आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 8 Karnataka Ministers Loyal To Yeddyurappa Resign

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजप संकटात : कर्नाटकात राजीनामासत्र, गुजरातमध्येही बंडाचा झेंडा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - कर्नाटकातील भाजप सरकार पुन्हा एकदा संकटात आहे. माजी मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांच्या आठ समर्थक मंत्र्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री सदानंद गौडा यांच्याकडे राजीनामे सादर केले. दरम्यान, गुजरातेत मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर नाराज केशुभाई पटेल आणि काशीराम राणा या नेत्यांनी पक्ष सोडण्याचे संकेत दिले आहेत.
कर्नाटकात बंडखोर नेते सी. एम. उदासी यांनी राजीनामे दिल्याची माहिती पत्रकारांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानीच दिली. या वेळी त्यांच्यासमवेत उमेश कट्टी, एम. पी.रेणुकाचार्य, मुरुगेश निरानी, बस्वराज बोम्मई, व्ही. सोमन्ना, रेवू नाईक बेलमागी आणि जगदीश शेट्टार हे मंत्री होते. आणखी एक मंत्री राजू गौडा शनिवारी राजीनामा देणार असल्याचे सांगून शोभा करंदळजे पण राजीनाम्याच्या तयारीत असल्याचे उदासी म्हणाले.
मुख्यमंत्री गौडा यांना हटवून शेट्टार यांना मुख्यमंत्री करावे, अशी येड्डीसमर्थकांची मागणी आहे. मात्र राष्ट्रपतिपदाची निवडणूक होईपर्यंत बदल शक्य नसल्याचे हायकमांडचे म्हणणे आहे. पक्षाचे कर्नाटक प्रभारी धर्र्मेंद्र प्रधान यांनी नेतृत्वबदलास नकार देत दिल्लीत मुख्यमंत्री गौडा यांची स्तुती केली आहे.
केशुभाई-राणा मोदींविरुद्ध सरसावले - भाजपातील बंडाचे लोण गुजरातेतही पोहोचले. पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांनी शुक्रवारी आपल्या निवासस्थानी नरेंद्र मोदींवर नाराज असलेल्या नेत्यांची बैठक बोलावली. यात काशीराम राणाही सहभागी झाले. दरम्यान, मोदींविरोधक मानले जाणारे माजी मुख्यमंत्री सुरेश मेहता यांनी केशुभाई तिसरी आघाडी बांधणार असल्याचे सांगत केशुभाई समर्थकांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला. ऑगस्टमध्ये राज्याचा दौरा करून केशुभाई महागुजरात पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. यामुळे गुजरातमधील आगामी विधानसभा निवडणुकीत मोदींची अडचण होऊ शकते.
सरकार बरखास्तीची मागणी - कर्नाटक प्रदेश काँग्रेसने राज्यातील भाजप सरकार तातडीने बरखास्त करण्याची मागणी केली. अध्यक्ष डॉ. परमेश्वर यांनी ही मागणी करताना भाजप सरकारवर प्रचंड टीका केली. सरकार बरखास्त करून नव्याने जनादेश घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. सदानंद गौडा यांनी गुरुवारी गेल्या चार वर्षांत राज्य सरकारने केलेल्या कामगिरीचा लेखाजोखा मांडणारी पुस्तिका प्रसिद्ध केली. मात्र यातील आकडेवारी चुकीची असल्याचा दावा त्यांनी केला. ही जनतेची दिशाभूल असल्याचे परमेश्वर म्हणाले.
विश्वास उडत चालला - गेल्या तीन-चार महिन्यांत मंत्री व मुख्यमंत्र्यांत प्रचंड बेबनाव आहे. परस्परांवर विश्वासच राहिलेला नाही. आमदारांचे प्रश्न मार्गी लागत नाहीत. विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्याची मागणी आम्ही केली. मात्र बैठक बोलावली नाही. म्हणून आम्हाला राजीनामा देण्याशिवाय आता पर्यायच राहिला नाही.’ - सी. ए. उदासी, सार्वजनिक बांधकाम मंत्री, कर्नाटक
या कारणांमुळे मोदी भाजपात आहेत सर्वांपेक्षा वरचढ