आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळ्यात सिव्हिल हॉस्पीटलने दडवली कुपोषितांची माहिती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - शासनातर्फे कुपोषणमुक्तीसाठी लाखो रुपये खर्च करण्यात येत असले तरी कुपोषण रोखण्यात शासनाला अपयश येत असल्याचे चित्र आहे. धुळे जिल्हा रुग्णालयात आठ दिवसांत दोन कुपोषित बालके दाखल झाली आहेत. या बालकांविषयी अधिक माहिती देण्यास मात्र जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून टाळाटाळ करण्यात येत आहे.
बालकांचे कुपोषण कमी व्हावे यासाठी शासनाकडून दरवर्षी विविध उपक्रम हाती घेण्यात येतात. सध्या अंगणवाड्यांमध्ये राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानांतर्गत बालकांना विशेष पोषण आहार देण्यात येतो. मात्र, तरीदेखील आदिवासी समाजातील तसेच ग्रामीण भागातील कुपोषण दूर करण्यात शासनाला यश आलेले नाही. सध्या पावसाळा सुरू असून कुपोषित बालके जिल्हा रुग्णालयात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या आठ दिवसांत जिल्हा रुग्णालयात दोन कुपोषित बालके दाखल झाली आहेत. या दोन्ही बालकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात आले. या दोन्ही बालकांना जिल्हा रुग्णालयातील बालरोग विभागात दाखल करण्यात आले आहे. त्यांची जिल्हा रुग्णालयात विशेष काळजी घेण्यात येत आहे. मात्र, या दोन्ही बालकांचे नाव, गाव तसेच इतर माहिती देण्यास जिल्हा रुग्णालय प्रशासनाने असर्मथता दर्शवली आहे. बालरोग विभागात दाखल होणार्‍या कोणत्याच रुग्णाची माहिती प्रसिद्ध होऊ देता कामा नये, असे आदेश वरिष्ठांकडून देण्यात आल्याचे स्पष्टीकरण संबंधित कर्मचारी वर्गाकडून देण्यात आले आहे.