आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये साखलाज मॉलला आग; सुरक्षारक्षकाचा गुदमरून मृत्यू

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - कालिका माता मंदिरानजीक असलेल्या साखलाज मॉलला मंगळवारी मध्यरात्री अचानक आग लागल्याने मॉलच्या तळघरासह पहिला व दुस-या मजल्यावरील फर्निचर व प्लास्टर ऑफ पॅरिसचे खांब, छत्र पत्त्यासारखे कोसळले. इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील सुरक्षारक्षकाला आग लागल्याचे लक्षात येताच तो आरडाओरड करीत खाली उतरू लागला. मात्र तोपर्यंत आगीने एवढे रौद्र रूप धारण केलेले होते की, जिन्यातच या सुरक्षारक्षकाचा गुदमरून मृत्यू झाला. आग इतकी भीषण होती की, मॉलच्या संपूर्ण काचा फुटून कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.
मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास काचा फुटल्याचा जोरजोरात आवाज आल्याने व साखलाज मॉलमधून आगीचे लोळ बाहेर पडत असल्याचे समोरच्या इमारतीतील रहिवाशांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने अग्निशमन दलास कळविताच काही मिनिटातच एकापाठोपाठ दहा बंब घटनास्थळी दाखल झाले. याच इमारतीतील रहिवासी व महापालिकेचे विद्युत अभियंता आगरकर यांनी अग्निशमन दलाचे अनिल महाजन यांना कळविताच त्यांच्यासह 50 हून अधिक कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
साखलाज मॉलच्या तळमजल्यातील फोमच्या गाद्या, सोफासेट, लाकडी फर्निचर आणि इतर रसायनमिश्रित वस्तूंनी आग अधिक भडकली. त्यामुळे आगीने क्षणार्धात रौद्ररूप घेतले असावे, असा अंदाज आहे. त्यापाठोपाठ पहिला आणि दुस-या मजल्यावरील फर्निचरनेही पेट घेतल्याने सर्वत्र धूर पसरून आगीचे लोळ बाहेर पसरल्याने रस्त्यावरही पळापळ होऊन गर्दी वाढली. मात्र, आगीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाचे जवान करीत असतानाच दुसरीकडे आगीच्या धुरामुळे इमारतीच्या तिस-या, चौथ्या व पाचव्या मजल्यावरील इतर कार्यालयांमध्ये धूर पसरून भिंती काळ्या पडल्या होत्या. काही खिडक्यांच्या काचा फुटून वातानुकूलित यंत्रे नादुरुस्त झाली. मॉल नजीकच्या इमारतीतील सुरक्षारक्षकांनी दक्षता घेत वीजपुरवठा खंडित केल्याने सर्वत्र अंधार पसरलेला होता.
प्रशिक्षणाअभावी आगीचा भडका - आग लागल्याचे लक्षात येताच मॉलच्या सुरक्षारक्षकांनी तातडीने वीजपुरवठा बंद केला. आगीची तीव्रता वाढू नये, यासाठी त्यांनी उपाययोजना केली असली तरी प्रत्यक्षात वीजपुरवठा खंडित झाल्याने मॉलमधील अग्निशमन यंत्रणाही बंद पडल्याचे साखला बंधूंकडून सांगण्यात आले. अग्निशमन जवानांनी मॉलच्या प्रवेशद्वाराजवळ व बाहेर असलेली अग्निप्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित करण्याचा प्रयत्न केला. मात्र वीजपुरवठा नव्हता. मॉलमधील हायड्रन व रायजर यंत्रणेचा प्रत्येक मजल्यावर पंप असून, कॉकद्वारे ते ‘मॅन्युअली’ सुरू करता येऊ शकतात. मात्र, त्यासाठी तळमजल्यावरील मोटारीला पंप लावलेला असतो. त्यास वीजपुरवठा आवश्यक असतो. या यंत्रणेबाबत सुरक्षारक्षक, कर्मचा-यांना प्रशिक्षण गरजेचे आहे. हे प्रशिक्षण नसल्यानेच कदाचित आगीची तीव्रता वाढल्याचा अंदाज महाजन यांनी वर्तविला आहे. लिफ्ट बंद पडल्यानेही वरच्या मजल्यावर सुरक्षारक्षकांना खाली येण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. जवानांनी सुरक्षारक्षक पी.बी.गुंजाळ, आर. मॅथ्यू सरय्या यांना सुखरूप खाली उतरविले. परंतू, चौथ्या मजल्यावर रिलायन्स कम्युनिकेशन्स कार्यालयाचे सुरक्षारक्षक प्रकाश नामदेव सोळंकी (52) यांनी खाली उतरण्याच्या प्रयत्नात पाय घसरून डोक्यालाही मार लागला. त्यातच श्वास कोंडल्याने ते कोसळले. जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
कार्यालयांचे नुकसान - साखलाज मॉलच्या पाच मजली इमारतीत तिस-या मजल्यापासून विविध कंपन्यांची शाखा कार्यालये आहेत. रिलायन्स कम्युनिकेशन्स, आयएनजी वैश्य, एसबीआय इन्श्युरन्स, बजाज फायनान्स लिमिटेड आणि रिलायन्स अशा प्रमुख कार्यालयांचा त्यात समावेश आहे. आगीचे स्वरूप भीषण असल्यामुळे तळमजला, पहिला आणि दुस-या मजल्यावरील मॉलमधील फर्निचर अक्षरश: जळून राख झाले. या आगीची धग वरील इमारतींनाही लागल्याने काही कार्यालयांचे नुकसान झाले आहे.
