आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अण्णांच्या आंदोलनाची ऊर्जा पडद्यावर !

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराविरोधात सुरू केलेल्या आंदोलनाला देशभरातील तरुणाईने जो प्रचंड प्रतिसाद दिला त्या प्रतिसादामागील सकारात्मक ऊर्जा हा चित्रपटाचा विषय बनू शकतो असे वाटल्याने ‘भारत माझा’ हा चित्रपट करण्याचा निर्णय घेतला, असे प्रतिपादन ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी सोमवारी येथे केले.
दहाव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘भारत माझा’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना भावे म्हणाल्या, अण्णांच्या आंदोलनाविषयी, त्याला मिळणाºया प्रतिसादाविषयी, त्याबद्दलच्या विश्लेषकांच्या दृष्टिकोनाविषयी आणि त्यात सहभागी झालेल्या तरुणाईविषयी, आंदोलनाच्या संपूर्ण अहिंसक स्वरूपाविषयी सतत कुतूहल वाटत होते. त्यातूनच या चित्रपटाची कल्पना मनात आली. या आंदोलनकाळात एका मध्यमवर्गीय कुटुंबातील सदस्यांच्या जीवनात, मनात कोणते परिवर्तन घडते, वैयक्तिक पातळीवर ते कोणते नैतिक निर्णय स्वीकारतात याचे दर्शन या चित्रपटात घडते. चित्रपटाची पाश्वर्भूमी अण्णांच्या आंदोलनाची असली तरी त्याचा केंद्रबिंदू कुटुंब आणि व्यक्तिपातळीवरच आहे.
सुकथनकर म्हणाले, कुठलीही सेलिब्रिटी यामध्ये नाही. कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या मागे एक दिवस कॅमेरा फिरतो. त्या एका दिवसात ती व्यक्ती काय करते, तिला कोणते अनुभव येतात आणि लढ्याचे नैतिक पाठबळ तिला कोणत्या निर्णयापर्यंत आणते हे सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे. चित्रपटात कोणतेही लाइट्स, वेशभूषा, लोकेशन्स यांचा वापर करण्यात आलेला नाही हे विशेष.