोधाला राजकिय आधार नव्हता: केतकर
जैतापूर प्रकल्पाच्या विरोधाला भौगोलीक-राजकीय आधार नव्हता. मात्र, अँटी काँग्रेस आणि राणे विरोध यासाठी विरोधी पक्षांनी जैतापूरचा लढा रस्त्यावर आणला. अणुऊर्जेमध्येही वैज्ञानिकांचे राजकारण असते.जैतापूर प्रकल्पाने राजकारणांच्या सर्व परिक्षा पार केल्याचे दिव्य मराठीचे मुख्य संपादक कुमार केतकर यांनी सांगितले. जैतापूर अणुमंथन पुस्तक लेखकाचे वैज्ञानिक आत्मचरित्र आहे, असा गौरवही त्यांनी केला.