आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धगधगता आसाम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आसाममध्ये हिंसाचार ही काही नवीन बाब राहिलेली नाही. 1952 पासून येथील आदिवासी बोडो समाज आणि मुस्लिमांमध्ये संघर्ष सुरू आहे. गेल्या 19 जुलैला आसाममधील कोक्राझार परिसरात सुरू झालेल्या हिंसाचारामुळे आता असा सवाल विचारला जात आहे की, आसाममधील काही जिल्हे संवेदनशील आहेत, हे केंद्र व राज्य सरकारला माहीत असतानाही त्यांनी आधीपासूनच खबरदारी का घेतली नाही? विशेष म्हणजे आसाममध्ये काँग्रेसचे आणि केंद्रात काँग्रेसप्रणीत संपुआचे सरकार आहे. अशा वेळी परिस्थितीत सहज सुधारणा करता आली असती. मात्र तसे झाले नाही. या हिंसाचारामुळे 2002 मधील गुजरात दंगलींच्या कटू आठवणी ताज्या झाल्या. त्या वेळी गुजरातमध्ये भाजपचे आणि केंद्रात भाजपप्रणीत रालोआचे सरकार होते. मात्र तेव्हादेखील राजकीय पक्ष आरोप-प्रत्योराप करत राहिले. आसामबाबतही असेच होत आहे. आसाममध्ये सर्वात वाईट काळ 1983 चा होता. त्या वर्षी जवळपास 3 हजार लोकांचा हिंसाचारात बळी गेला.
ताज्या संघर्षाचे कारण - गेल्या 29 मे रोजी अखिल बोडोलँड मुस्लिम विद्यार्थी संघटनेने कोक्राझारमध्ये बंदचे आवाहन केले होते. त्या वेळी कथितरीत्या कुणीतरी तेथील एका मशिदीवरील पाटी काढली. बोडोलँड क्षेत्रीय प्रशासन परिषदेने नंतर म्हटले की, या मशिदीचे बांधकाम अवैधरीत्या वन क्षेत्रावर झालेले आहे. त्यानंतर तेथे निदर्शने सुरू झाली. बोडो क्षेत्रीय प्रशासन परिषदेचे प्रमुख माजी बोडो बंडखोर नेता हगरामा मोहिलारी यांनी आंदोलकांना बळजबरी कार्यालये व दुकाने बंद करण्यास मनाई केली. त्यामुळेच तेथे हिंसक संघर्ष सुरू झाला. या संघर्षात एक बोडो विजय ब्रrा जखमी झाला. प्रत्युत्तरात बोडो समाजाच्या लोकांनी अखिल बोडोलँड मुस्लिम विद्यार्थी संघटनेचे संस्थापक मोहिबुल इस्लाम आणि अब्दुल सिद्दिकी यांची हत्या केली. त्यानंतर मुस्लिम समाजाच्या लोकांनी बोडो लिबरेशन टायगर्स संघटनेच्या चार माजी सदस्यांना ठार मारले. अशा प्रकारे हिंसाचाराची आग पसरत गेली आणि कोक्राझारसह चार जिल्हे या आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या संघर्षात आतापर्यंत 53 लोक मारले गेले आहेत, तर चार लाख लोक बेघर झाले आहेत.
कोक्राझारच का? नुकत्याच उसळलेल्या हिंसाचारात पश्चिम आसाममधील चार जिल्हे होरपळले आहेत. कोक्राझार जिल्हा बोडो आदिवासींचा गड आहे. येथे मुस्लिम प्रवासी आणि बोडो फुटीरतावादी बंडखोरांदरम्यान सतत संघर्ष होतो. त्याची परिणती राज्यातील इतर भागांतील हिंसाचारात होते. कोक्राझारचा हा परिसर अतिशय महत्त्वाचा आणि संवदेनशील आहे. कारण तो आसामला देशाच्या इतर भागाशी जोडतो.

गेल्या पंधरवड्यात आसाममध्ये सुरू झालेल्या हिंसाचाराने या राज्याला जबरदस्त हादरा दिला आहे. पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी तर हा राष्ट्रावरील कलंक असल्याचे म्हटले आहे. 2002 मध्ये गुजरात दंगलीच्या वेळी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनीही अशीच प्रतिक्रिया व्यक्त केली होती. मात्र राजकारणापलीकडचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे,
आसाम वारंवार हिंसाचाराच्या आगीत का होरपळतो?
25 वर्षांपासून बोडोलँडची मागणी - बोडो आदिवासी 25 वर्षांपासून स्वतंत्र बोडोलँड राज्याची मागणी करत आहेत. हा प्रदेश आसामच्या एकूण भौगोलिक क्षेत्राचा जवळपास अर्धा हिस्सा आहे. भारताच्या आर्थिक विकासानंतरही या प्रदेशात विकासाच्या मंद वेगाने स्वतंत्र बोडोलँडच्या मागणीला बळ मिळाले. ऑल बोडो स्टुडंट्स युनियन व सशस्त्र बंडखोरांच्या दोन संघटना या चळवळीचे नेतृत्व करत आहेत. बोडो लिबरेशन टायगर्सने 2003 मध्ये शस्त्रे खाली ठेवली होती, तर नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ बोडोलँड आता संघर्ष थांबवण्याच्या पवित्र्यात आहे. याच वर्षी मार्चमध्ये आपल्या संघर्षाला 25 वष्रे पूर्ण झाल्यानिमित्त बोडो नेत्यांनी पुन्हा घोषणा केली की, बोडोलँड आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि आम्ही कोणत्याही किमतीवर तो मिळवू.

संघर्षाचे बीज ब्रिटिश काळ ते विद्यार्थी राजकारण - या संघर्षाचे मूळ ब्रिटिश काळात आहे. तेव्हा तेथील इंग्रज छोटा नागपूर पठारावरून आदिवासींना आणून त्यांच्याकडून चहाच्या मळ्यात काम करवून घेत. त्या बदल्यात या आदिवासींना जमिनीचे छोटे-छोटे तुकडे दिले जात होते. त्यानंतर 1930 च्या दशकात येथे पूर्व बंगालमधून (जो आता बांगलादेश बनला आहे) मुस्लिम समाजातील लोकांचे आगमन सुरू झाले. हे दोन्ही वर्ग खूप मेहनती होते आणि जमिनीचे छोटे तुकडे कसे मोठे करायचे, हे त्यांना चांगले माहीत होते. त्यानंतर स्थानिक बोडो समाजातील लोक आणि बंगाली भाषिक मुस्लिम समाजात तेढ निर्माण झाली. ही तेढ 1970 च्या दशकात संघर्षात रूपांतरित झाली. याच संघर्षामुळे येथे विद्यार्थी राजकारणास महत्त्वाची भूमिका निभावण्याची संधी मिळाली.