आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदींची स्तुती, विजय दर्डा गोत्यात; हायकमांडने मागविला अहवाल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद/दिल्ली- गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची तोंडभरून स्तुती केल्यामुळे काँग्रेसचे खासदार विजय दर्डा चांगलेच गोत्यात आले आहेत. रविवारी मोदी यांचा त्यांनी ‘गुजरात का शेर’ आणि ‘राष्‍ट्रीय संत’ अशा शब्दांत गौरव केला आहे. यामुळे दर्डा यांना पक्षश्रेष्ठींच्या रोषाला बळी पडावे लागणार असल्याचे संकेत पक्षातून मिळाले आहेत. गुजरातच्या प्रभारींकडून या प्रकरणाचा अहवाल मागवण्यात आला आहे. राष्‍ट्रसंत तरुणसागरजी महाराजांच्या प्रेरणेने देण्यात येणारा तरुण क्रांती पुरस्कार 2012 स्वीकारण्यासाठी दर्डा अहमदाबादेत आले होते.
कदाचित दर्डांचे निलंबन होईल : मोदी
कार्यक्रमाच्या समारोपात मोदी म्हणाले, ‘मला येण्यास उशीर झाला. दर्डांचे बोलणे ऐकू शकलो नाही, परंतु शेवटी जे ऐकायला मिळाले त्यामुळे काळजी वाटते. त्यांनी मला ‘शेर’ संबोधले म्हणून कदाचित काँग्रेसश्रेष्ठी त्यांच्या हाती निलंबनाचे पत्र देतील. परंतु पुन्हा विचार आला की, नाही. दर्डाजी मीडिया पर्सन आहेत. त्यामुळे काँग्रेस त्यांना सपासारखी वागणूक देणार नाही. अन्यथा उद्या हीच ब्रेकिंग न्यूज झाली असती.’
वादग्रस्त बोललो नाही-दर्डा : आपल्या वक्तव्यावरून वादंग उठवण्याची जाणीव होताच दर्डांनी बचावात्मक पवित्रा घेतला. कार्यक्रमस्थळाबाहेर ते म्हणाले की, हा काही राजकीय मंच नव्हता. गुजरातचे पाहुणे म्हणून आल्यानंतर यजमानाचा आनद करणे आमची संस्कृती आहे. मी जे काही बोललो त्याचा राजकीय अर्थ काढला जाऊ नये. मी तर लोकसभेतही म्हणालो होतो की, तुमच्या आईने तुमचे नाव नरेंद्र ठेवले आहे. तेव्हा मोठे झाल्यावर तुम्ही काहीतरी मोठे काम कराल. मी काहीही वादग्रस्त बोललेलो नाही. वाटले असते तर मी राजकीय भाषणबाजी करू शकत होतो, असेही दर्डा म्हणाले.
अहवाल आल्यानंतरच निर्णय : काँग्रेस
दर्डा नेमके काय बोलले याबाबत पक्षाचे गुजरात प्रभारी मोहनप्रकाश यांच्याकडून अहवाल घेऊ आणि नंतरच याप्रकरणी काय करायचे ते ठरवता येऊ शकेल, असे काँग्रेस सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी सांगितले. दर्डा यांच्यावर कारवाई होणार काय या प्रश्नावर ते बोलत होते. मोहन प्रकाश हेच महाराष्‍ट्राचेही काँग्रेस प्रभारी आहेत.

काँग्रेसने प्रतिक्रिया द्यावी
कोणी काय बोलावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. खासदार विजय दर्डा यांनी त्यांना जे वाटले, ते सांगितले. यावर कॉंग्रेसवाल्यांनी प्रतिक्रिया द्यावी. मी या वादात पडू इच्छित नाही. मोदींना आमचा मात्र कायमच वैचारिक विरोध राहिला आहे.
बबनराव पाचपुते, राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व आदिवासी कल्याण मंत्री

