आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अण्णांचे छायाचित्र वापरल्यास फौजदारी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना कोणालाही पाठिंबा जाहीर केलेला नाही. मात्र, त्यांच्या नावाचा गैरवापर करण्यासाठी काही उमेदवार त्यांचे छायाचित्र आपल्या फलकावर वापरण्याचा प्रयत्न करीत आहेत. असे आढळून आल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा अण्णांचे वकील अ‍ॅड. मिलिंद पवार यांनी शनिवारी एका पत्रकाद्वारे दिला.
या निवडणुकीत अनेक उमेदवारांनी अण्णांची भेट घेऊन त्यांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अण्णांना कोणत्याही उमेदवारास किंवा पक्षास, आघाडीस अधिकृत लेखी अथवा तोंडी पाठिंबा दिलेला नाही. अशा प्रकाराचा पाठिंबा देण्याची इच्छा अण्णांची नसून त्यांनी यापूर्वी तसे जाहीर केले आहे.
असे असतानाही व अण्णांनी याबाबत जाहीर करूनही काही उमेदवारांनी अण्णांचे छायाचित्र अहवालात प्रसिद्ध केलेले आहे. त्यांच्यावर आम्ही कायदेशीर फौजदारी कारवाई करणार आहोत. यापुढे कोणीही अण्णांचे छायाचित्र अथवा नामोल्लेख उमेदवारांनी त्यांच्या अहवालात, पत्रकात, फलकावर करू नये व मतदारांनी असा पाठिंबा गृहीत धरू नये. कोणी तसे केल्यास त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येईल, असे पवार यांनी कळवले आहे.