आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रंगकर्मी कन्हाईलाल यांना तन्वीर सन्मान

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. श्रीराम लागू यांच्या रूपवेध प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा तन्वीर सन्मान या वर्षी मणिपूर येथील कला क्षेत्राचे संस्थापक संचालक व ज्येष्ठ रंगकर्मी हयसनम कन्हाईलाल यांना देण्यात येणार आहे. तसेच प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार गिरीश जोशी यांना जाहीर झाला आहे.
एक लाख रुपये आणि मानचिन्ह असे तन्वीर सन्मानाचे स्वरूप आहे. पुण्यात 9 डिसेंबरला पुरस्कारांचे वितरण होणार आहे. प्रतिष्ठानतर्फे दीपा लागू यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. रंगभूमीसंदर्भात अखिल भारतीय स्तरावर महनीय कार्य केलेल्या रंगकर्मींविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हा या पुरस्कारामागील हेतू असल्याचे लागू म्हणाल्या. कन्हाईलाल हे 45 वर्षे सातत्याने रंगभूमीवर नवे प्रयोग करत आहेत. कला क्षेत्र मणिपूरची स्थापना त्यांनी 1९६९ मध्ये केली. त्यांच्या पत्नी सावित्री याही रंगभूमीशी निगडित आहेत. शालेय जीवनापासून कन्हाईलाल रंगभूमीवर वावरत आले आहेत. बादल सरकार यांच्यासोबतही त्यांनी काम केले आहे. पर्यायी रंगभूमी निर्माण करण्याच्या प्रयत्नात ते रमले.
अकादमीकडूनही सन्मानित
जवाहरलाल नेहरू संशोधनवृत्ती, एमेरिटस फेलोशिपचे कन्हाईलाल मानकरी आहेत. इंडोनेशिया, मलेशियातील सादरीकरणाच्या परंपरांचे संशोधन त्यांनी केले. भारतातील विविध भागांतील रंगकर्मींसाठी त्यांनी विविध शहरांत वीस कायर्शाळा घेतल्या आहेत. आपले नाट्यप्रयोग त्यांनी देशविदेशात सादर केले आहेत. संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळवणारे ईशान्य भारतातील ते पहिले कलाकार आहेत.