आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सत्यमेव जयते : बाल शोषणाच्या तक्रारींचा पाऊस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - चित्रपट अभिनेता आमिर खानच्या ‘सत्यमेव जयते’ या टीव्हीवरील कार्यक्रमाने सर्वांची हृदये हेलावून टाकली असतानाच या कार्यक्रमामुळे लहान मुलांमध्येही अत्याचाराविरुद्ध आवाज बुलंद करण्याची उमेद जागवल्यामुळे स्वयंसेवी संस्थांकडे तक्रारींचा पाऊस पडू लागला आहे. गेल्या तीनच दिवसांत बाल अत्याचारासंबंधीच्या तब्बल 12 तक्रारी प्राप्त झाल्याचा दावा भोपाळमधील एका स्वयंसेवी संस्थेने (एनजीओ) केला आहे.
आमिर खानच्या ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमाचा दुसरा भाग ‘बालकांचे लैंगिक शोषण’ या विषयावर 13 मे रोजी प्रसारित झाल्याबरोबर ‘चाइल्डलाइन’च्या भोपाळस्थित कार्यालयात लगेचच बाल लैंगिक शोषणाच्या दोन आणि पालक व नातेवाइकांकडून मारझोड होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या, असे चाइल्डलाइन या एनजीओच्या संचालिका अर्चना सहाय यांनी सांगितले. गेल्या तीनच दिवसांत आमच्याकडे बाल अत्याचारासंबंधीच्या तब्बल 12 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यापूर्वी एवढ्या मोठ्या संख्येने तक्रारी कधीच प्राप्त झाल्या नव्हत्या, असे सहाय म्हणाल्या. काही प्रकरणात मुलांना त्यांचे पालक किंवा नातेवाइकांकडून मारझोड होत असल्यामुळे मदतीसाठी ती बालके चाइल्डलाइनकडे आली आहेत. विशेष म्हणजे आमिर खानच्या कार्यक्रमामुळे आता पालकही त्यांच्या मुलांसाठी आमच्या एनजीओकडे मदत मागू लागले आहेत. ‘सत्यमेव जयते’मुळे लोकांमध्ये या संवेदनशील प्रश्नाबाबत जागृती निर्माण झाली आहे, असे सहाय यांनी सांगितले.