आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Atal Bihari Vajpayee Time Government Bettar Than Upa Government Says Sharad Pawar

यूपीए सरकार अस्थिर, वाजपेयींचा काळ बरा - शरद पवार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आज देशात छोटे पक्ष बलवान होऊ पाहत आहेत. त्यामुळे अस्थिरता वाढत आहे. तुलनेने वाजपेयींच्या काळात केंद्रात स्थिर सरकार होते, असे उद्गार केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी काढले. यूपीएचे सरकार अस्थिर असल्याची कबुलीही त्यांनी दिली.
औरंगाबादेतील भरगच्च कार्यक्रम आटोपून दिल्लीला जाताना विमानात त्यांनी ‘दिव्य मराठी’ला खास मुलाखत दिली. त्यांनी विविध विषयांवर परखड भाष्य केले. केंद्रातील यूपीएचे सरकार अस्थिर असल्याचे पवारांनी मान्य केले. ते म्हणाले, आज परिस्थिती चांगली नाही. अस्थिरतेचे वातावरण आहे. छोटे पक्ष मोठे होऊ पाहत आहेत. ममता बॅनर्जी, मुलायमसिंह, जयललिता वेळोवेळी स्वतंत्र अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतात. हे छोटे पक्ष बलवान होत आहेत. त्यामुळेच ही अस्थिरता आहे. त्रिशंकू सरकार नसावे. कारण अशा सरकारचा जनतेवर परिणाम होत असतो.
मी तर वाटच पाहतोय : अण्णा मंत्र्यांवर, पंतप्रधानांवर आरोप करतात, ते आरोप खोटे असतील तर मग त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला का भरत नाहीत, या प्रश्नावर शरद पवार म्हणाले की, अण्णा फक्त बोलत असतात. पुरावे देत नाहीत. आम्ही त्यांना म्हटले आहे की, पुरावे द्या, आम्ही कारवाई करू. ते फक्त 13 मंत्री भ्रष्ट आहेत असे सांगतात, थेट पुराव्यानिशी आरोप करीत नाहीत. त्यांनी केलेल्या आरोपांचे पुरावे द्यावेत. मी तर त्याची वाटच पाहतोय.
धान्याची टंचाई नाही - दुष्काळी परिस्थितीबद्दल पवार म्हणाले की, यंदा दुष्काळाची परिस्थिती असली तरी अन्नधान्याची टंचाई भासणार नाही, एवढा मुबलक साठा देशात आहे. आम्ही 1972चा दुष्काळ पाहिला आहे. तेव्हा लोकांना लाल गहू खावा लागला. आता तशी अवस्था मुळीच नाही. धान्य उत्पादन वाढले असले तरी गोदामांची संख्या कमी आहे हे मात्र मान्य करावेच लागेल.
अण्णांची क्रेझ संपली - अण्णांची क्रेझ आता संपली आहे. त्यांना आता फारसा पाठिंबा मिळणार नाही. त्यांना खूप इगो आहे. माहिती अधिकारासाठी आम्ही सारे प्रयत्न केले. भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाच्या नावाखाली ज्या भानगडी सुरू आहेत त्या बरोबर नाहीत.
अजित अभ्यासू, सुप्रिया संघटक - अजित पवार यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, अजित तोंडाने फटकळ आहे. त्याचा आवाजही काहीसा मोठा आहे, परंतु त्याचा राज्याचा अभ्यास चांगला आहे. सुप्रिया सुळे यांच्याबद्दल ते म्हणाले की, अजित आणि सुप्रिया यांची कामाची स्टाइल वेगळी आहे. सुप्रिया संघटन अतिशय चांगले करते. परवा मुंबईत झालेला युवती मेळावा भूतो न भविष्यति होता.
'सरकार मनमोहनसिंग यांचे, अधिकार मात्र सोनियांच्या हाती, म्हणूनच ही वेळ'
काळ्या पैशांबाबत पवारांचा बाबांना पाठिंबा
राज्यातील निर्णयप्रकिया ठप्प- पवारांचे मुख्यमंत्र्यावर शरसंधान
सरकार चालवताना समन्वय आवश्यक; शरद पवार यांचे प्रतिपादन