आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mantralaya Fire Reason Is Use Of Plywood For Office Decoration

मंत्रालय अग्नितांडव; सजावट भोवली, प्‍लायवूडने केला घात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मंत्रालयाला आग लागल्यानंतर हतबल होऊन केवळ बघ्याची भूमिका घेणा-या सरकारनेच ही वेळ ओढवून घेतल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आपल्या दालनांच्या सजावटीसाठी मंत्र्यांनी केलेला प्लायवूडचा बेसुमार वापर या दुर्घटनेस कारणीभूत ठरला. विशेष म्हणजे मंत्रालयाचे अग्निशमन ऑडिट पाच वर्षांपूर्वी म्हणजे 2007 मध्ये झाले होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
चौथ्या मजल्यावरील सर्व्हर रूममध्ये लागलेली आग रोखण्यात अपयश आल्याने चार मजले भस्मसात झाले. यास सरकारच जबाबदार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सुरक्षेचे ऑडिट झाले त्या वेळी 32 जागा धोकायदायक असल्याने त्यांची दखल घ्यावी, असे त्यात म्हटले होते. त्यानंतर सरकारने ऑडिट केले नाही. मात्र, सुरक्षेच्या उपायांसाठी सार्वजनिक विभागाचे निवृत्त मुख्य सचिव एन. व्ही. मेरानी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. समितीने सरकारला दिलेला अहवाल अद्याप धूळ खात असून त्याची अंमलबजावणी केली असती तर ही वेळ आली नसती असा दावा विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केला आहे.
अग्निशमन दलाच्या अधिका-याने सांगितले की, मंत्रालयात वेगाने आग पसरली. कारण मंत्र्यांनी आणि सचिवांनी दालनांचे नूतनीकरण करताना सजावटीसाठी व्हिनाइल व प्लायवूडचा बेसुमार वापर केला. त्यातच अनेक दालनांमध्ये अतिरिक्त दिव्यांची आणि वातानुकूलित यंत्रांची बटनेच सापडत नव्हती. हव्यासापोटी लावण्यात आलेल्या गोष्टींमुळे नकळत लाक्षागृहच मंत्र्यांनी उभारल्याचे या अधिका-याने सांगितले. भिंती होत्या तिथे आगीचा फारसा फटका बसला नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळेच मुख्यमंत्री आणि किरण परदेशी यांची दालने बचावली असे ते म्हणाले.
दुर्घटनेतील मृतांचा आकडा पाच
दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढून पाच झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री चव्हाण यांनी दिली. त्यात एका मंत्रालय कर्मचा-याचा समावेश आहे. बारामतीतील दोघांचा मृत्यू झाल्याचे गुरुवारीच स्पष्ट झाले होते. त्यानंतर अकोला येथील शिवाजी कोरडे यांचाही मृतदेह सहाव्या मजल्यावर सापडला. मंत्रालयाचे कर्मचारी तुकाराम मोरे सहीसलामत मंत्रालयातून बाहेर पडले होते. मात्र, त्यांचे कोणी नातेवाईक वर अडकल्याने ते पुन्हा मंत्रालयात गेले आणि त्यानंतर दोघांचाही मृत्यू झाला, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यातील दुस-या मृताचे नाव मोहन मोरे आहे.
सर्व मंत्र्यांचे दौरे रद्द; ऑडिटपर्यंत प्रवेशबंद
मंत्रालयाला लागलेल्या आगीमुळे काही विभागांचा कारभार इतरत्र हलवावा लागणार असून सोमवारपासून कामकाज सुरू होईल, असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी व्यक्त केला.
आगीमध्ये दोन हजार संगणक जळाले असून त्याच्या हार्डडिस्क वाचवण्यासाठी नॅसकॉम, केपीएमजी, एनआयसी आणि परदेशी तज्ज्ञांशी आपण चर्चा करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आदर्श प्रकरणातील फाइल्स हरवल्यानंतर सर्व फाइल्स ई-स्कॅन करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे स्कॅन झालेल्या फाइल्सची सर्व माहिती विस्तारित (अ‍ॅनेक्स) भागातील सर्व्हरमध्ये असल्याने त्याला धक्का लागलेला नाही. मात्र, कोणत्या विभागाच्या किती फाइल्स भस्मसात झाल्या याचा अंदाज बांधणे कठीण असून, विभागाचे अधिकारीच माहिती देऊ शकतील, असे ते म्हणाले. प्रत्येक विभागाचे नुकसान तपासण्याची जबाबदारी सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव एस. एस. मीना यांना देण्यात आली आहे. स्ट्रक्चरल ऑडिट होईपर्यंत इमारतीमध्ये कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला धक्का लागला नाही. त्यामुळे षड्यंत्र असल्याच्या वृत्ताचा मुख्यमंत्र्यांनी इन्कार केला. आपल्या अँटी चेंबरची भिंत मजबूत असल्याने फर्निचरला झळ पोहोचली नाही. टेबलवरील कागदी पॅड जळाले. तेथे कागदपत्रे नव्हती. त्यामुळे फाइल्स नष्ट होण्याचा प्रश्नच नाही, असे ते म्हणाले. मंत्र्यांचे दौरे रद्द करण्यात आले असून, अधिवेशन नियोजित वेळेतच होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सोमवारपासून कारभार सुरू
- कार्यालये विस्तारित मंत्रालय, विधिमंडळ, वरळी डेअरी, जी. टी. रुग्णालयाची नवीन इमारत, एमटीएनएल व वास्तानी चेंबर्स या ठिकाणी हलवणार
- मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री विधानभवनामध्ये बसतील. इतर मंत्री विधानभवनातल्या कार्यालयामध्ये बसतील. इतरत्र असलेल्या कार्यालयांत अधिकारी, कर्मचारी बसतील.
- पीडब्ल्यूडी, बांधकाम भवन, प्रकाशगड, आरोग्य भवन, हाउसिंग फायनान्स कॉर्पोरेशन यांचा यात समावेश.
- नगरविकास मुंबई पालिकेतून, जनसंपर्क विभाग न्यू अ‍ॅडमिनिस्ट्रेशन इमारतीतून काम करील.
मंत्रालयाच्‍या दुरुस्तीसाठी 60 कोटी खर्च
राज्‍याचे विधानभवनही असुरक्षित
न्यायालयीन चौकशी करा, भाजपाध्यक्ष नितीन गडकरी यांची मागणी
बारामतीकरांनी दिला दोन मित्रांना अखेरचा निरोप
मंत्रालयाची सुरक्षा यंत्रणाच तोकडी