आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Vidhanparishad Election Congress And Ncp Intrested In Three Seats

विधान परिषद : आशिष शेलार, अमरसिंह पंडित, जयदेव गायकवाड, भाई गिरकर यांना संधी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- विधान परिषदेच्या 25 जुलै रोजी होणा-या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपने गुरुवारी उमेदवार जाहीर केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांना राष्ट्रवादीने संधी दिली असून, भाजपमध्ये गडकरी-तावडे गटाचे वर्चस्व आहे. राष्ट्रवादीने नरेंद्र पाटील, पुण्याचे जयदेव गायकवाड आणि गेवराईचे अमरसिंह पंडित यांना उमेदवारी दिली आहे. भाजप उमेदवारांमध्ये आशिष शेलार, भाई गिरकर यांचा समावेश आहे. गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय लातूरचे पाशा पटेल यांना पक्षाने उमेदवारी नाकारली.
नरेंद्र पाटील अण्णासाहेब पाटील यांचे पुत्र आहेत. गायकवाड यांना प्रीतमकुमार शेगावकर यांच्या जागी उमेदवारी मिळाली आहे. गायकवाड हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळचे मानले जातात. अमरसिंह पंडीत हे अलीकडेच भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले आहेत. पंडित हे गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक होते, पण भाजपच्या अंतर्गत कारभाराला कंटाळून त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. पंडित आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. भाजपमध्ये असतानाही ते आमदार होते. बीड मतदारसंघातून निवृत्त झालेल्या उषा दराडे यांच्या जागी पंडित यांची वर्णी लावण्यात आली. तिन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीला 75 मतांची गरज असून पक्षाची 62 आणि 13 अपक्ष मते त्यांच्याकडे आहेत.
भाजपमधून गडकरी-तावडे गटाने आपल्या मर्जीतील उमेदवारांना तिकिटे दिली असून गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक पाशा पटेल यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. आशीष शेलार हे मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपचे गटनेते होते. त्यांनी गेल्या वेळी वांद्रे येथून विधानसभा निवडणूक लढवली होती. पण काँग्रेसच्या बाबा सिद्धीकी यांनी त्यांचा पराभव केला. त्यामुळे त्यांना विधानपरिषदेच्या माध्यमातून राजकारणामध्ये आणण्याचा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांचा प्रयत्न आहे. भाई गिरकर हेसु्द्धा तावडे गटाचे असून त्यांच्या पत्नी गेल्यावेळी मुंबई महापालिकेच्या उपमहापौर होत्या. युती सरकारमध्ये गिरकर यांनी राज्यमंत्री म्हणूनही काम पाहिले आहे. मात्र भाजपकडे 46 मते असून दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी चार मते कमी पडतात. मनसेची सहा मते आपल्या बाजूला पडतील, असा दावा पक्षातर्फे केला जात आहे.
नार्वेकरांचे नाव मागे- शिवसेना व काँग्रेसचे उमेदवार आज जाहीर होतील. त्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण दिल्लीला गेले आहेत. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांचे नाव मागे पडले असून माजी आमदार अनिल परब, विनायक राऊत यांची नावे चर्चेत आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याची 14 जुलै शेवटची तारीख आहे.
मुंडे यांचे कट्टर समर्थक पाशा पटेलांचा पत्ता कट
विधानपरिषद निवडणूक रंगतदार , काँग्रेस चार जागा लढविण्याच्या तयारीत