आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव कन्स्ट्रक्शन आले मुळावर; मग गुलाबराव देवकर सह्याजीराव कसे?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- मी केवळ ‘सह्याजीराव’ आहे, मला कोणताही लाभ झालेला नाही. सर्व निर्णय प्रदीप रायसोनींच्या आदेशावरून घेतल्याचा कांगावा करणारे पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या भावाच्या जळगाव कन्स्ट्रक्शन या कंपनीच्या माध्यमातून नगरपालिकेत लाखो रुपयांची कामे करण्यात आली आहेत. त्यामुळे त्यांना नक्कीच आर्थिक लाभ झाला असावा, असे जनमत व्यक्त होत आहे. याची खंडपीठानेही दखल घेत जर देवकरांना अटक करून चौकशी केली असती तर त्यातून आणखी भरपूर काही बाहेर आले असते, असे आदेशात नमूद केल्याने या प्रकरणाला आणखीनच महत्त्व प्राप्त झाले आहे.
गुलाबराव देवकर यांची 3 फेब्रुवारी रोजी तपासाधिकारी इशू सिंधू यांनी पोलिस मुख्यालयात चौकशी केली होती. त्यात त्यांनी सर्व आरोप फेटाळत मी केवळ सह्या केल्या. मला कोणताही आर्थिक लाभ झाला नसल्याचा जबाब दिला होता, तसेच आपण रायसोनींच्या आदेशावरून काम करीत होतो, असे सांगत स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला होता; परंतु देवकरांच्या लहान बंधूच्या नावाने असलेल्या जळगाव कन्स्ट्रक्शनला नगरपालिका असताना सन 1996-97 मध्ये पिंप्राळा गट नंबर 19 मध्ये 28 लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ बांधण्याचे काम देण्यात आले होते, तसेच या संदर्भात केलेल्या करारात 31 टक्के जादा दराने काम देण्यात आले होते. बांधकामाचे साहित्य साइटवर आल्यावर 90 टक्के अँडव्हान्सही देण्यात आला होता. बांधकामाच्या साहित्यावरील जकात करदेखील नगरपालिकेने माफ केला होता. विशेष म्हणजे नगरपालिकेने प्राप्तिकर भरून द्यावा, असे करारात नमूद करण्यात आले होते, तर सुरक्षा अनामत रक्कम फक्त 2 टक्के घेण्यात आली होती.
46 लाखांचे काम गेले 61 लाखांवर
पाण्याच्या टाकीच्या बांधकामासाठी 6 जुलै 1997 रोजी दिलेल्या जाहिरातीनुसार सन 1996-97 च्या जिल्हा दरसूचीवर 31 टक्के जादा दराची निविदा मंजूर करण्यात आली होती. त्यामुळे 46 लाख 65 हजार 811 रुपयांचे काम 61 लाख 12 हजार 212 रुपयांमध्ये करावे लागले होते. दहाव्या वित्त आयोगांतर्गत करण्यात आलेल्या टाकीच्या कामाला 22 सप्टेंबर 2009 रोजी परिपूर्ती प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
11 बोअरवेलची कामे
नगरपालिकेत नगरसेवक असताना गुलाबराव देवकर यांनी सन 1997 ते 2005 दरम्यान त्यांच्या त्यावेळच्या वॉर्ड क्रमांक 37 मध्ये अकरा बोअरवेलची कामे केली होती. ती कामेदेखील त्यांच्या भावाच्या मालकीच्याच जळगाव कन्स्ट्रक्शनला दिली होती, तसेच पाणीटंचाईच्या काळात वॉर्ड क्रमांक 37 मध्ये खासगी ट्रॅक्टरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे काम थेट गोपाळ देवकर यांच्या नावानेच घेतले होते.
देवकरांमुळेच कामे
गुलाबराव देवकर नगरपालिकेत असताना सहा महिने नगराध्यक्ष होते, तसेच सुरेश जैन व प्रदीप रायसोनी यांची सावली म्हणून त्यांना ओळखले जायचे. सन 1991 पासून नगरपालिकेत नगरसेवक असलेल्या देवकरांचे राजकीय वर्चस्व असल्यामुळेच पाण्याच्या टाकीचे काम करण्यासाठी केलेल्या करारात भावाच्या फायद्यावर भर दिला गेला नसेल का, असा सवालही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
खंडपीठाची चपराक
सर्वोच्च न्यायालयाने अटकेला स्थगिती दिली असली तरी जामीन रद्द करताना औरंगाबाद खंडपीठाने केलेल्या आदेशात पालकमंत्री असलेल्या देवकरांना जोरदार चपराक दिली आहे. त्यात रेकॉर्ड पाहिले असता देवकरांच्या भावाला 5 कामांचे वर्क ऑर्डर दिल्याचे दिसते. जर देवकरांना पोलिस कोठडीत ठेवून चौकशी केली असती तर बरीच माहिती समोर आली असती. त्यातून हा घोटाळा कसा व कोणत्या पातळीपर्यंत झाला आहे हे समोर आले असते. त्यात देवकरांना किती फायदा झाला आहे हे समजले असते. सर्व काही बघितले असता यात निष्पक्षपातीपणे काहीही केले नसल्याचे खंडपीठाने म्हटले आहे. एक प्रकारे देवकरांना झुकते माप दिल्याचे नमूद करत, हे सर्व त्यांच्या वर्चस्वामुळेच झाले असल्याचा टोला तपास यंत्रणेला लगावला आहे.
