आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्त्री भ्रूणहत्येची माहिती द्या अन् 25 हजार रुपये मिळवा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी शासनाने कडक पावले उचलली आहेत. त्याअंतर्गत आता स्त्री भ्रूणहत्येची माहिती देणार्‍यास 25 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. त्याचबरोबर स्टिंग ऑपरेशनसाठी तयारी दर्शविणार्‍या गर्भवती महिलेस 25 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. दरम्यान, शहरात आतापर्यंत सहा सोनोग्राफी केंद्रांना सील करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
वाढत्या स्त्री भ्रूणहत्येला आळावा बसावा यासाठी राज्य शासनातर्फे धडक कृती मोहीम राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सोनोग्राफी केंद्रांची तपासणी सुरू आहे. जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या दक्षता पथकांतर्गत महापालिका क्षेत्रात धडक मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत 80 सोनोग्राफी केंद्रांची तपासणी करण्यात आली. त्यानुसार कायद्याचा भंग केल्याप्रकरणी तीन सोनोग्राफी केंद्र सील करण्यात आले. त्यात साईदीप क्लिनिक, कुलस्वामिनी हेल्थ केअर प्रा.लि. संचलित सिद्धेश्वर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, ठाकरे मॅटर्निटी व जनरल हॉस्पिटलचा समावेश आहे. यापूर्वी झालेल्या कारवाईत तीन केंद्रांना सील करण्यात आले होते. धडक मोहिमेंतर्गत शहरातील आठ केंद्रांनी यापूर्वीच सर्मपण केले आहे.
गेल्या वर्षी 20 केंद्रांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत जिल्ह्यात 46 सोनोग्राफी केंद्र कार्यरत आहेत. स्त्री भ्रूणहत्या थांबविण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तक्रार करण्यासाठी टोल फ्री नंबर सुरू करण्यात आला आहे. त्याचबरोबर ‘आमची मुलगी’ ही वेबसाइट सुरू आहे. त्यानंतर आता स्त्री भ्रूणहत्येची माहिती देणार्‍यास 25 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. स्टिंग ऑपरेशनमध्ये सहभागी होणार्‍या गर्भवती महिलेस 25 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनातर्फे सांगण्यात आले.