आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्रालय इमारत सुरक्षितच; केवळ डागडुजी करण्याची गरज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मंत्रालयाचे चार मजले आगीत भस्मसात झाल्यानंतर सरकारतर्फे करण्यात आलेल्या सुरक्षेचा अहवाल प्राप्त झाला असून त्यात मंत्रालयाची इमारत सुरक्षित असल्याचा दावा करण्यात आल्याचे मदत आणि पुनर्वसन खात्याचे प्रधान सचिव प्रवीणसिंग परदेशी यांनी सांगितले. या अहवालानुसार मंत्रालयाची इमारत पाडण्याची गरज नसून केवळ काही डागडुजी केली जाईल, तर काही महत्त्वाचे विभाग अन्यत्र हलवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आगीनंतर मंत्रालयाच्या इमारतीची अवस्था जाणून घेण्यासाठी सरकारने दोन सुरक्षा यंत्रणांच्या साहाय्याने तपासणी करण्याचा निर्णय घेतला होता. यात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्राध्यापक रवी सिन्हा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने अलोक गोयल यांच्या समितीने मंत्रालयाचा पाहणी अहवाल सरकारला सादर केला. या अहवालानुसार मंत्रालयाच्या तळमजल्यापासून तिस-या मजल्यापर्यंत कसलाही धोका नाही. चौथ्या ते सातव्या मजल्यांची वाताहत झाली असली तरी ते पाडण्याची गरज नाही, तर ते दुरुस्त करावेत, असा सल्ला या अहवालात देण्यात आला आहे. त्यामुळे मंत्रालयाचे पुनर्निर्माण करण्याची शक्यता सध्या तरी मावळली आहे. हे अहवाल प्राप्त झाले असले तरी राजा आणि कंपनीकडून अद्याप रासायनिक चाचणी अहवाल प्राप्त झाला नसल्याचे परदेशी यांनी सांगितले.
खाक झालेल्या विभागांची तात्पुरती व्यवस्था - मंत्रालयातील गृह विभागाचा 18500 चौ. फुटांचा भाग आगीत जळाला आहे. महसूल आणि वन विभागाचा 14774 चौ. फुटांचा भाग भस्मसात झाला आहे, तर सामान्य प्रशासन विभागाचा 11743 चौ. फुटांचा भाग जळाला असून नगरविकास विभागाचा 6576 चौ. फुटांचा भाग जळाला असल्याचे समजते. या विभागांची तात्पुरती व्यवस्था अन्य इमारतींमध्ये करण्यात आली असून कफ परेड येथील एमटीएनएलच्या कार्यालयातील 24600 चौ. फुटांच्या क्षेत्रावर गृह विभागाचे कार्यालय थाटण्यात येणार आहे, एमटीएनएलच्याच कूपरेज येथील 25000 चौ. फुटांच्या जागेत आरोग्य आणि नगरविकास, तर वर्ल्ड ट्रेड सेंटर येथील 42500 चौ. फुटांच्या जागेवर महसूल विभागाचे कार्यालय थाटण्यात येणार असल्याचे परदेशी यांनी सांगितले.
आगरोधक कार्यालये उभारा : मुख्यमंत्री - मंत्रालयातील कोणत्याही दालनात आगरोधक प्लायवूड अथवा अन्य आगरोधक साधनांची उपलब्धता नसल्याने भीषण आगीला सामोरे जावे लागले होते. आता नव्याने कार्यालयांची उभारणी करताना आगरोधक साहित्य वापरण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार नव्या दालनांसाठी आगरोधक साहित्याचा वापर करण्यात येणार असून त्यात विजेच्या तारा, काँक्रीट विनायल तसेच आग प्रतिबंधक रंगाचा समावेश करण्यात येणार असल्याचे परदेशी यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्याकडून मोरे कुटुंबीयांचे सांत्वन - मंत्रालयास लागलेल्या भीषण आगीमध्ये मृत्युमुखी पडलेले मुख्यमंत्र्याचे चोपदार मोहन मोरे व मंत्रालयातील निवृत्त कर्मचारी तुकाराम मोरे यांच्या कुटुंबीयांचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी त्यांच्या घरी जाऊन सांत्वन केले. त्यांना सर्व प्रकारच्या मदतीचे आश्वासन दिले. या वेळी मुख्यमंत्र्यासोबत राज्यमंत्री राजेंद्र गावित आणि माजी आमदार मुज्जफर हुसैन होते.