आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुडानकुलम अणु प्रकल्पावरून निर्माण झाला तिढा

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिरुनेलवेली - कुडानकुलम अणु प्रकल्पावरून निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी मंगळवारी सरकारच्या एका समितीने प्रकल्पाविरोधात आंदोलन करणा-या नेत्यांची भेट घेतली.
या वेळी या नेत्यांनी समितीकडे प्रकल्पाच्या स्टेटस अहवालाची मागणी केली. दोन्ही बाजूंनी होणारी ही पहिलीच बैठक होती. केंद्र सरकारच्या वतीने स्थापन करण्यात आलेली 15 सदस्यीय समिती व नेते यांच्यातील चर्चा सुमारे तासभर चालली. या वेळी राज्य शासनाची सातसदस्यीय समितीही उपस्थित होती. कुडानकुलम प्रकल्पाला विरोध करणा-या चळवळीतील दोन सदस्यांनी ही बैठक समाधानकारक झाल्याचे सांगितले.
या वेळी नेत्यांनी 50 प्रश्नांचे एक निवेदन समितीला सादर केले. प्रकल्पाचे ठिकाण निवड, मूल्यमापनाचा अहवाल, पर्यावरण अहवाल अशा कागदपत्रांची मागणी आम्ही केली आहे, असे एम. पुष्परायन व जेसुराज यांनी सांगितले. अलीकडेच माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी या प्रकल्पाला भेट दिली होती. प्रकल्पाचे निरीक्षण केले. त्यानंतर हा प्रकल्प सुरक्षेच्या पातळीवर योग्य असल्याचे प्रमाणपत्रही दिले.
परंतु काही तज्ज्ञांनी वेगळी मते मांडली आहेत. तज्ज्ञांकडून या प्रकल्पाविषयी मत जाणून शंका दूर करण्याचे सरकारचे काम आहे. मात्र तज्ज्ञांमधील मतभिन्नतेमुळे प्रकल्पाविषयी अजूनही प्रश्न असल्याचे बैठकीनंतर काही आंदोलकांनी सांगितले.
अधिकारी भीती घालताहेत - प्रकल्पाशी संबंधित अधिकारी हे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करीत आहेत. सातत्याने होत असलेल्या विरोधामुळे प्रकल्पाला विलंब होत असल्याचे वक्तव्य अधिकारी वारंवार करीत असल्याबद्दल आंदोलकांनी आक्षेप घेतला आहे. एवढेच नाही तर त्यावर श्वेतपत्रिका जारी करण्याची मागणीही मंगळवारच्या बैठकीतून करण्यात आली.
कागदपत्रांशिवाय सरकारशी चर्चा नाही - सरकारच्या दोन समिती व आंदोलक यांचे प्रतिनिधी यांच्यातील बैठकीनंतर काही सदस्यांनी स्पष्ट केले की, या बैठकीत आम्ही केवळ आमचे म्हणणे मांडले. एक प्रश्नावली सादर केली. त्या प्रश्नांची उत्तरे आणि अहवाल मिळेपर्यंत आम्ही कोणत्याही चर्चेला सामोरे जाणार नाहीत. कुडानकुलम प्रकल्पाच्या सुरक्षेबाबत आमची पूर्ण खात्री झाल्याशिवाय चर्चेला अर्थ नाही.