ध्वजवंदनाचा प्रशासनापुढे पेच
स्वातंत्र्यदिनी जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित केलेल्या ध्वजवंदनाच्या कार्यक्रमात घरकुल घोटाळ्यातील आरोपी असलेले पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात येणार असल्याने जिल्हा प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे. नियोजित कार्यक्रम राजशिष्टाचाराप्रमाणे पालकमंत्र्यांच्याच हस्ते होणार असला तरी यावेळची स्थिती आव्हानात्मक असल्याने काय करावे, याबाबत प्रशासनात मोठा खल सुरू आहे.
घरकुल प्रकरणात खंडपीठाने जामीन रद्द केल्यानंतर पालकमंत्री देवकरांनी पक्षाकडे राजीनामा दिला आहे. त्यांची अटक सर्वोच्च न्यायालयाच्या दिलाशामुळे टळली असली तरी त्यांच्या हस्ते ध्वजवंदन करू नये, यासाठी अनेक मतप्रवाह पुढे आले आहेत. काही राजकीय पक्ष आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. देवकरांनी नैतिकता पाळून स्वत:हून ध्वजवंदनाला नकार दिला पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षातर्फे करण्यात आली आहे. त्यांच्यावर कोर्ट मॅनेज केल्याचा उघड आरोप करणारे आमदार गिरीश महाजन यांनीदेखील त्यांच्या ध्वजवंदनाबाबत आक्षेप घेतला आहे.
दरम्यान, एकीकडे राजशिष्टाचार तर दुसरीकडे वास्तव, या कचाट्यात सापडलेल्या जिल्हा प्रशासन व पोलिस विभागात अंतर्गत चर्चेला ऊत आला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी अवघे पाच दिवस बाकी असल्याने शासनाकडूनच याबाबत मार्गदर्शक सूचना याव्यात, अशी अपेक्षा काही अधिकार्‍यांकडून व्यक्त होत आहेत. देवकरांच्या हस्ते होणार्‍या शासकीय ध्वजवंदनाबाबत राज्यभर एकच चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी ध्वजवंदन करू नये, याबाबत शासनाने काय तो लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.
उच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर त्यांना अटक करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, देवकरांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली नसती तर त्यांचा ध्वजवंदन समारंभ कारागृहात साजरा झाला असता. त्यामुळे त्यांना सलामी कशी द्यायची? 21 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयानेदेखील जामीन फेटाळल्यास याच देवकरांना अटक करण्यासाठी जाणारे पोलिस त्यांना आता मानवंदना देतील काय, याबाबतदेखील सामान्य नागरिकांमध्ये मोठय़ा प्रमाणात उत्सुकता लागून आहे. स्वातंत्र्यदिन आणि राष्ट्रीय ध्वजाच्या अस्मितेचा प्रश्न असल्याने याबाबत राजकारण न करण्याचा निर्णय घेतला आहे. असे असले तरी देवकरांनी स्वत:हून माघार घ्यावी, असा सल्ला देण्यासही ते विसरले नाहीत. त्यामुळे देवकरांच्या हस्ते ध्वजारोहण करावे की नाही, हा नवीन विषय जिल्ह्यात चर्चिला जात आहे.
शिवसेनेच्या मोहिमेत 1200 स्वाक्षर्‍या
आर्थिक गुन्ह्यात अटक झालेल्या पालकमंत्री गुलाबराव देवकर यांना स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करू देऊ नये म्हणून शिवसेनेच्या महानगर शाखेतर्फे राबविण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेत पहिल्याच दिवशी शुक्रवारी सायंकाळी 1200 ते 1300 नागरिकांनी सहभाग नोंदवला.
घरकुल घोटाळ्यात खंडपीठाने गुलाबराव देवकर यांचा जामीन नामंजूर करून त्यांना तत्काळ अटक करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. मात्र, त्यांनी सर्वोच्च न्यायालयातून अटकेला स्थगिती मिळविल्याने कारवाई टळली आहे. एकदा अटक झालेल्या व पुन्हा अटकेचे सावट असलेल्या पालक मंत्री देवकर यांना शासकीय ध्वजारोहण करू देऊ नये, यासाठी शिवसेनेचे महानगराध्यक्ष गजानन मालपुरे यांच्या नेतृत्वाखाली स्वाक्षरी मोहीम राबवली जात आहे. त्यात शुक्रवारी सायंकाळी 6.30 ते रात्री 8.30 वाजेदरम्यान महापालिकेसमोर शहरातील सुमारे 1200 ते 1300 नागरिकांनी स्वाक्षरी मोहिमेत सहभाग नोंदवला. स्वाक्षरी मोहिमेचे आंदोलन शनिवारी सायंकाळी 6 ते 9 या वेळेत काव्यरत्नावली चौकात राबविण्यात येणार असून, त्याची प्रत सोमवारी जिल्हाधिकार्‍यांमार्फत राज्यपाल व मुख्यमंत्र्यांकडे रवाना करणार असल्याची माहिती देण्यात आली.