आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोटाळ्यावर घोटाळ : राज्यमंत्री देवकर पुन्हा अडचणीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - ‘घरकुल प्रकरणात मी केवळ ‘सह्याजीराव’ आहे. मला कोणताही लाभ झालेला नाही. सर्व निर्णय प्रदीप रायसोनींच्या आदेशावरून घेण्यात आले,’ असा कांगावा करणारे परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांच्या भावाच्या जळगाव कन्स्ट्रक्शन या कंपनीला नगरपालिकेची लाखो रुपयांची नियमबाह्य पद्धतीने कामे देण्यात आल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आधीच घरकुल घोटाळ्यात गोत्यात आलेल्या देवकरांसमोरील अडचणीत भरच पडली आहे.
घरकुल घोटाळा प्रकरणात गुलाबराव देवकर यांची 3 फेब्रुवारी रोजी तपासाधिकारी इशू संधू यांनी पोलिस मुख्यालयात चौकशी केली होती. त्या वेळी सर्व आरोप फेटाळत त्यांनी मी केवळ ‘सह्याजीराव’ असल्याचे सांगितले होते. ‘आपण रायसोनींच्या आदेशावरून काम करीत होतो,’ असे सांगत स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु देवकरांच्या लहान बंधूच्या नावाने असलेल्या जळगाव कन्स्ट्रक्शनला नगरपालिका असताना सन 1996-97 मध्ये पिंप्राळा गट नंबर 19 मध्ये 28 लाख लिटर्स क्षमतेची पाण्याची टाकी बांधण्याचे काम देण्यात आले होते. यासंदर्भात केलेल्या करारात 31 टक्के जादा दराने काम देण्यात आले होते. बांधकामाचे साहित्य साइटवर आल्यावर 90 टक्के अ‍ॅडव्हान्स देण्यात आला होता. बांधकामाच्या साहित्यावरील जकात करदेखील नगरपालिकेने माफ केला होता. विशेष म्हणजे पालिकेने आयकर भरून द्यावा, असे करारात नमूद करण्यात आले होते, तर सुरक्षा अनामत रक्कम फक्त 2 टक्के घेण्यात आली होती.
खंडपीठाची चपराक - सर्वोच्च न्यायालयाने अटकेला स्थगिती दिली असली तरी जामीन रद्द करताना औरंगाबाद खंडपीठाने केलेल्या आदेशात देवकरांना चपराक दिली आहे. त्यात रेकॉर्ड पाहिले असता देवकरांच्या भावाला 5 कामांची वर्क ऑर्डर दिल्याचे दिसते. देवकरांना पोलिस कोठडीत ठेवून चौकशी केली असती तर बरीच माहिती समोर आली असती. त्यातून हा घोटाळा कसा व कोणत्या पातळीपर्यंत झाला आहे हे समोर आले असते. त्यात देवकरांना किती फायदा झाला आहे हे समजले असते. सर्व काही बघितले असता यात नि:पक्षपातीपणे काहीही केले नसल्याचे खंडपीठाने सांगून तपास यंत्रणेला टोला लगावला आहे.
देवकरांमुळेच भावाला कामे... - देवकर हे सहा महिने नगराध्यक्ष होते. सुरेश जैन व प्रदीप रायसोनी यांची सावली म्हणून त्यांना ओळखले जायचे. सन 1991 पासून नगरसेवक असलेल्या देवकरांचे राजकीय वर्चस्व असल्यामुळेच पाण्याच्या टाकीचे काम करण्यासाठी केलेल्या करारात भावाच्या फायद्यावर भर दिला गेला नसेल का? असा सवालही यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
46 लाखांचे काम 61 लाखांवर - पाण्याच्या टाकीच्या बांधकामासाठी 6 जुलै 1997 रोजी दिलेल्या जाहिरातीनुसार सन 1996-97 च्या जिल्हा दर सूचीवर 31 टक्के जादा दराची निविदा मंजूर करण्यात आली होती. त्यामुळे 46 लाख 65 हजार 811 रुपयांचे काम 61 लाख 12 हजार 212 रुपयांमध्ये करावे लागले होते. दहाव्या वित्त आयोगांतर्गत करण्यात आलेल्या टाकीच्या कामाला 22 सप्टेंबर 2009 रोजी परिपूर्ती प्रमाणपत्र देण्यात आले आहे. यासोबत शहरातील पाइपलाइन टाकण्याची पाच कामेही जळगाव कन्स्ट्रक्शनला देण्यात आली होती.