आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकपालसाठी जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवा - अण्णा हजारे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - त्यावेळी कोणतीच निवडणूक नव्हती म्हणून शासनाने लोकपाल विधेयक मंजूर केले नाही; पण दीड वर्षांनी लोकसभेची निवडणूक जाहीर होईल, त्यावेळी मी रामलीला मैदानावर आणि तुम्ही सर्व जण रस्त्यावर उतरलात की काहीही घडवून आणू शकतो. देशातील सगळे जेल भरले तर यांना कायदा करावाच लागेल, मात्र स्वातंत्र्याच्या या दुस-या लढाईसाठी प्रत्येकाला जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवावी लागेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी गुरुवारी येथे केले.
देशव्यापी दौ-याच्या प्रारंभीच्या टप्प्यात येथील भालेकर मैदानावर झालेल्या सभेत ते बोलत होते. हुतात्मा स्मारकात स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून झालेल्या रॅलीनंतरच्या सभेत अण्णांनी सक्षम जनलोकपाल विधेयक मंजूर करूनच घ्यायचे असल्याचा निर्धार व्यक्त केला. सरकार गुंगे-बहिरे झाले असून, या सरकारला आणि यंत्रणेला वठणीवर आणायचे असेल तर ते कार्य केवळ सक्षम जनलोकपाल विधेयकच घडवून आणू शकते. यावेळी बोलताना अण्णांनी महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात 6 जूनपर्यंत दौरे करणार असून, जागृती करणार असल्याचे नमूद केले. तरुण हे माझ्या लढ्याचे आशास्थान आहेत. स्वातंत्र्यानंतर 65 वर्षांनी प्रथमच इतके तरुण आंदोलनासाठी रस्त्यावर उतरल्याचे 16 ऑगस्टच्या आंदोलनाने दिसून आले. मात्र इतके मोठे आंदोलन होऊनही हिंसा घडली नाही, याचे जगालादेखील आश्चर्य वाटले. मी आतापर्यंत सहा मंत्री आणि 400 अधिका-यांची विकेट घेतली. पण, केवळ तेवढेच करून भागणार नसल्याचे लक्षात घेतल्याने यंत्रणाच बदलण्यासाठी कामाला लागलो. सात कायदे करायला लावले. काही लोक म्हणतात, ‘काय झाले माहितीच्या अधिकाराने.’ त्यांना मला एवढेच सांगायचे आहे, आदर्श घोटाळा, टू जी स्पेक्ट्रम, राष्ट्रकुल घोटाळा हे सगळे केवळ माहितीच्या अधिकारात विचारल्या गेलेल्या प्रश्नांमुळेच बाहेर आले आहेत, हे लक्षात ठेवावे. त्या आदर्श घोटाळ्यात सचिव दर्जाचे अधिकारी गेले जेलमध्ये, लवकरच काही मंत्रीदेखील जातील, असेही अण्णांनी नमूद केले. 44 वर्षांत आठ वेळा लोकपाल बिल संसदेत सादर झाले पण ते मंजूर झाले नाही. जेलमध्ये जाण्याची प्रत्येकाने तयारी ठेवा. देशाकरिता जेलमध्ये जाणे हे भूषण असते. अजून दीड वर्षाने आपल्याला मोठे आंदोलन छेडायचे असल्याने तुम्ही आतापासूनच जनजागृती करा, असे आवाहनदेखील अण्णा हजारे यांनी केले. गतवर्षी 16 ऑगस्टला जागे झालेल्या या देशातील समाजाने आता जागे राहायलाच हवे, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी अल्लाउद्दीन शेख, मिलिंद गरकर आणि पां.भा. करंजकर यांनीदेखील मनोगत व्यक्त केले.