आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘त्यांनी’ आयुष्यात पहिल्यांदाच रेल्वे पाहिली तेव्हा...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपूर - दुर्गम आणि नक्षलग्रस्त आदिवासी भागातील 152 मुले शनिवारी रायपूरच्या रेल्वेस्टेशनवर आली होती. त्यांच्या डोळ्यांत अपार कुतूहल आणि थोडीशी भीतीही. धाडधाड करीत रेल्वे आली आणि थांबली. त्यांच्या हृदयांची धडधड मात्र वेगाने वाढली. काही जण घाबरून मागे सरकले. काहींनी रेल्वेला हात लावून पाहिला आणि म्हणाले... अच्छा तर अशी असते रेल्वे! असे म्हणून आनंदाने उड्या मारत ते रेल्वेत बसले.
दिल्लीला जाणा-या समता एक्स्पे्रसमधील हे दृश्य होते. एआय ट्रिपल ई आणि आयआयटी परीक्षेत यशस्वी झालेले ‘प्रयास’ या संस्थेचे आदिवासी विद्यार्थी छत्तीसगड राज्य शासनाच्या वतीने राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या भेटीसाठी दिल्लीला निघाले होते. या प्रवासाची माहिती विद्यार्थ्यांना आठवडाभर आधीच देण्यात आली होती. तेव्हापासून रेल्वेत बसण्यासाठी ते उत्सुक झाले होते. याचे कारण म्हणजे त्यांच्यापैकी 32 जण कधीच रेल्वेत बसले नव्हते. एक तर त्यांच्या परिसरात रेल्वे नाही किंवा त्यांना संधीही मिळाली नाही.
गाडीत बसताच कुणी खिडकीजवळची जागा
पकडली तर कुणी बर्थवर पथारी पसरली. कुणी इकडेतिकडे फिरून रेल्वेच्या आत काय काय असते ते पाहत होते. कांकेर जिल्ह्यातील भानूप्रतापपूर येथील अभिषेक उसारे वयाच्या 17 व्या वर्षी पहिल्यांदाच रेल्वेत बसला. तो म्हणाला की, मी फार खुश आहे. आतापर्यंत मी नेहमीच बसने प्रवास केला. बिजापूर जिल्ह्यातील कोटमेट्टा गावातील भुनेश मंडावी याने सांगितले की, नक्षलवाद्यांनी त्याच्या वडिलांना मारून टाकले. तो कधी शहरात जाईल, शिकेल किंवा रेल्वेत बसेल, असा विचार त्याने स्वप्नातही केला नव्हता. त्याने गिदम ते रायपूर ही बस आपल्या गावातून जाताना पाहिली होती. त्याच्या कुटुंबातील कुणीही आतापर्यंत रेल्वेतून प्रवास केलेला नाही. गाडी सुरू झाली तेव्हा एक मुलगा म्हणाला, ‘बापरे, अख्खे घरच चालू लागले आहे.’
या गाडीचे दोन डबे मुले व अधिका-यांसाठी राखीव होते. गाडीतच दोन दिवस राहणे, खाणे, पिणे, झोपणे अशी सोय असल्यामुळे या मुलांसाठी हा रोमांचक अनुभव होता. या मुलांची देखभाल करण्यासाठी नोडल अधिकारी व आदिवासी विभागाचे उपसचिव डॉ. अनिल चौधरी व इतर 18 अधिकारी सोबत आहेत. छत्तीसगडचे मुख्यमंत्री डॉ. रमणसिंह यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे ट्रायबल होस्टेलच्या उद्घाटन समारंभात ते सहभागी होतील. दिल्लीत या विद्यार्थ्यांना फिरण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.