आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साक्षेपी संपादक राम पटवर्धन यांचे निधन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मौज आणि सत्यकथा या साहित्यिक विश्वातील अग्रगण्य नियतकालिकांचे दीर्घकाळ संपादकपद भूषवणारे राम पटवर्धन (86) यांचे मंगळवारी सकाळी ठाण्यात दीर्घ आजाराने निधन झाले. चार दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सून व नात असा परिवार आहे.

राम पटवर्धन ऊर्फ आप्पांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यात 21 मार्च 1928 रोजी झाला. शालेय शिक्षण रत्नागिरीत संपवून मुंबईत येऊन त्यांनी बीए, एमए केले. शिक्षणासोबत सरकारी नोकरीही केली. सिडनेहॅम, रुइया, पोद्दार, सिद्धार्थ व एमडी या महाविद्यालयांमध्ये मराठीचे अध्यापनही केले. एमए करतानाच मौजच्या श्री. पु. भागवतांनी त्यांना मौजेत येण्याचा आग्रह केला व ते मौजेच्या गिरगावातील कार्यालयात रुजू झाले. 1994 पर्यंत त्यांनी मौजमध्ये संपादकपद भूषवले. परंतु त्यांच्या काळात प्रसिद्ध झालेल्या मौजच्या पुस्तकांवर पटवर्धनांचा शिक्का असे. एका कथेचे सहा, सात वेळा पुनर्लेखन करून घेतल्यानंतरच तिला ते सत्यकथेत स्थान देत. नवोदितांप्रमाणेच प्रस्थापितांनाही सत्यकथेत कथा प्रसिद्ध झाल्याचे अप्रूप वाटे, ते याचमुळे. खादीचा कुडता, पांढरा लेंगा व खांद्याला झोळी अशा पेहरावात कायम असणार्‍या पटवर्धनांशी गप्पा मारायला, चर्चा करायला अनेक लेखक मौजच्या कार्यालयात नेहमी येत. ‘कथेला टोक नाही’ वा ‘बरी वाटावी,’ अशा शब्दांत ते लेखकापर्यंत आपला अभिप्राय पोहोचवत, अशी त्यांची ख्याती होती.

पटवर्धनांनी मार्जोरी किनन रॉलिंग्ज यांच्या ‘द यिअरलिंग’ या कादंबरीचा ‘पाडस’ या नावाने केलेला अनुवाद प्रचंड गाजला. अनुवाद कसा असावा, याचे उत्तम उदाहरण म्हणून आजही पाडसचे नाव सन्मानाने घेतले जाते. 6 वर्षांपासून अंथरुणात असूनही त्यांनी अचला जोशी यांच्या श्रद्धानंद महिला श्रमाविषयी लिहिलेल्या ‘आश्रम नावाचं घर’ या भल्यामोठ्या पुस्तकाचे संपादन केले.