आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक छानच आहे : अमृता खानविलकर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील वर्षी मी नाशिकमध्ये एका शोसाठी आले होते. काय पब्लिक होतं. सुपर्ब. आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद इतका तुफान होता की आयोजकांना मला थांबण्याची विनंती करावी लागली. ‘अमृताजी आता नृत्य थांबवा नाहीतर आम्हाला ही पब्लिक आवरता येणार नाही,’ अशा शब्दांत मला थांबायला सांगितलं गेलं. इतका प्रचंड प्रतिसाद मला त्यावेळी नाशिककरांनी दिला. ती आठवण अजूनही लक्षात आहे. आज पुन्हा ‘अर्जुन’च्या निमित्ताने मला ही आठवण हमखास झाली. असो, पण नाशिक छानच आहे, इथले लोक, इथलं हवामान सगळंच अजूनही टिकून आहे. एवढं झपाट्याने वाढतंय नाशिक; पण ग्रीनही तितकंच जाणवलं. इथे आलं की नाशिकची मिसळ हमखास आठवते. पण मला त्याहीपेक्षा कोंबडीवडे खूप आवडतात.
मी आजपर्यंत प्रत्येक चित्रपटातील स्टारकास्ट कसं आहे, चित्रपट टेक्निकली किती चांगला आहे, म्हणजे तंत्रज्ञांची टीम कशी आहे हे बघून चित्रपट निवडते. कित्येकदा चांगलं कथानक, चांगला दिग्दर्शक असूनही केवळ तंत्रज्ञानाची बाजू सक्षम नसल्याने चित्रपट आपटतो. आणि फ्लॉप चित्रपटातली तुमची भूमिकाही लवकर नजरेआड जाते.
‘गैर’ या चित्रपटात संदीप कुलकर्णींबरोबर नायिकेची भूमिका करतानाचा अनुभव आणि ‘अर्जुन’मध्ये सचितबरोबर काम करण्याचा अनुभव यात जमीनअस्मानाचं अंतर आहे. ‘अर्जुन’मधली माझी भूमिका ही आजच्या तरुणीची आहे. ही तरुणी तुम्हाला कुठल्याही गर्दीत अशीच सापडेल, अगदी आपल्या नाशिकमध्येही !
जर अभिनयक्षेत्रात काम करायची संधीच मिळाली नसती तर मी निश्चितच कोरिओग्राफर झाले असते. नृत्यावर माझं अभिनयाइतकंच प्रेम आहे; पण अभिनय....नाही मी या क्षेत्रावाचून राहूच शकत नाही.
नाशिकमधून अनेक नवे चेहरे या क्षेत्रात उतरत आहेत. मी म्हणेन कुठल्याही शहरातले का असेना, आपली मराठी असण्याची ओळख टिकवणं महत्त्वाचं. खूप मेहनत करायला हवी. अनेकांची या क्षेत्रात शॉर्ट करिअर्स होतात; पण नियोजन नीट केलं तर या क्षेत्रात दीर्घकाळ टिकण्यास खूप वाव आहे. ऑल द बेस्ट टू देम... ‘मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा’ या ठसकेबाज लावणीने प्रेक्षकांचा कलिजा खलास करणारी अमृता खानविलकर येत्या 16 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणा-या ‘अर्जुन’ या मराठी चित्रपटात एका रोमांटिक भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर असून त्या पार्श्वभूमीवर ती सहकलाकारांसह नाशकात आली होती. त्यावेळी तिने ‘दिव्य मराठी’च्या वाचकांसाठी व्यक्त केलेले मनोगत...
‘कॉमेडी एक्स्प्रेसमधील माझ्या नुसत्या असण्यालाही प्रेक्षकांची दाद मिळायची. आता मी या कार्यक्रमात नाही; पण या शोमध्ये परफॉर्म करताना निव्वळ माऊथ पब्लिसिटीमुळे एखादा कार्यक्रम कसा यशस्वी ठरतो याची प्रचिती आली. या चित्रपटाच्या निमित्ताने मला माझ्या दिग्दर्शकांकडून एकच शिकायला मिळालं, सामान्य माणसाला पडद्यावर स्वप्न पाहायला आवडतात. माध्यमांनी जर मराठी चित्रपटाबद्दल पॉझिटिव्ह सिंड्रोम तयार केला तर कोणाची बिशाद आहे, मराठीला प्रेक्षक मिळत नाही असे म्हणायची?