आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसाम हिंसाचार : विद्यार्थ्यांमध्ये भीती; चार हजार नागरिकांचे स्थलांतर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे/मुंबई- आसाममधील असंतोषाचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटू लागले आहेत. असुरक्षिततेची भावना निर्माण झालेले पुणे-मुंबईतील सुमारे चार हजारांपेक्षा अधिक पूर्वांचल नागरिकांनी ईशान्य भारताकडे स्थलांतर केले आहे. रोजगार व शिक्षणकरिता शहरात आलेले हे नागरिक आपल्या कुटुंबीयांच्या आग्रहास्तव परतत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
पुण्यात आतापर्यंत ईशान्य भारतातील मुलांवर हल्ल्याचे पाच प्रकार घडले असून, त्यात 14 आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदर विद्यार्थ्यांना मध्यंतरीच्या कालावधीत सुरक्षेच्या अडचणी निर्माण झाल्या होत्या, पण आता परिस्थिती निवळत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तर मुंबईत नुकत्याच झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर तेथील विद्यार्थ्यांत भीती निर्माण झाली आहे.
अशा वातावरणात न राहता आपल्या गावी परतण्याचा या नागरिकांचा कल दिसून येतो. पुणे शहरातील रेल्वे स्थानकावर गेल्या तीन- चार दिवसांपासून आसाम व पूर्वांचल भागातील प्रवाशांचीच गर्दी दिसून येते. रेल्वे स्टेशनचे व्यवस्थापक सुनील कमठान यांनी सांगितले की, ईशान्य भारतात परतणा-यांची संख्या लक्षात घेता पुण्याहून कोलकात्यास जाणा-या 21 डब्यांच्या आझाद हिंद एक्स्प्रेसला गुरुवारी अतिरिक्त दोन डबे जोडण्यात आले आहेत. त्यामुळे 400 प्रवाशांची अतिरिक्त सोय झाली.
पुणे स्टेशनवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून 55 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून आझाद हिंद एक्स्प्रेससोबत चार शस्त्रधारी पोलिसही तैनात करण्यात आले आहेत. पुणे शहरातील निगडी, चिंचवड, भोसरी, मुळशी, बारामती या ठिकाणी विविध कंपन्यात काम करणा-या कामगारांनीही एक ते दोन महिन्यांच्या सुट्या काढून स्थलांतर केल्याचे समोर आले आहे.
अल्पसंख्याकांचा पुढाकार - दहशतीच्या सावटाखाली असलेल्या पूर्वांचलमधील विद्यार्थ्यांनी शांतता व समन्वय वाढवण्यास सहकार्य करण्याची भूमिका कॅम्प भागातील अल्पसंख्याक बांधवांनी जाहीर केली आहे. सर्वधर्म समभाव प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित मिझो स्टुडंट असोसिएशनच्या स्नेहमेळाव्याचे स्वागतही अल्पसंख्याक नागरिकांनी केल्याची माहिती अपर पोलिस आयुक्त (दक्षिण विभाग) सी.जी. दैठणकर यांनी गुरुवारी दिली. या वेळी परिमंडळ दोनचे पोलिस उपआयुक्त रामनाथ पोकळे, पूर्वांचलमधील विद्यार्थी व सर्वधर्म समभाव प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.
मिझो स्टुडंट असोसिएशनचा अध्यक्ष जेकब ख्यांगटे म्हणाला, ईशान्य भारतातील अनेक विद्यार्थी पुण्यात शिक्षणासाठी आले आहेत. पूर्वांचलातील विद्यार्थी स्थानिकांशी समन्वय वाढवून शांतता प्रस्थापित करत आहे. विद्यार्थ्यांवर हल्ले घडू नयेत, याकरिता पोलिसांशी चर्चा, बैठका घेऊन अडचणी सोडविल्या जात आहेत.
प्रक्षोभक व्हिडिओमधून भडकावल्या जातात भावना- एका विशिष्ट समाजावर अन्याय होत असल्याचा व्हिडिओ फेसबुक, ट्विटर, गुगलच्या माध्यमातून प्रसारित केला जात आहे. या व्हिडिओमुळे पूर्वांचलातील विद्यार्थ्यांत भीतीचे वातावरण आहे. मात्र सदर व्हिडिओ बनावट असून, विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. संबंधित संकेतस्थळाच्या कंपन्यांशी पोलिसांना संपर्क साधला असून दोषींवर कारवाई केली जाईल, असे अप्पर पोलिस आयुक्त सी. दैठणकर यांनी सांगितले.
आम्ही कसे थांबवणार?- पुण्याचे पोलिस आयुक्त गुलाब पोळ म्हणाले, जर कोणाला स्वत:हून आपल्या राज्यात परत जायचे असेल तर त्यांना आम्ही त्यांना थांबवू शकत नाही. सदर विद्यार्थ्यांना त्यांचे कुटुंबीय बोलवत असल्याने ते स्थलांतर करत आहेत. रेल्वे स्टेशनवरील गर्दी ही जाणा-यांची नसून सोडवण्यास आलेल्यांची आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने शहरात सर्व उपाययोजना केल्या जात आहते. कोंढवा भागात पोलिस पेट्रोलिंग करत असून बीएसफ, एसआरपीच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
सुरक्षेची जबाबदारी सर्वांचीच : इक्बाल- सर्वधर्म प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहंमद इक्बाल म्हणाले, पुणे देशाची सांस्कृतिक राजधानी असून शहराचे नाव खराब होणार नाही याची दक्षता आम्ही घेऊ. परराज्यातील विद्यार्थी हे आमच्याकडे आलेले पाहुणे असून त्यांची सुरक्षेची जबाबदारी सर्वांचीच आहे. या विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधून शांततेचा संदेश या माध्यमातून दिला जात आहे.