आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Municipal Corporation Election Shiv Sena, Bjp & Rpi Mahayuti

अखेर महायुतीचे घोडे गंगेत न्हाले; बाळासाहेब राहणार स्‍टार प्रचारक

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीच्या जागावाटपात एका वाढीव जागेसाठी रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले अडून बसल्याने महायुतीची अधिकृत घोषणा लांबली होती. परंतु आठवलेंची समजून काढण्यात भाजप नेत्यांना यश आल्याने अखेर गुरुवारी महायुतीच्या जागावाटपाची घोषणा करण्यात आली. शिवसेना 135, भाजप 63 जागांवर उमेदवार उभे करणार आहे, तर रिपाइं ठरल्याप्रमाणे 29 जागांवर मिळणार आहेत. महापालिकेच्‍या या रणधुमाळीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेचे स्‍टार प्रचारक राहणार आहेत. मुंबई आणि ठाणे येथे ते प्रत्‍येकी एक सभा घेणार असल्‍याचे स्‍वतः बाळासाहेबांनी एका मुलाखतीत सांगितले होते. त्‍यानंतर उद्धव ठाकरे यांनीही यास दुजोरा दिला.
शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी 11 जानेवारी रोजी महायुतीची घोषणा करू असे सांगितले होते, परंतु आठवले यांनी एका वाढीव जागेसाठी हट्ट धरल्यामुळे ठरलेल्या वेळेत घोषणा होऊ शकली नव्हती. गुरुवारी भाजपचे विनोद तावडे, अतुल भातखळकर आणि सुधीर मुनगंटीवार यांनी वांद्रे येथील रामदास आठवले यांच्या बंगल्यावर जाऊन त्यांची समजूत काढली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चेंबूरच्या जागेवर आठवले हट्ट धरून होते. ही जागा भाजपची आहे. भाजप नेत्यांनी आठवले यांची समजूत काढली आणि विधानसभा, लोकसभा निवडणुकीत रिपाइंचा नक्की विचार करू असे आश्वासन दिले. त्यावर समाधान झालेल्या आठवले यांनी 29 जागा मान्य केल्या व महायुतीच्या घोषणेचा मार्ग मोकळा झाला.
शिवसेना भवन येथे आयोजित बैठकीस शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, मनोहर जोशी, सुभाष देसाई इत्यादी नेत्यांबरोबरच रिपाइंचे रामदास आठवले, अविनाश महातेकर, भाजपचे सुधीर मुनगंटीवार, राज पुरोहित, अतुल भातखळकर यांच्यासह तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.
उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्राच्या भविष्यासाठी अत्यंत आवश्यक असलेला निर्णय आज आम्ही सगळ्यांनी घेतला असून मुंबई महापालिकेसाठी महायुतीची घोषणा करताना मला आनंद होत आहे. भीमशक्ती-शिवशक्ती एकत्र येण्याचे जे स्वप्न पाहिले होते ते या निमित्ताने पूर्ण होत आहे. महायुती महाराष्ट्रात चमत्कार घडवेल. ही युती फक्त निवडणुकीसाठी नाही तर राज्यातून काँग्रेस-राष्ट्रवादीला कायमचे उलथवून टाकण्यासाठी झाली आहे.
युती सत्यासाठी : मुनगंटीवार
आठवले म्हणाले की, आम्हाला 30 जागा हव्या होत्या परंतु काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता उलथवून टाकण्यासाठी आम्ही एकत्र आल्याने जागेच्या मुद्दय़ावरून ताणून धरण्यात अर्थ नव्हता म्हणून आम्ही 29 जागा मान्य केल्या आहेत. दोन्ही काँग्रेस एकत्र आल्यामुळे त्यांच्या मतांची टक्केवारी कमी होणार असल्याने आम्हीच सत्तेवर येणार असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. मुनगंटीवार म्हणाले की, सत्तेसाठी दोन्ही काँग्रेसनी आघाडी केली आहे तर आम्ही तिघांनी सत्यासाठी महायुती केली आहे.
रिपाइंमध्ये धुसफूस
दलित पॅँथरचे ज्येष्ठ नेते आणि कवी नामदेव ढसाळ यांना गुरुवारच्या बैठकीलाही न बोलावल्याने त्यांनी आपला मार्ग मोकळा असल्याचे सूतोवाच केले आहे. त्याचबरोबर चेंबूरची जागा न मिळाल्याने दीपक निकाळजेही बैठकीतून उठून गेल्याने रिपाइंमध्ये जागावाटपावरून धुसफूस सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. आठवले यांनी मात्र असे काही नसून ढसाळ यांची समजूत काढू आणि निकाळजे यांना एका बैठकीला जायचे असल्याने ते निघून गेले असल्याचे सांगितले.
रिपाइंला मुस्लिम प्रभाग
शिवसेना-भाजपने रिपाइंला 29 जागा दिल्या असल्या तरी त्यातील 20 जागा मुस्लिमबहुल मतदारांच्या असल्याने त्या जागांवर रिपाइंला विजय मिळवणे कठीण जाणार असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. ‘आठवले साहेबांनी मोठय़ा रुबाबात 29 जागा घेतल्याचा डंका पिटला, मात्र यातील बहुतांश जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादीचाच जनाधार अधिक असल्याने आपल्या तोंडाला पानेच पुसली,’ अशा प्रतिक्रियाही कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहेत.
महायुती ते इंदू मिल अस्मितांचे आविष्कार
राष्ट्रीय स्तरावर महायुती झाली तरी महाराष्‍ट्रात मात्र उदासीनता
युती, महायुती, आघाणी आणि कार्यकर्त्यांची कुचंबणा!