आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Waiting List Relief At Jalgaon Railway Passenger

‘वेटिंग लिस्ट’पासून रेल्वे प्रवाशांची सुटका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव: दादर-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस, पुणे-नागपूर गरीबरथ एक्स्प्रेस, पुणे- नागपूर एक्स्प्रेसना वेटिंग लिस्टनुसार जादा डबे जोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे आरक्षणासाठी दलालांवर आळा बसणार असून, प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. सेवाग्राम, गरीबरथ एक्स्प्रेस अनेकदा फुल्ल असतात. विशेषत: दिवाळी, उन्हाळी सुटीत किंवा लग्नसराईत या गाड्यांसाठी ‘वेटिंग लिस्ट’ प्रचंड मोठी असते. मात्र, असे असतानाही प्रवाशांना आरक्षण मिळण्याची संधी मध्य रेल्वेने उपलब्ध करून दिली आहे. वेटिंग लिस्टप्रमाणे या गाड्यांना जादा डबे जोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला असून, प्रवाशांना आता र्मयादित डब्यांची समस्या भेडसावणार नाही. तसेच या तीन गाड्यांसह 14 गाड्यांना जादा डबे जोडण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी त्याबाबतची माहिती भुसावळ मध्य रेल्वेकडे आलेली नाही. मुंबई, पुणे, नागपूरकडे जाणार्‍या जिल्ह्यातील प्रवाशांना मध्य रेल्वेच्या या निर्णयाने दिलासा मिळाला आहे. वेटिंग लिस्टप्रमाणे जादा डबे जोडण्याच्या निर्णयाबाबतची माहिती भुसावळे मध्ये रेल्वेकडे अद्याप आलेली नसली तरी असा निर्णय घेतला असल्याच्या माहितीला कर्मशिअल विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक एन. जी. बोरीकर व एसीएमटीसी विजय नायर यांनी दुजोरा दिला आहे.
मूळ स्थानापासून सुविधा
ज्या गाड्यांना जादा डबे जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्या गाड्यांच्या वेटिंग लिस्टनुसारच ही सुविधा मिळू शकणार आहे. जेथून गाडी सुटणार आहे तेथूनच जादा डबे जोडण्यात येणार आहे. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी केव्हा होणार याबाबत अद्याप आमच्याकडे कोणतीही माहिती आली नसल्याचे नायर यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.
जेवढी वेटिंग लिस्ट असेल त्याप्रमाणे डबे जोडले जातील. अर्थात गाडी जेथून सुटणार आहे, तेथूनच नवीन डबे जोडण्यात येतील. यापूर्वीही असे केले जात होते. मात्र, त्याबाबत सिझननुसार निर्णय घेतला जात होता. आता जो निर्णय घेण्यात आला आहे, त्याचे डिटेल्स अद्याप आलेले नाहीत. ते आल्यानंतरच याबाबत काही सांगता येईल. विजय नायर, असिस्टंट कर्मशिअल मॅनेजर तिकीट तपासनीस (एसीएमटीसी)
मध्य रेल्वेने घेतलेल्या या निर्णयाबाबत अद्याप आमच्याकडे कोणतेही सक्यरुलर आलेले नाही. त्याची अंमलबजावणी कधी होईल, याबाबत त्याचे डिटेल्स आल्यानंतरच सांगता येईल. एन. जी. बोरीकर, सीनिअर डिव्हिजनल कर्मशिअल मॅनेजर
भुसावळ-पुणे जाणार्‍या गाडीमुळे सर्वसामांन्य नागरिकांना दिलासा मिळणार असला तरी कामानिमित्त ये-जा करणार्‍यांना ही रेल्वे उपयोगी पडणार नाही. दौंडमार्गे ही रेल्वे असती तर काही प्रमाणात लक्झरीवरील भार कमी झाला असता. मात्र, ही रेल्वे कल्याणमार्गे जाणार असल्याने लक्झरीचालकांवर व एजंटवर याचा परिणाम होणार नाही. मयूर रायसोनी, संचालक मयुर ट्रॅव्हल
व्यवसायिक कामासाठी माझे नेहमी पुण्यात जाणे-येणे होत असते. नवीन रेल्वेमुळे सामान्य प्रवाशांना चांगला पर्याय मिळाला आहे. मात्र, पुण्यात सकाळी 6 वाजेपर्यंत सोडणारी रेल्वे हवी होती. वेळेत थोडा बदल झाल्यास सोयीचे होईल. रुपेश कोठारी, प्रवासी
ट्रॅव्हलचालकांच्या मुजोरीला लगाम!
भुसावळ, जळगावातून पुण्यासाठी सुरू झालेल्या एक्स्प्रेसमुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. गाडीची वेळ प्रवाशांना सोयीची वाटत नसली तरी सामान्य प्रवाशांना एक चांगला पर्याय निर्माण झाला असल्याने पुण्याला वार्‍या करणार्‍या लक्झरी बसमालक आणि एजंटांना मात्र धास्ती भरली आहे. नव्या एक्स्प्रेसमुळे ट्रॅव्हलचालकांच्या व्यवसायावर खूप फरक पडणार नसला तरी मुजोरीला काही प्रमाणात लगाम बसणार असून ट्रॅव्हलचे भाडेदेखील आटोक्यात येण्याची शक्यता आहे. जळगाव शहर व जिल्ह्यातून पुण्याला रोजगार आणि शिक्षणासाठी जाणारा वर्ग मोठा आहे. केवळ पुण्याला जाणार्‍या लक्झर्‍यांची संख्या 35 च्यावर आहे. लक्झरीचे तिकीट बुकिंग करणारे मुख्य 15 तर तेवढीच पोट एजंटची संख्या आहे. दररोज सरासरी दीड हजार प्रवासी लक्झरीने पुण्याकडे जातात. दिवाळी, गणपती, लग्नसराईत प्रवाशांचा ओघ वाढताच मनमानी तिकीट दरवाढ करून प्रवाशांना वेठीस धरण्यात येत होते.