यांनाही भोवली मोदींची स्तुती
मौलाना जी.एम. वस्तानवी
दारूल उलूम देवबंदचे कुलगुरू मौलाना गुलाम मोहंमद वस्तानवी यांना गतवर्षी जानेवारी महिन्यात पदावर आल्यानंतर काही महिन्यांतच राजीनामा द्यावा लागला होता. त्यांनी मुख्यमंत्री मोदी यांची स्तुती केली होती. राज्यात झालेल्या विकासाचा इतर समाजांसोबतच मुस्लिमांनाही फायदा झाला असल्याचे वस्तानवी यांनी म्हटले होते.
ए.पी. अब्दुल्ला कुट्टी
मोदी यांची प्रशंसा केल्याबद्दल माकपने 5 मार्च 2009 रोजी आपले खासदार ए.पी. अब्दुल्ला कुट्टी यांची हकालपट्टी केली होती. कुट्टी यांनी दुबईतील एका कार्यक्रमात मोदी यांच्या विकासाच्या मॉडेलची स्तुती केली होती. गुजरातेतील विकास पाहण्यासाठी आपल्या केरळ राज्यातील सत्ताधारी डाव्या आघाडीच्या सरकारने आपले शिष्टमंडळ पाठवावे, असा सल्लाही त्यांनी दिला होता.
शाहिद सिद्दिकी
समाजवादी पार्टीने अलीकडेच शाहिद सिद्दिकी यांच्याशी नाते तोडले आहे. सिद्दिकी यांनी आपले उर्दू वृत्तपत्र नई दुनियासाठी मोदी यांची मुलाखत घेतली होती. गुजरात दंगलींच्या संदर्भात मोदी यांनी गुन्हेगार असेल, तर आपल्याला फासावर लटकवावे, असे म्हटले होते.

वरिष्ठांनीच निर्णय घ्यावा : उत्तमसिंग पवार
माजी खासदार उत्तमसिंग पवार म्हणाले की, दर्डा माझे मित्र आहेत. ते असे काही बोलले असतील, हे पटत नाही. त्यांच्यावर तसे संस्कार नाहीत. कदाचित आदमखोर शेर असे काही त्यांना म्हणायचे असेल; पण बोलण्याच्या ओघात फक्त शेर असा उल्लेख केला असावा. त्यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठांनीच योग्य तो निर्णय घ्यावा.

स्थानिक नेत्यांचे मौन!
पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांनी या संदर्भात प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली. ‘मी गर्दीच्या ठिकाणी आहे. आपले बोलणे मला काहीही ऐकू येत नाही’, असे सांगत त्यांनी वेळ मारून नेली. आमदार डॉ. कल्याण काळे म्हणाले की, ‘मला नेमकी बातमी काय आहे हेच माहीत नाही.’ आमदार एम. एम. शेख ‘नंतर बोलतो’, असे म्हणत पुन्हा संपर्क साधणे कटाक्षाने टाळले. जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे यांनीही प्रतिक्रियेस नकार दिला.


गुजरात का शेर आया : दर्डा
महाराष्‍ट्रातून राज्यसभेवर खासदार असलेले दर्डा पुरस्काराला उत्तर देत असतानाच मोदींचे आगमन झाले. ते आल्यामुळे चुळबूळ सुरू झाल्याचे पाहून दर्डा म्हणाले, इतनी हलचल क्यों हैं.... गुजरात का शेर आया है! त्यासरशी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. दर्डा पुढे म्हणाले, या ठिकाणी चार राष्‍ट्रसंत आहेत. मुनी तरुणसागर महाराज, बाबा रामदेव, राष्‍ट्रसंत मोदी आणि चौथा मी स्वत:!

मोदींनी हात जोडले....
मोदी मंचाकडे येत होते. दर्डांकडून सुरू असलेले गुणगान कानावर पडताच ते सावध झाले. दर्डांनी त्यांना ‘गुजरात का शेर’ संबोधले तेव्हा मोदी मंचावर होते. दर्डांचे विचार ऐकून त्यांनी हात जोडून मूक प्रतिक्रिया दिली.
गुजरात दंगलीप्रकरणी दोषी आढळल्यास भरचौकात फाशी द्या : नरेंद्र मोदी
PHOTOS : जपानमध्ये चमकले नरेंद्र मोदी, \'२०१४मध्ये देशात एनडीएच सत्तेत\'
नरेंद्र मोदी आत्महत्या करणार होते- केशूभाई पटेलांचा खळबळजनक दावा