आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधी पक्षाचा विचार करा - नितीन गडकरी

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आगामी निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांनी प्रथम पक्षाचा विचार करावा आणि सर्वांना बरोबर घेऊन चालावे, अशा कानपिचक्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी रविवारी राज्य कार्यकारिणी बैठकीत दिल्या. या बैठकीला पक्षाचे लोकसभा उपनेते गोपीनाथ मुंडेही उपस्थित होते, त्यामुळे गडकरींनी त्यांना तर हा टोला लगावला नसेल ना, असा प्रश्न उपस्थित कार्यकर्त्यांना पडला होता.
या बैठकीत व्यासपीठावर मुंडे व गडकरी यांच्यामध्ये मुनगंटीवार बसले होते व एक खुर्ची मोकळीही ठेवली होती. त्याबद्दलही कार्यकर्त्यांमध्ये थोडी कुजबूज झाली. दोन दिवसाच्या राज्य कार्यकारिणीचा समारोप गडकरी यांच्या भाषणाने झाला. बैठकीला मार्गदर्शन करताना गडकरी म्हणाले की, कार्यकर्त्यांनी संकुचित विचार करू नये. पक्ष हरला तरी चालेल पण आपले पद जाता कामा नये, अशी वृत्ती नको. सगळ्यांना बरोबर घेऊन जायला हवे. तसेच निवडणुकीची तिकिटेही ‘मेरिट’वर द्यायला हवीत. 10 महापालिकांच्या निवडणुकांमध्ये सध्या असलेली 188 सदस्य संख्या 250 वर जायला हवी, असे लक्ष्य त्यांनी कार्यकर्त्यांना व पदाधिका-यांना दिले. सध्या लोकांमध्ये काँग्रेस सरकारच्या विरोधात नाराजी असल्याने भाजपला निवडून येण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काँग्रेसबाबत व त्यांच्या नेतृत्वाबाबत विश्वासार्हता संपली आहे, कामाची दृष्टी व क्षमताही त्यांच्यात नाही. अनेक मंत्री तुरुंगात गेले आहेत अजूनही काही जातील. त्यामुळे याचा फायदा भाजपने घ्यायला हवा व लोकांची मते जिंकायला हवीत, असे त्यांनी सांगितले.
राज्यातील निवडणुकांमध्ये पक्षाची ताकद आणखी वाढवण्यासाठी चांगल्या मतांनी निवडून आलेल्या अपक्ष उमेदवारांच्या घरी जाऊन त्यांना पक्षामध्ये येण्यासाठी मन वळवा, तसेच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी जरा सावधपणे बोलण्याच्या सूचनाही गडकरी यांनी या वेळी दिल्या.
कुशवाहबाबत मात्र मौन - बसपचे उमेदवार बाबूसिंग कुशवाह यांना भाजपमध्ये प्रवेश का दिला? हा प्रश्न माध्यमांचे प्रतिनिधी विचारतील म्हणून बैठक संपताच नितीन गडकरी यांनी माध्यमांशी बोलणे टाळले. तरीही प्रतिनिधींनी घेराव घालून ‘कुशवाह यांना पक्षात घेण्याच्या निर्णयाचा पश्चत्ताप होत आहे का’?, असे विचारले. मात्र त्यांनी उत्तर दिले नाही. गोपीनाथ मुंडे यांनी कुशवाह यांना पक्षात घेतल्यानंतर त्यांच्यावर सीबीआयने धाड टाकल्याचे सांगितले. महाराष्ट्राचे प्रभारी वेंकय्या नायडू यांनी हा विषय भाजपसाठी संपल्याचे माध्यमांना सांगितले.
धनंजय मुंडेंवर अहवालानंतर कारवाई होणार