आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक आयोग सरकारच्या दबावात - राज ठाकरे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - एकाच दिवशी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांचा निकाल घोषित करणे आयोगाला शक्य आहे. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दबावाखाली निवडणूक आयोग जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा निकाल लवकर लावण्याची घाई करीत असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.
ते म्हणाले की, अगोदर जिल्हा परिषद आणि नंतर महापालिकांचा निकाल जाहीर करणे चुकीचे आहे. या निवडणुकांच्या दरम्यान इतर कोठेही निवडणुका नाहीत. त्यामुळे मशीन उपलब्ध होणे सहज शक्य आहे. लोकसभेच्या निवडणुकांच्या वेळी जर मशिन्स उपलब्ध होऊ शकतात तर आता का नाही? निवडणूक आयोग काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दबावाखाली असल्यामुळेच एकाच दिवशी निकाल जाहीर केला जात नाही. निवडणूक आयोग एकाच दिवशी निकाल घोषित करण्याची आमची मागणी मान्य करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मनसेचे उमेदवार रविवारी जाहीर होणार
मुंबई महापालिकेसाठी मनसे आपल्या उमेदवारांची यादी रविवारी जाहीर करणार असून, शिवसेनेबरोबरच रिपाइं उमेदवारांची यादी 23 जानेवारी रोजी जाहीर करणार आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी ठाण्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. मुलाखती झाल्यानंतर काही जणांची नावे निश्चित करण्यात आली असून पहिली यादी 22 जानेवारी रोजी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. दुसरी यादी 27 तारखेला जाहीर केली जाईल असेही सूत्रांनी सांगितले. मनसेचा वचकनामाही जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात घोषित करण्यात येणार आहे. रामदास आठवले 18 आणि 19 जानेवारी रोजी इच्छुकांच्या मुलाखती घेणार असल्याची माहिती रिपाइंचे गौतम सोनवणे यांनी दिली. आतापर्यंत 250 इच्छुकांनी अर्ज नेले असून मंगळवारी संध्याकाळपर्यंत 150 अर्ज भरून परत देण्यात आले असल्याचे सांगून सोनवणे म्हणाले की, 23 जानेवारी रोजी शिवसेनेसोबतच पहिली यादी जाहीर केली जाईल.