आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफलटण - वारकरी संप्रदायाचा विरोध झुगारून महाराष्ट्र सरकार अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याबाबत वारंवार विश्वासघात करत आहे. तसेच वारक-यांच्या अनेक प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. त्याच्या निषेधार्थ 13 जुलै रोजी सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर धर्मपुरी येथे आंदोलन करण्याचा व मागण्या मान्य झाल्याशिवाय सोलापूर जिल्ह्यात प्रवेश न करण्याचा इशारा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली पालखी सोहळ्यातील दिंडी चालक- मालकांच्या बैठकीत गुरुवारी देण्यात आला.
वारक-यांशी चर्चा न करता सरकारने अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचा घाट घातला आहे. शासनाने कायद्याचा मसूदा अद्यापही वारक-यांना दिलेला नाही, ही घोर फसवणूक आहे. या कायद्यात वारक-यांना त्रासदायक ठरणारी कलमे आहेत. त्यामुळे आमचा पूर्णत: विरोध आहे. तसेच सर्व तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी मद्य व मांस यांच्या विक्रीवर पूर्णत: बंदी घालावी. वारक-यांना भारूड म्हटल्याबद्दल अॅट्रॉसिटीच्या कायद्याखाली कारागृहात डांबण्यात आले आहे, कोल्हापूर येथे संत तुकाराम महाराजांची गाथा जाळण्यात आली, या गंभीर बाबी आहेत. त्यामुळे यापुढे संत, संतसाहित्य यावर चिखलफेक करणा-यांवर कारवाई होण्यासाठी कडक कायदा करावा, गोहत्या बंदी कायदा त्वरीत लागू करावा, पालखी मुक्कामी तळावर 50 एकर जमीन प्रत्येक ठिकाणी आरक्षित ठेवावी, आळंदी ते सोलापूर जिल्हा हद्द हा मार्ग चौपदरी करावा व धमर्पुरी फाटा ते पंढरपूर हा मार्ग सहापदरी करावा आदी मागण्या पालखी मालक- चालकांनी केल्या आहेत.
श्रीमंत शितोळे सरकार यांच्या पालावर झालेल्या या बैठकीस पालखी मालक बाळासाहेब आरफळकर, पालखी सोहळा प्रमुख डॉ. प्रशांतजी सुरू, राजाभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार, माऊली पालखी सोहळा दिंडी समाज अध्यक्ष भानुदास ढवळीकर, नामदेव वासकर, राणो वासकर, वारकरी फडकरी दिंडी संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जळगावकर, जयसिंग महाराज मोरे (देहूकर) आदी उपस्थित होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.