आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘महिंद्र’च्या स्टोअरला भीषण आग, कोट्यवधी रुपयांचे नुकसान

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातपूर - नाशिक महापालिकेच्या उत्पन्नात सर्वाधिक भर टाकणार्‍या सातपूर येथील महिंद्र अँण्ड महिंद्र कंपनीच्या स्कॉर्पिओ बॉडी शॉप विभागातील स्टोअरला बुधवारी पहाटे पाच ते साडेपाचच्या दरम्यान अचानक आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने अग्निज्वाला आकाशाकडे झेपावत होत्या. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कंपनीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

महिंद्र कंपनीच्या स्वत:च्या यंत्रणेसह अग्निशामक दलाच्या मुख्यालयातील तीन बंब तसेच सातपूर, सिडको, पंचवटी व नाशिकरोड येथील अशा एकूण सुमारे 15 बंबांनी प्रत्येकी दोन फेर्‍या करून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. सुमारे पाच ते सहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात कंपनी व अग्निशमन दलास यश आले. ही आग प्रथमदर्शनी शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. धुराचे लोळ बघून परिसरातील नागरिकांनीदेखील कंपनीकडे धाव घेतली. अग्निशामक दलाच्या जवानांसह कंपनीतील सुमारे 150 सुरक्षारक्षकांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. अग्निशामक दलाचे प्रमुख अनिल महाजन, आर. एम. बैरागी, पी. व्ही. तिडके यांच्यासह सातपूर, सिडको, पंचवटी व नाशिकरोड येथील जवानांनी पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविले. कंपनीत असलेल्या हायडेंट लाइनमुळे 11 बंबांमध्ये कंपनीतच सलग पाच तास पाणी भरण्यात आले. फोमचाही वापर करण्यात आला. स्टोअर रूममधील रबरी वस्तूंसह काचा, दरवाजे असा माल जळून खाक झाला.

कारणांची चौकशी करणार

औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाच्या पथकानेही आगीचे वृत्त समजताच कंपनीत धाव घेऊन आग प्रतिबंधक उपाययोजनांबाबत सूचना केल्या. त्यापाठोपाठ आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली याचा तपास करण्याचा प्रयत्न आम्ही केला. या आगीचे निश्चित कारण समजल्यानंतर त्याबाबतचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. शॉर्टसर्किटमुळे अथवा कंपनीतील ज्वलनशील पदार्थांमध्ये उष्णता निर्माण झाल्याने आग लागण्याची शक्यता आहे. आर. एम. जोशी, कारखाना निरीक्षक, औद्योगिक सुरक्षा विभाग


महापौरांसह आमदारांची धाव

आगीचे वृत्त समजताच महापौर अँड. यतिन वाघ, आमदार वसंत गिते, आमदार नितीन भोसले, नगरसेवक शशिकांत जाधव, सलीम शेख, डी. जी. सूर्यवंशी, माजी नगरसेवक विजय ओहोळ, गोकुळ नागरे आदींनी कंपनीत जाऊन व्यवस्थापनातील अधिकार्‍यांशी चर्चा केली.


मोठा अनर्थ टळला

स्कार्पिओ बॉडीशॉप विभागाच्या शेजारीच पेंट शॉप विभाग आहे. या विभागात पेंट्स व थीनर यासारख्या ज्वलनशील वस्तू असतात. जर आगीची झळ या विभागास बसली असती तर महिंद्रचा प्लॅँटच उद्ध्वस्त झाला असता. कंपनीतील सुरक्षारक्षकांनी त्वरित उपाययोजना केल्याने अग्निशमन विभागाच्या जवानांना पाच तासात आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. बॉडीशॉप विभागात रात्रपाळीत काम होत नसल्याने या ठिकाणी सुदैवाने कामगार नव्हते. अन्यथा दिवसपाळीत ठिकाणी किमान दोनशेहून अधिक कामगार काम करीत असतात.