आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधानांचे ईशान्य राज्यांकडे दुर्लक्ष: मोदी यांचे टीकास्‍त्र

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंग आसाममधून राज्यसभेवर निवडून जात असताना ईशान्येमधील इतर राज्यांच्या विकासासाठी मात्र त्यांनी प्रयत्न केले नसल्याची टीका गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केली. ईशान्येकडील राज्यांच्या विकासासाठी आराखडा बनवण्याची आठवण पंतप्रधानांना 2008 मध्ये झाली. पण आज 2012 उजाडले तरी त्यांचा अभ्यास सुरूच आहे, अशी खोचक प्रतिक्रिया मोदी यांनी दिली. 'माय होम इंडिया' या ईशान्येकडील राज्यांसाठी काम करणा-या संस्थेने आयोजित मुंबईतील एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.
अणु ऊर्जा ही आजच्या काळामध्ये सगळ्यात सुरक्षित मानली जाते आणि त्यासाठी लागणा-या युरेनियमचा साठा या ईशान्येकडील राज्यांमध्ये आहे. ते युरेनियम मिळवण्यासाठी देशाच्या अर्थसंकल्पामध्ये तरतूदही केलेली होती. पण मनमोहन सिंग अर्थमंत्री झाल्यावर त्यांनी ती तरतूद बंद केली आणि पंतप्रधान झाल्यावर हेच युरेनियम अमेरिकेच्या माध्यमातून मिळेल याची सोय केली, असे मोदी म्हणाले. देशामध्ये मोठ्या प्रमाणात विजेचे संकट असताना ईशान्येकडील राज्यांमधून जलविद्युत प्रकल्पाअंतर्गत ऊर्जेची निर्मिती सहज होऊ शकते. संपूर्ण देशाची विजेची गरज त्यामुळे पूर्ण होऊ शकते. नेपाळ आणि तिबेटसारख्या छोट्या देशांनी जलविद्युत प्रकल्प सुरू केले आहेत. अशावेळी आपण मात्र आपल्याच देशातील या राज्यांकडे दुर्लक्ष करत असल्याची खंत मोदी यांनी यावेळी व्यक्त केली. आसाम, सिक्कीम, नागालँड, मिझोराम, मणिपूर, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश आदी ईशान्येकडील राज्यांच्या सुरक्षेच्या प्रश्नाकडेही मोदी यांनी लक्ष वेधले. एकवेळ मुंबई, अहमदाबादमध्ये एखादी सुधारणा नाही झाली तरी चालेल. पण सीमेवरील या राज्यांच्या सुरक्षेमध्ये कसर ठेवून चालणार नाही. चीनच्या आक्रमणानंतरही देशाने धडा घेतलेला नसल्याचे ते म्हणाले.
मोदी राजवटीपेक्षा आणीबाणी बरी!
नरेंद्र मोदी की आडवाणी?