अन् होत्याचे नव्हते झाले... - आगीचे वृत्त समजताच मॉलचे संचालक नंदकिशोर साखला व त्यांच्या कुटुंबिय व नातलगांनी घटनास्थळी धाव घेतली. साखला पुणे येथून परतले होते. प्रत्येक मजल्यावरील वस्तू पेटत असल्याचे बघून साखला व त्यांचे बंधू सुनील साखला यांच्या भावनांचा बांध फुटला. तीन ते चार कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवित एवढे साम्राज्य उभारायला खूप कष्ट करावे लागले, अन एका झटक्यात गमावल्याची भावना ते व्यक्त करीत होते.
सोळंकी यांच्यावर अंत्यसंस्कार - सुरक्षारक्षक प्रकाश सोळंकी यांच्या पार्थिवावर वरठाण (ता. सोयगाव, जि. औरंगाबाद) या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार असून, लष्करातून निवृत्त झालेले सोळुंकी गेल्या सात वर्षांपासून एमपीआयएन सिक्युरिटीजमध्ये सेवेत होते. भगूर येथून ते दररोज ये-जा करीत होते. त्यांच्या मृत्यू नंतर कुटुंबीयांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
महापौर, आमदारांची भेट - आगीचे वृत्त समजताच महापौर अ‍ॅड. यतिन वाघ, आमदार वसंत गिते, आमदार जयप्रकाश छाजेड, कॉँग्रेस शहराध्यक्ष आकाश छाजेड यांच्यासह सर्वच राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांच्या पदाधिका-यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली. अग्निशमन दलाचे अधिकारी पंडित तिडके, आर. एम. बैरागी, विकास गवळी यांच्यासह पी.टी.बोरसे, जे.एस. शंत्रक, यु.आर. गोडसे, एस.जे. कानडे यांच्यासह 50 कर्मचा-यांनी आग विझविण्यासाठी परिश्रम घेतले.
सहा एसी जळाले - आमच्या कार्यालयात असलेल्या सहा एअरकंडिशनरचे आऊटर जळाल्याने आग आतपर्यंत पोहोचली. सिलिंग काळे पडले असून सहा एअरकंडिशनर जळाले आहे. कार्यालयाची सुधारणा तर करायची आहेच. पण, इमारतीच्या पाय-या आणि लिफ्ट यांचेही काम होणे गरजेचे आहे. ते व्हायला आणि महापालिकेची परवानगी मिळाली की कामकाज सुरू करता येईल. - राजेश बंगाली, क्षेत्रीय विक्री व्यवस्थापक, बजाज फायनान्स लिमिटेड
अग्निरोधक यंत्रणा बंद का पडली? - प्रथमदर्शनी आग शॉर्टसर्किटने लागल्याचे दिसत असले तरी मुळात या मॉलमध्ये संचालकांनी अतिशय योग्य व प्रमाणित अशी अग्निरोधक यंत्रणा बसविलेली असताना ती ऐनवेळी कार्यान्वित कशी झाली नाही? याच ठिकाणी स्मोक डिटेक्टर पॅनल असताना सायरन कसे वाजले नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असल्याने या आग प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार आहे. - अनिल महाजन, मुख्य अग्निशमन अधिकारी, महापालिका