आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसाम पुन्हा पेटले : बक्सा, कामरूप जिल्ह्यांत नव्याने हिंसाचार, 9 जखमी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोक्राझार- आसाममधील बक्सा आणि कामरूप जिल्ह्यांत नव्याने हिंसाचार उफाळला आहे. गोसाइगावात गुरुवारी झालेल्या संघर्षात नऊ जण गंभीर जखमी झाले. ऑटोरिक्षातून जाणार्‍या लोकांवर काही समाजकंटकांनी अँसिड फेकले. संचारबंदीतून दिवसभर सूट दिलेली असताना ही घटना घडली. गोसाइगावात रात्रीची संचारबंदी मात्र लागू आहे.
दरम्यान, दक्षिण भारतात आसामी लोकांवर हल्ले होत असल्याची अफवा पसरल्याने बंगळुरूसह अन्य शहरांतून ईशान्य भारतातील लोक परतू लागले आहेत. यामुळे दिवसभर रेल्वेगाड्यांना प्रचंड गर्दी होती. अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. कामरूप जिल्ह्यातील ग्रामीण भागात हिंसाचाराचे लोण पोहोचले आहे. गुरुवारी गुवाहटीकडे जाणारी काही वाहने अज्ञात लोकांनी पेटवली. या जाळपोळीनंतर अनेक जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रीय महामार्गाचेही दंगेखोरांनी नुकसान करण्यात आले आहे. काही लाकडी पूलही जाळण्यात आले. हिंसाचाराच्या या घटनांनंतर या भागात लष्कराला पाचारण करण्यात आले.
प्रकरण काय आहे : 19 जुलै रोजी आसाममध्ये दोन गटांतील संघर्षात चार जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. या हिंसाचारात आतापर्यंत 77 लोकांचा बळी गेला, तर जवळपास 4.50 लाख लोकांनी निर्वासित छावण्यात आसरा घेतला आहे.
पोलिसांची रायफल पळवणारा अटकेत
मुंबई - आझाद मैदान परिसरात 11 ऑगस्टला रझा अकादमीच्या आंदोलनानंतर झालेल्या दंगलीत पोलिसांची एसएलआर रायफल पळवणार्‍या सलीम चौकीया या दंगेखोराला पोलीसांनी गुरूवारी ताब्यात घेतले आहे. चौकीया याच्याकडून पळवलेली एसएलआर तुटलेल्या अवस्थेत मिळाली. चौकीयाच्या चौकशीतून अनेक गोष्टी बाहेर येतील, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. 11 ऑगस्टच्या आझाद मैदानातून पोलिसांच्या 2 रायफली, 161 काडतूसे पळवली होती.
आसाम हिंसाचार : विद्यार्थ्यांमध्ये भीती; चार हजार नागरिकांचे स्थलांतर