आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणांनो, कल्पना लढवा-उद्योजक व्हा !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - उद्योग करण्याची इच्छा आहे, पण पैसे नाहीत. कल्पना आहेत; परंतु साकारण्यासाठी सहकार्य नाही. अशा अवस्थेतील तरुणांसाठी लोकमंगल उद्योग समूहाने अभिनव योजना दिली आहे. ‘कल्पना लढवा, उद्योजक व्हा!’ मदतीसाठी सबकुछ लोकमंगल..., अशी ही योजना आहे. यासाठी 3 ते 15 मे दरम्यान नोंदणी केली जाणार आहे.
लोकमंगल परिवाराचे युवाप्रमुख रोहन देशमुख यांनी ही योजना जाहीर केली आहे. तरुणांनी उद्योग, व्यवसायाच्या कल्पना सुचवायच्या आहेत. ती त्यांची स्वप्ने असोत की वास्तव, त्यांचा अभ्यास करणे, प्रकल्प अहवाल तयार करणे, अर्थसाहाय्य ठरवणे आणि संबंधित उद्योग उभारणीपर्यंत त्याचा पाठपुरावा करणे अशी सर्व कामे लोकमंगल समूह करणार आहे. अगदी भाजीपाला विक्री, नाभिक दुकान, किराणा दुकान ते उत्पादने बनवण्यापर्यंतच्या
कल्पना या योजनेत असू शकतील. त्यासाठी पाच लाखांपासून एक कोटी रुपयांचे बिनव्याजी अर्थसाहाय्य लोकमंगल करणार आहे, पण परतफेडीच्या अटीवर. केवळ अर्थसाहाय्य करून सोडून दिले असे नाही, तर लोकमंगलची यंत्रणाच त्याच्या पाठीशी उभी राहील. उत्पादनापासून विक्रीपर्यंतची मदत त्याला मिळेल.
कुठल्याही चांगल्या प्रकल्पाला अर्थसाहाय्य करताना राष्ट्रीयीकृत बँका 20 ते 25 टक्के रक्कम लाभार्थीला उभी करण्याची सूचना करतात. ही क्षमता काही तरुणांमध्ये नसते. लोकमंगलचे अर्थसाहाय्य अशा प्रकल्पांनाही असेल, असे स्पष्ट करून देशमुख यांनी या योजनेत शहर व जिल्ह्यातील युवकांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. गेल्या दोन वर्षांत राबवलेल्या या योजनेतून बरेचसे उद्योजक तयार झाले आहेत. एक हजार उद्योजक तयार करण्याचे उद्दिष्ट ‘लोकमंगल’ने ठेवले आहे.
* कल्पक तरुण चांगले उद्योजक, व्यावसायिक होऊ शकतात. केवळ पैशांमुळे त्यांना संधी मिळत नाही. त्यामुळे पुढे ते गुरफटून जातात. त्यांच्या इच्छा, आशा, अपेक्षांना बळ दिले तर त्यांचा विकास होतोच, शिवाय सोलापूरच्या वैभवातही भर पडू शकते.’’- रोहन देशमुख, युवाप्रमुख, लोकमंगल समूह