आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Suresh Kalmadi, Bail Sanction, Delhi High Court, Pune

कलमाडींच्या परतण्याने पुणे काँग्रेसला बळ मिळणार का?

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पुढील महिन्यात पुण्यासह महाराष्ट्रातील १० महानगरपालिकाच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यातच गुरुवारी पुण्याचे खासदार सुरेश कलमाडी यांना दिल्ली हायकोर्टाने जामीन मंजूर केल्याने पुणे शहर काँग्रेसने आनंद व्यक्त केला आहे. त्यांच्या परतण्याने शहर काँग्रसेला बळ मिळेल व पालिका निवडणुकीत पक्षाला मोठे यश मिळेल, असे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी म्हटले आहे. तर कलमाडी यांना फक्त जामीन मंजूर केला आहे, आरोपातून मुक्त केलेले नाही हे सुज्ञ पुणेकरांना माहीत आहे, त्यामुळे कलमाडींच्या परतण्याचा काँग्रेसला काहीही फायदा होणार नाही, असा सूर विरोधी पक्षांनी लावला आहे.
कलमाडी हे पुण्याचे खासदार आहेत तसेच त्यांचे पुणे काँग्रेसमध्ये एकतर्फी वर्चस्व आहे. पुणे महानगरपालिकेत कलमाडी यांचे वर्चस्व राहिले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या जामीनाला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यातच काँग्रेसचा राज्यात व इतर पालिकांमध्ये सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यात काँग्रेस पक्षाबरोबर आघाडी न करण्याचा निर्णय घेतला. पुण्यात मागील काही वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व वाढत चालले आहे. गेल्या पाच वर्षात महापालिकेत पुण्यात राष्ट्रवादीने भाजप-शिवसेना व नंतर काँग्रेसच्या मदतीने सत्ता गाजविली. आता पुण्यात राष्ट्रवादीला स्वत:च्या ताकदीवर सत्ता मिळवायची आहे. त्यामुळे त्यांनी काँग्रेसबरोबर आघाडी केली नाही. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार व खासदार कलमाडी यांचे विळ्या-भोपळ्याचे नाते सर्व महाराष्ट्राला माहिती आहे.
या सर्व घटना पाहता येत्या पुणे पालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाला शहरात नेतृत्त्व करेल, अशी व्यक्ती नव्हती. जे काही नेते आहेत त्यांच्यात गटा-तटावरुन मोठे वाद आहेत. त्यामुळे त्यांच्यात एकमत होण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे काँग्रेस पक्षाने वनमंत्री पंतगराव कदम व सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे पुण्याची जबाबदारी दिली होती. मात्र तरीही कलमाडी यांची करामत ते करु शकणार नसल्याचे काँग्रेसच्या लक्षात होते, असे सूत्रांनी सांगितले.
भाजपचे पुणे शहराध्यक्ष विकास मठकरी यांनी कलमाडी यांना जामीन मिळाल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागावर टीका केली. केंद्रीय अन्वेषण विभाग हा 'कॉंग्रेस ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन' झाला असल्याचा आरोप त्यांनी केला. सीबीआयने न्यायालयात नेमकेपणाने युक्तिवाद न केल्यानेच कलमाडी यांना जामीन मिळाल्याचे मठकरी यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष वंदना चव्हाण म्हणाल्या, कलमाडी यांची जामीनावर मुक्तता झालेली आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपातून नव्हे. पुणे शहरातील नागरिक सुज्ञ आहेत. त्यांना कलमाडींबाबत चांगली माहिती असल्यामुळे येत्या पालिका निवडणुकीत पुणेकर कलमाडी व काँग्रेसला दूरच ठेवतील. त्यामुळे काँग्रेसने फार हुरळून जाऊ नये.
पुणे शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड यांनी कलमाडी यांच्या जामीनावरील सुटकेबाबत आनंद व्यक्त केला आहे. तसेच त्यांच्या परत येण्याने काँग्रेसला बळ मिळाले असून, कलमाडी काँग्रेस पक्षाला पुन्हा पालिकेत सत्ता मिळवून देतील, असा विश्वास व्यक्त केला. वनंमत्री पंतगराव कदम यांनीही कलमाडी परत आल्यानंतर त्यांच्याबरोबर चर्चा करुन पक्षाला पुणे शहरात यश मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु, असे म्हटले आहे.